Friday, 14 June 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 14.06.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
सरकारनं कर्मचारी राज्यविमा अधिनियम अंतर्गत कर्मचारी आणि नियोक्ता यांच्या अंशदानाचा दर साडेसहा टक्क्यांवरून चार टक्क्यांवर आणला आहे. इएसआय अधिनियमांअतर्गत अंशदानाचा दर कमी करण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या प्रसिद्घीपत्रकात म्हटलं आहे. येत्या एक तारखेपासून नवे दर अंमलात येतील. अंशदानाचा दर कमी केल्यानं कामगारांना दिलासा मिळेल आणि इएसआय योजनेअंतर्गत जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना सहभागी करुन घेता येईल, तसंच त्यांना संघटीत क्षेत्राच्या कक्षेत आणता येईल, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे कंपन्यांवरचा आर्थिक बोजा कमी झाल्यानं त्या सशक्त होतील आणि त्याचा फायदा व्यापारउदीम वाढवण्यासाठी होईल, असं मतही मंत्रालयानं व्यक्त केलं आहे.
***
सरदार सरोवर पुर्नवसन वसाहतीमधल्या समस्या आणि पुर्नवसनाचे प्रश्र्न सोडवण्याच्या मागणीसाठी नंदूरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर आज नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्त्वाखाली धडक आंदोलन सुरू झालं आहे. पाचशेहून अधिक आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शिरून हे आंदोलन सुरू केलं आहे. सरदार पटेलांचा पुतळा आणि सरदार सरोवर उभे राहिले मात्र सरदार सरोवरातून वीज निर्मिती झालीच नसून मुळातच महाराष्ट्रातलं विस्थापन हे वीजेसाठीच झालं असल्याची टीका पाटकर यांनी यावेळी केली. मध्यप्रदेश शासन गुजरातशी दोन हात करत असतांना महाराष्ट्र शासन या साऱ्या प्रकरणात बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही मेधा पाटकर यांनी यावेळी केला. 
***
महावितरणच्या माध्यमातून उच्चदाब वितरण प्रणाली योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना स्वतंत्र रोहित्र देण्याचा शासनाचा निर्णय झालेला असून यासाठी एकशे अठ्ठयाऐंशी कोटी रुपये निधी मंजूर केला आहे, याअंतर्गत बीड जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना वीज रोहित्र दिलं जाणार आहे, असं राज्याच्या ग्रामविकास, महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीनं आयोजित ‘एक शेतकरी एक डीपी’ या योजनेच्या बीड जिल्ह्यातल्या शुभारंभ प्रसंगी आज त्या बोलत होत्या. परळी तालुक्याच्या पांगरी गावातल्या विष्णू पांचाळ या अल्पभूधारक शेतकऱ्याला शासनाच्या वतीनं बसवण्यात आलेल्या दहा के वी क्षमतेच्या उच्चदाब रोहित्राचं उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.
***
नाशिक इथल्या मुथुट फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आज सकाळी दरोड्याचा प्रयत्न झाला. यात दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला आहे. कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार करून दक्षता दाखवत धोक्याची घंटी वाजवल्यानं लुटारुंनी गोळीबार केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
सांगली जिल्ह्यातल्या तासगांव विसापूर रस्त्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विसापूर शाखेची पंचवीस लाख रुपयांची रोकड आज लुटण्यात आली. बँक कर्मचाऱ्यांचा पाठलाग करून त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून मारहाण करत चोरट्यांनी हे कृत्य केलं. या घटनेनंतर पोलिसांनी सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून विविध भागात पोलिस पथकं रवाना केली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  
***
रेल्वे पोलिस दलानं अकोला इथं पाच लाख रुपयांची रेल्वे इ तिकिटं आज एका कारवाईत जप्त केली आहेत. भारतीय रेल्वे महामंडळाचे अधिकृत विक्रेते राधे टुर्स अँड ट्रॅव्हल्सचे प्रकाश अग्रवाल यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवाशांना अधिक दरानं तिकिट विक्रीचा हा गैर प्रकार अकोला रेल्वे पोलिसांच्या विशेष कारवाईत उघड झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातल्या ८६ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि २७ खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांमधल्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना, शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीनं, शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकं देण्यात येणार आहेत. सोनपेठ तालुक्यातल्या सोनपेठे शिरशी, खडका, उखळी, वडगाव आणि नरवाडी या गावातल्या शाळांचा यात समावेश आहे.
***
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर - सिंदखेडराजा मार्गावर आज पहाटे एका अपघातात दोन मृत्यूमुखी पडले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. लोणार तालुक्यातील खळेगाव शिवारात ट्रक आणि मालवाहू वाहनांदरम्यानच्या या अपघातातील गंभीर जखमी ट्रक चालकाला औरंगाबाद इथं उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 18 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...