Friday, 12 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 12.07.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –  12 July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जुलै २०१९ दुपारी .०० वा.
****
मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज न्यायालयात सुनावणी झाली, या याचिकांसंदर्भात दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं, राज्य सरकारला दिले आहेत. मात्र हे आरक्षण २०१४ पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू करता येणार नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाअंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्यसरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं वैध ठरवत, शिक्षणात बारा टक्के तर नोकरीत तेरा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सुनावला होता. या निर्णयाला दोन याचिकांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.
****
केंद्र सरकारच्या महसूली उत्पन्नात ११ पूर्णांक १३ शतांश टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. त्या आज राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत आहेत. यंदा सरकारला कराच्या रुपात साडे सोळा लाख कोटी रुपये महसुली उत्पन्न मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. पुढच्या पाच वर्षांत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात शंभर लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं सरकारचं उद्दीष्ट आहे, आर्थिक विकासाचा मार्ग अधिक बळकट करण्यासंदर्भात कोणतीही तडजोड न करता, या अर्थसंकल्पातून गुंतवणूक वाढण्यास चालना मिळेल, असा विश्वास अर्थमंत्री सीतारामन यांनी व्यक्त केला.
****
देशात सर्व रेल्वेगाड्यांचे जुने डबे बदलून आधुनिक डबे जोडण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न असल्याचं, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पात रेल्वेसाठीच्या तरतुदींवर काल  लोकसभेत झालेल्या चर्चेला ते आज उत्तर देत आहेत. नव्या डब्यांमुळे अपघातातली जीवीत हानी टाळता येईल, असा विश्वास गोयल यांनी वर्तवला. काल रात्री बारावाजेपर्यंत चाललेल्या या चर्चेत विविध पक्षाच्या अनेक खासदारांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडल्याचं सांगत, गोयल यांनी या सर्वांचे आभार मानले. 
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या चार दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती सतीश धवन अवकाश केंद्राला भेट देतील. भारतीय अवकाश संशोधन केंद्राच्या चांद्रयान-२ च्या कार्यक्रमालाही राष्ट्रपती उपस्थित रहातील.
****
जम्मू आणि काश्मीरमधल्या पूंछ तसंच राजौरी जिल्ह्याच्या सीमेलगतच्या भागात आज सकाळी पाकिस्ताननं गोळीबार तसंच उखळी तोफांचा मारा केला. पाकिस्तानच्या सैन्यानं, नागरी वसाहतींना लक्ष्य करून, शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलं. या गोळीबाराला भारतीय सैन्य चोख उत्तर देत आहे. दरम्यान, कुलगाम जिल्ह्यात काल संध्याकाळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या तळावर हल्ला केला. याला सुरक्षा दलानं रोख उत्तर दिलं. या परिसरात दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
****

ठाणे इथं आज सकाळी अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकानं चार लाख रुपयांचा गांजा जप्त केला. या संदर्भात कर्नाटकातल्या एका इसमाला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीच्या ताब्यातून सुमारे साडे दहा किलो गांजा जप्त करण्यात आला, त्याच्या घराची झडती घेतली असता, आणखी पंधरा किलो गांजा आढळून आल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जालना शहराचे आराध्य दैवत प्रतीपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या जुना जालन्यातल्या आनंदीस्वामी महाराज मंदिरात अषाढी एकादशीनिमित्त जिल्हाभरातून आलेल्या भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. सकाळी मंदिरातून निघालेल्या आनंदी स्वामी महारांच्या पालखी मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले असून, मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आषाढी एकादशीचा उत्सव आज सर्वत्र भक्तिभावानं साजरा होत आहे. औरंगाबादसह अनेक शहरातल्या विठ्ठल रुख्मिणी मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. औरंगबादनजिक प्रतिपंढरपूरकडे जाणारे रस्ते वारकरी आणि दिंड्यांनी फुलून गेले आहेत.
****
प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाला २० जुलैपासून सुरुवात होत आहे. त्याआधी जागतिक अव्वल कबड्डी पट्टू आणि भारतीय कबड्डी पट्टू यांच्यात हैदराबाद मधल्या गाचीबौली क्रीडांगणामधे सामना रंगणार आहे. भारतीय संघाचं नेतृत्व अजय ठाकूर करणार आहेत तर, जागतिक संघांचं नेतृत्व इराणचा फजल अत्राचली करणार आहे. प्रो कबड्डीमुळे कबड्डीला सुगीचे दिवस आले आहेत.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...