आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१८ जून २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
सतराव्या लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी
आजही सुरु राहणार आहे. काल संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्यासह काही सदस्यांचा शपथविधी झाला. उर्वरित सदस्यांना आज शपथ दिली जाईल.
दरम्यान, लोकसभेच्या या सत्रात
उद्या लोकसभा अध्यक्षांची निवड होईल, परवा गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन्ही
सदनांच्या संयुक्त सभेला संबोधित करतील. तर येत्या पाच जुलैला, चालू आर्थिक वर्षाचा
अर्थसंकल्प सादर होणार आहे.
****
भाजपचे खासदार ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदाचे राष्ट्रीय
लोकशाही आघाडीचे उमेदवार असतील. ते राजस्थानच्या कोटा इथून दोनवेळा खासदार म्हणून निवडून
आले आहेत. लोकसभा अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.
****
जम्मू-कश्मीरमधे अनंतनाग जिल्ह्यात मरहमा बिजबिहार
इथं आज पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमधे चकमकीत दोन जवान शहीद झाले असून दोन आतंकवाद्यांना
ठार करण्यात आलं आहे. ही चकमक अद्याप सुरू आहे. या भागात दहशतवादी असल्याची माहिती
मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घातला व त्यानंतर हे दहशतवादी ठार झाल्याचं
वृत्त आहे.
****
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून
सुरुवात झाली. राज्याचा २०१८-१९ चा आर्थिक पाहणी अहवाल काल विधान सभेत अर्थमंत्री सुधीर
मुनगंटीवार यांनी तर विधान परिषदेत अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सादर केला.
दरम्यान, आज विधिमंडळात चालू
आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.
***
देशभरातल्या सरकारी रुग्णालयात
काम करणाऱ्या डॉक्टरांना संरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च
न्यायालयात सुनावणी होणार आहे. पश्चिम बंगालमधल्या सरकारी रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांवर रुग्णाच्या
कुटुंबियांनी शुक्रवारी हल्ला केला होता. या
घटनेचा निषेध करत त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी शुक्रवारीच ही याचिका दाखल केली
होती.
****
अहमदनगर जिल्ह्यातील
श्रीगोंदा तालूक्यातील भिमा नदी पात्रामध्ये वाळूउपसा करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करून चार ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळू असा सुमारे तीस
लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे नोंदवले आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment