Monday, 17 April 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 17.04.2017 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 April 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ एप्रिल २०१७ दुपारी १.००वा.

*****

जेनेरिक औषधांसाठी लवकरच कायदा करणार असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सुरत इथं किरण रुग्णालयाचं उद्घाटन करताना बोलत होते. आरोग्य सुविधेचा लाभ देशातल्या प्रत्येक नागरिकाला मिळाला पाहिजे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. केंद्र सरकारनं ७०० औषधांचे दर निश्चित केले आहेत तसंच जीवनावश्यक औषधांसह स्टेंटचे दरही कमी केले असल्याचं मोदी यांनी सांगितलं.

मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर  असून, या दौऱ्यात ते सौराष्ट्र नर्मदा सिंचन या महत्त्वकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं राष्ट्रार्पण तसंच दुसऱ्या टप्प्याचं भूमीपूजन करणार आहेत. चार टप्प्यांच्या या प्रकल्पांतर्गत सरदार सरोवरातल्या जलसाठ्यातून सौराष्ट्रातली ११५ धरणं भरण्याचा गुजरात सरकारचा प्रयत्न आहे.

****



अर्थव्यवस्थेतील बदलाला यापूर्वी होणारा विरोध मावळत असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत फिक्कीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदलत असल्यामुळे पारंपारिक उद्योग आणि व्यापारातही बदल होत आहेत. अभिनव कल्पनांमुळे अर्थव्यवस्थेचा विस्तार होत असल्याचं ते म्हणाले. भारतीय महिला उद्योजकांमध्ये नवीन उद्योग निर्माण करण्याची क्षमता असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळी जेटली यांनी फिक्की महिला संघटनेचा लिंग समानता निर्देशांकही प्रसिद्ध केला. कुस्तीपटू द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगट यांच्यासह अनेक मान्यवरांना जेटली यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देवून गौरवण्यात आलं.

****

राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाच्या पोर्टल तसंच मोबाईल ॲपचं आज नवी दिल्लीत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. उच्च शिक्षणाच्या योजना, याबाबतचे शासन निर्णय आदींबाबत या ॲपवरून माहिती घेता येणार आहे. राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाच्या सतराव्या प्रकल्पाचं अनावरणही आज होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

काश्मीरमध्ये श्रीनगरच्या लाल चौकात विद्यार्थ्यांनी आज काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण मिळालं. काल पुलवामा इथं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मोर्चावर कारवाईच्या विरोधात विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला होता, मोर्चेकरी विद्यार्थ्यांनी सुरक्षेसाठी तैनात पोलिसांवर दगडफेक केली, यात एक सुरक्षारक्षक जखमी झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराची नळकांडी फोडावी लागली. विद्यार्थ्यांवर कारवाईच्या विरोधात काश्मीर खोऱ्यात आज महाविद्यालयं बंद आहेत.

****

अजमेर बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय येत्या २४ तारखेला निर्णय सुनावणार आहे. या प्रकरणी आरोपी प्रज्ञासिंह ठाकूरसह चौघांबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं आपला अंतिम अहवाल नुकताच न्यायालयासमोर सादर केला होता. या अहवालात प्रज्ञासिंह ठाकूरसह इतरांविरोधात सबळ पुरावे नसल्याचं, एनआयएनं नमूद केलं आहे.

****

वैद्यकीय शिक्षणासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता-NEET परीक्षा येत्या सात मे रोजी होणार आहे. या संदर्भात दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, या तारखेत कोणताही बदल करण्यास नकार दिला आहे.

****

गडचिरोली जिल्ह्यात भामरागड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ आर एल जामी यांचा काल अपघाती मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भामरागड नजीक बिनागुंडा धबधबा पाहण्यासाठी गेले असता, डॉ जामी यांचा धबधब्याच्या डोहात बुडून मृत्यू झाला. नागालँड राज्याचे रहिवासी असलेले डॉ जामी यांनी दुर्गम भागात मुख्यालयी राहून आरोग्य सेवा पुरवण्याचं कार्य केल्यानं, त्यांच्या अपघाती मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

****

लातूर तसंच परभणी महापालिकेसाठीच्या निवडणूक प्रचाराची मुदत पुढच्या काही तासात संपत आहे. सर्वच पक्षांचे उमेदवार मतदारांची भेट घेण्याच्या प्रयत्नात असल्यानं, प्रचार शीगेला पोहोचला आहे. या दोन्ही महापालिकांसाठी परवा बुधवारी मतदान होणार आहे. वाढत्या उन्हामुळे मतदानाची वेळ एक तास वाढवण्यात आली असून, सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

दरम्यान, निवडणूक पारदर्शक आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

****

उस्मानाबाद इथं नियोजित सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नाट्यमहोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. या अंतर्गत येत्या गुरुवारपर्यंत नाट्यरसिकांना गाजलेली अनेक नाटकं पाहता येणार आहेत.

//*******//

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...