Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 16 April 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६एप्रिल २०१७ सकाळी
६.५० मि.
****
· अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणं, खतं आणि
कीटकनाशकं देण्याचा राज्य सरकारचा विचार
· पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १ रुपया ३९ पैसे तर डिझेलच्या
दरात १ रुपया ४ पैशांनी वाढ
· सिंधुदूर्ग जिल्ह्यात मालवण नजिक कर्नाटकातल्या आठ जणांचा समुद्रात बुडून मृत्यू
· आंब्याच्या पेटीतून
बारा लाख रूपयांची लाच स्वीकारतांना आदिवासी विभागाच्या दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांना अटक
आणि
· जलयुक्त शिवार अभियानाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर: सगरोळीच्या
संस्कृती संवर्धन मंडळाला अशासकीय संस्थेसाठीचा प्रथम पुरस्कार
****
अल्पभूधारक शेतकऱ्यांना
राज्य सरकार मोफत बी-बियाणं, खतं आणि
कीटकनाशकं देण्याचा विचार करत आहे. महसूल मंत्री चंद्रकांत
पाटील यांनी काल पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली. या योजनेमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी राहील, परिणामी
शेत मालाचे बाजारभाव
कमी झाल्यामुळे होणाऱ्या नुकसानाचं प्रमाण कमी असेल, असं
पाटील म्हणाले. येत्या दोन महिन्यांमध्ये शेतमजुरांना देखील रोजगार
हमी योजनेमध्ये समाविष्ट केलं
जाणार असल्याचं ते
म्हणाले.
****
देशाच्या लष्करी इतिहासात
अहमदनगरच्या आर्मड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल - ए सी सी एसचं मोलाचं योगदान आहे, असे
गौरवोद्गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले आहेत. काल अहमदनगर इथं ए सी सी एस
ला राष्ट्रपतींच्या हस्ते मानाचा ध्वज प्रदान करण्यात आला, त्यावेळी
ते बोलत होते. संस्थेचे कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांनी हा मानाचा ध्वज स्वीकारला. लष्कर
प्रमुख बिपीन रावत आणि अन्य लष्करी अधिकारी यावेळी उपस्थित होते. घोडेस्वार जवानांचं
उत्कृष्ट संचलन, रणगाडे तसंच हेलिकॉप्टर्सचा ताफा, आणि
सुखोई हवाई विमानाच्या चित्तथरारक कसरती यावेळी सादर करण्यात आल्या.
****
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात
आली आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १ रुपया ३९ पैसे तर डिझेलच्या दरात
१ रुपया ४ पैशांनी वाढ झाली आहे. स्थानिक
मूल्याधारीत कराव्यतिरीक्त ही वाढ असून काल मध्यरात्रीपासून हे दर लागू करण्यात आले आहेत.
****
शेतकऱ्यांचा सातबारा
कोरा करुन संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी सर्व विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या
संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथून काल
सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार,
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, खासदार सुप्रिया
सुळे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपस्थित होते. ही संघर्षयात्रा बुलडाणामार्गे उत्तर महाराष्ट्रात सभा घेणार आहे.
****
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन
योजना जरूर राबवाव्यात मात्र,
सध्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्यासाठी
कर्ज माफी हा एकमेव उपाय असल्याचं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी
म्हटलं आहे. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत
होते. शेतकरी आत्महत्यांमध्ये देशभरात महाराष्ट्र आघाडीवर असून, राज्य
सरकार असंवेदनशील असल्याची टीका चव्हाण यांनी केली.
लातूर तालुक्यातील भिसे वाघोली इथं
शीतल वायळ या मुलीनं लग्नाचा खर्च परवडत नसल्यानं, आत्महत्या
केल्याबद्दल चव्हाण यांनी दुःख व्यक्त केलं. ‘मराठवाड्यात
महसूल विभागाचे नवे आयुक्तालय लातूरला व्हावे की नांदेडला’ यासाठी
नेमलेला दांगट आयोगाचा अहवाल मान्य करू, असं चव्हाण म्हणाले.
****
सिंधुदूर्ग जिल्ह्यात
मालवण नजिक वायरी इथं आठ जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. काल
सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.कर्नाटकातल्या
बेळगावच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या
सहलीत आलेल्या ५० विद्यार्थ्यांपैकी काही जण काल सकाळी ११ वाजेच्या सुमारास समुद्रात
उतरले, मात्र समुद्राच्या लाटेसोबत अकरा जण पाण्यात ओढले गेले, त्यापैकी
चार विद्यार्थी, तीन विद्यार्थिनी आणि एका शिक्षकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.
****
पालघर जिल्हा
आश्रमशाळेतल्या मुख्य अधिक्षकाकडून आंब्याच्या पेटीतून बारा लाख रुपयांची लाच घेतांना भारतीय प्रशासन सेवेतला एक आणि उपजिल्हाधिकारी संवर्गातील एक अशा दोन अधिकाऱ्यांना काल अटक करण्यात आली. आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे आणि उपायुक्त किरण माळी अशी या दोघांची नावं आहेत.
आश्रमशाळेतल्या बारा अधिक्षकांना मुख्य अधिक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली होती, या अधीक्षकांकडून प्रत्येकी एक लाख रूपये याप्रमाणे बारा लाख
रूपये लाचेची मागणी या दोन अधिकाऱ्यांनी केली होती.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं
हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
जलयुक्त शिवार अभियानाचे २०१५-१६ साठीचे राज्यस्तरीय
पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. सोलापूर
जिल्ह्याला ५० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठवाड्याला
तीन पुरस्कार मिळले आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या सगरोळी इथल्या संस्कृती संवर्धन
मंडळाला अशासकीय संस्थेसाठीचा प्रथम पुरस्कार मिळाला असून द्वितीय पुरस्कार जालना
इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंग सेवाभावी संस्थेला जाहीर झाला आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यम
प्रकारात लातूरचे शशिकांत पाटील यांना तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉक्टर
प्रशांत नारनवरे यांना विभागीय स्तरावर प्रथम पुरस्कार
जाहीर झाला आहे.
दरम्यान, राज्य
सरकारतर्फे दिला जाणारा ‘सहकारनिष्ठ पुरस्कार’ लातूर
जिल्ह्यातल्या निवळी इथल्या विकास सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे.
सहकार तसंच साखर उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार
दिला जातो.
****
मराठी साहित्याचा
इतिहास, शिक्षक साहित्यिकांशिवाय कधीच पूर्ण होणार नाही असं मत, शिक्षक साहित्यिक बालाजी इंगळे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं दुसऱ्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात
ते काल बोलत होते. राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा
भांड यांच्या हस्ते फळ्यावर शुभेच्छा संदेश लिहून काल सकाळी या संमेलनाचं उद्घाटन झालं.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी
उपस्थित होते. मराठवाड्यातले साहित्य अकादमी पुरस्कार विजेते
डॉक्टर वीरा राठोड, रवी कोरडे आणि आसाराम लोमटे यांचा यावेळी
विशेष सत्कार करण्यात आला. आज या संमेलनाचा समारोप होणार आहे.
****
उस्मानाबाद इथं आजपासून नाट्य महोत्सवाला प्रारंभ होत आहे.
२० तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात
नाटकांसह नटरंगी नार, लावण्यखणी असे लावणीचे कार्यक्रम होणार आहेत. येत्या
२१ तारखेला होणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या वातावरणनिर्मितीसाठी
हा नाट्य महोत्सव घेतला जात असल्याचं आयोजकांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरात
परवा घडलेल्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेनंतर कालही तणाव कायम होता. काल सकाळी
दहा वाजता संचारबंदी शिथील करण्यात आली, मात्र रात्री दहा वाजेपासून, आज सकाळी सहा वाजेपर्यंत पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली होती.दिवसभर संचारबंदी शिथिल असली तरी बाजारपेठा
बंदच होत्या. दरम्यान, जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी शांतता समितीची बैठक
घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान, परवाच्या दगडफेकीत
जखमी झालेला सोनाजी हानवते हा इसम काल उपचारादरम्यान मरण पावला. त्याच्यावर
नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरु होते.
****
मराठवाड्यातलं नापिकीचं प्रमाण पाहता, या
भागात अल्पभूधारक
शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची कमाल मर्यादा १५ एकर ग्राह्य धरावी अशी मागणी आमदार सतीश
चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे
पत्राद्वारे ही मागणी केली
आहे. मराठवाडा आणि विदर्भात सिंचनाचा अनुशेष अद्यापही पूर्ण झालेला नाही, राज्यातल्या
अन्य विभागांच्या तुलनेत, या दोन विभागांमध्ये कोरडवाहू जमिनीचं प्रमाण जास्त आहे, परिणामी
अन्य शेतकऱ्यांच्या तुलनेत या भागात शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी असल्याचं चव्हाण
यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील विकास कामं तत्परतेनं
पूर्ण करावीत, असे निर्देश खासदार चंद्रकांत खैरे यांनी संबंधितांना दिले आहेत. औरंगाबाद
इथं आयोजित जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. विकास
कामं प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना खैरे
यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यात ज्या केंद्रीय योजनांचा उर्वरीत निधी प्राप्त
झालेला नाही, अशा योजनांचा अहवाल सादर करण्याची सूचनाही खैरे यांनी यावेळी
केली.
//*******//
No comments:
Post a Comment