आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१८ जानेवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
केंद्रीय मंत्र्यांचा
एक गट आजपासून येत्या चोवीस तारखेपर्यंत जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या दौ-यावर जात आहे.
या गटात छत्तीस मंत्र्यांचा सहभाग आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकासासाठी केंद्र
सरकारनं सुरु केलेल्या अनेक विकासयोजनांची तसंच केंद्रानं घेतलेल्या विविध निर्णयांची
माहिती नागरिकांपर्यत पोचवण्यासाठी हा दौरा असल्याचं गृहमंत्रालयानं सांगितलं आहे.
****
भारतासाठी, जमिनीवरून
हवेत मारा करू शकणाऱ्या लांब पल्ल्याच्या एस ४०० या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीला
रशियानं सुरुवात केली आहे. ही क्षेपणास्त्रं २०२५ पर्यंत भारताकडे सुपूर्द केली जाणार
आहेत. एस ४००क्षेपणास्त्र प्रणाली जगातल्या सर्वोत्तम हवाई सुरक्षा यंत्रणांपैकी एक
आहे. रशिया यावर्षी भारताला पाच हजार कलाश्निकोव्ह रायफलीही पुरवणार आहे. भारत आणि रशिया यांच्यात
२०१८ मध्ये यासंबंधीचा पाच अब्ज डॉलर्स चा करार झाला होता.
****
दहशतवादी किंवा नक्षली
हल्ल्यात तसंच जातीय दंगलीत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना, केंद्र सरकारच्या
याबाबतच्या योजनेतून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी, आधार क्रमांक सादर करणं अनिवार्य असणार
आहे. गृहमंत्रालयानं काल याबाबत सूचना जारी केली आहे.
****
पशुधन हे शेतकऱ्याचं
कुटुंब असून, पशुधनाच्या आरोग्यासाठी राज्यात लवकरच फिरता पशु दवाखाना सुरू करण्यात
येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल सांगली जिल्ह्यातल्या
इस्लामपूर इथे एका कार्यक्रमात बोलत होते.
****
नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या
अनेक भागत थंडीची तीव्रता कायम आहे. काल नाशिक
मधे राज्यातल्या सर्वात कमी, म्हणजे सहा अंश सेल्शियस तापमानाची नोंद झाली. औरंगाबाद,
पुणे, अहमदनगर आणि जळगावमध्येही काल पारा दहा अंशांखाली होता. नाशिकमध्ये आज सकाळी
सात पूर्णांक आठ अंश सेल्शियस इतकं तापमान नोंदलं गेलं असून, या तीव्र थंडी आणि धुक्यापासून
द्राक्ष पिकाचं रक्षण करण्यासाठी शेतकरी द्राक्षबागांमध्ये शेकोट्या पेटवत असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गुवाहाटी इथं सुरु असलेल्या
तिसऱ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत काल भारोत्तोलन स्पर्धेत महाराष्ट्राच्या संकेत
महादेवनं सुवर्ण पदक जिंकलं. या स्पर्धेच्या पदक तालिकेत आतापर्यंत महाराष्ट्र प्रथम
क्रमांकावर आहे.
*****
***
No comments:
Post a Comment