Sunday, 21 January 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.01.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 January 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  २१ जानेवारी २०१ सकाळी .५० मि.

****



Ø सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणातल्या सहाही आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा

Ø रस्त्यांसाठी आवश्यक भू-संपादन जलदगतीनं करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश 

Ø नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर

आणि

Ø पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव करत दृष्टिहीनांचा क्रिकेट विश्वचषक भारतानं दुसऱ्यांदा जिंकला

****

 अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई इथल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातल्या सहाही आरोपींना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातल्या एका आरोपीची न्यायालयानं गेल्या सोमवारी निर्दोष मुक्तता केली होती. जाती धर्माचा खोटा अहंकार बाळगणाऱ्या समाजकंटकांना धडकी भरवणारा हा निर्णय न्यायालयानं दिला असल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. क्रूर कृत्यासाठी दोषींना कठोर शिक्षा दिली गेली नाही, तर समाजात कुठलंच भय राहणार नाही, असं न्यायाधीश आर आर वैष्णव यांनी निकालात नमूद केल्याचं, निकम यांनी सांगितलं. आंतरजातीय प्रेमप्रकरणातून जानेवारी २०१३ मध्ये सोनईजवळ गणेशवाडी शिवारात विठ्ठलवाडी इथं तीन तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पोपट दरंदले, गणेश दरंदले, संदीप कुऱ्हे, अशोक नवगिरे, प्रकाश दरंदले आणि रमेश दरंदले अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

****

 शासनाच्या ध्येय-धोरणांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्यक्ष लोकसहभाग असावा या भूमिकेतून, २०१८ - १९ या वर्षाच्या अर्थसंकल्पाविषयी नागरिकांनी आपल्या सूचना पाठवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. महसुली उत्पन्नामध्ये वाढ करणं, खर्चाची बचत करणं, यासह अस्तित्त्वात असलेल्या योजना, यंत्रणा, प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी तसंच, नवीन योजना, यंत्रणा आणि प्रक्रिया निर्माण करण्यासाठी नागरिकांना सूचना देता येतील. नागरिकांनी आपल्या सूचना ३१ जानेवारी २०१८ पर्यंत डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट माय जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

 राज्यातल्या रस्ते विकासासाठी आवश्यक भू-संपादन जलदगतीनं करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. भारतमाला या रस्ते विकासाच्या योजनेचा काल मुंबईत आढावा घेताना ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दूरदृष्य संवाद यंत्रणेद्वारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामाचा जिल्हानिहाय आढावा घेतला. मार्चपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन अधिग्रहीत करून दिल्यास पावसाळ्यापूर्वी कामं सुरू करता येतील, असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला. जमीन अधिग्रहणातल्या अडचणींवर या वेळी चर्चा झाली.

****

 नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारे गोदावरी गौरव पुरस्कार काल जाहीर झाले. शास्त्रीय गायक डॉ. सत्यशील देशपांडे, चित्रकार सुभाष अवचट, अभिनेते अमोल पालेकर, सुदर्शन शिंदे आणि महेश साबळे यांना शौर्य पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे, तर शिक्षण क्षेत्रातल्या कार्यासाठी डॉ. स्नेहलता देशमुख यांना हा पुरस्कार घोषित झाला आहेत. २१ हजार रूपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतीदिनी येत्या १० मार्चला हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

****

 साहित्य संमेलनातून मराठी भाषेचं संवर्धन नक्कीच होऊ शकतं, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. बीड इथं आठव्यामराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल सुळे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. सरकारच्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातली मुलं शिक्षणापासून वंचित राहतील, त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. संमेलनाध्यक्ष दीपा क्षीरसागर, मावळत्या संमेलनाध्यक्ष वृषाली किन्हाळकर, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यावेळी उपस्थित होत्या. या संमेलनातून महिला सबलीकरण, महिला साहित्य निर्मिती यावर भर देण्यात आला असून, नवोदित तरुण लेखिकांसाठी विविध परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

 नागपूर इथल्या महाराष्ट्र  पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी परळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आशीष पातुरकर यांची राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी नियुक्ती केली आहे. पातुरकर यांची ही नियुक्ती पाच वर्षांसाठी असेल.

*****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****

 औरंगाबाद इथं सुरू असलेल्या अखिल भारतीय वैदिक संमेलनात काल दुसऱ्या दिवशी चार वेदांचं पठण आणि विविध विषयांवर चर्चासत्र घेण्यात आलं. आज सकाळी ९ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांचं कीर्तन होणार असून १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत संमेलनाचा समारोप होणार आहे.

*****

 नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी सरकार काहीही प्रयत्न करत नसल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनात नांदेड इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकारने जी कर्जमाफीची घोषणा केली त्यात नियमित कर्ज भरणाऱ्यांना २५ हजारांचा बोनस अद्याप मिळाला नसून कर्जमाफीची रक्कमही अजून शेतकऱ्यां  च्या खात्यात जमा झाली नसल्याचं ते म्हणाले. यावेळी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक आणि आमदार सतीश चव्हाण उपस्थित होते. लोहा इथंही काल पक्षाच्यावतीनं सभा घेण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथंही हल्लाबोल सभेत बोलतांना पवार यांनी संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत हल्लाबोल आंदोलन सुरू राहणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 भारतीय संघानं रोमहर्षक लढतीत पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव करत दृष्टिहीनांचा क्रिकेट विश्वचषक सलग दुसऱ्यांदा जिंकला. संयुक्त अरब अमिरातीत शारजाह इथं काल झालेल्या या सामन्यात पाकिस्ताननं भारतापुढे विजयासाठी ३०८ धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य भारतीय संघानं ८ गडी गमावत पूर्ण केलं. कर्णधार अजय तिवारीनं हा विजय वीर जवानांना समर्पित करत असल्याचं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विश्वचषकाबद्दल भारतीय संघाचं ट्विटरवरुन अभिनंदन करत, हा विजय प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारा असल्याचं म्हटलं आहे.

****

 परभणी जिल्हा परिषदेच्यावतीनं काल जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला राठोड यावेळी उपस्थित होत्या, ग्रामीण भागात स्वच्छतेची चळवळ उभी करण्यासाठी विद्यार्थ्यांचं योगदान महत्त्वाचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

****

 मराठवाड्याच्या विकासासंदर्भात विविध मागण्यांसाठी येत्या २३ तारखेला मराठवाडा विकास सेनेच्या वतीनं औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर विकास मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठवाडा विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पाटील यांनी दिली. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. मराठवाड्याच्या न्यायहक्कासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनी मिळूनमराठवाडा विकास सेनाहा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

 हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात काल रोजगार हमी योजना, मृद आणि जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांबाबतची आढावा बैठक पार पडली. जलयुक्त शिवार अभियानात निवड केलेल्या गावांमध्ये होणाऱ्या कामांचे सविस्तर आराखडे तयार करून विहीत प्रक्रियेनुसार कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जालना इथंही यासंदर्भात बैठक घेण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 औरंगाबाद इथं आज मराठवाड्यातल्या सेवाभावी समूह तसंच संस्थाचा मेळावा होणार आहे. शहरात कलाग्राम इथं आयोजित या मेळाव्यात कृषी, पाणी, ग्रामविकास, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रात काम करणाऱ्या शंभराहून अधिक संस्थांचे कक्ष असतील. सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत होणाऱ्या या मेळाव्यात विविध विषयांवर परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 October 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी...