Monday, 17 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.06.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जून २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ; राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनालाही आजपासून सुरुवात
Ø  फडणवीस सरकार हे विकासाचा आभास निर्माण करणारं आभासी सरकार असल्याचा विरोधकांचा आरोप
Ø  केंद्र सरकारनं कायदा करून अयोध्येत राम मंदीर बांधावं - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आवाहन
Ø  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; जयदत्त क्षीरसागर, अतुल सावे यांच्यासह तेरा नवे मंत्री
आणि
Ø  विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर एकोणनव्वद धावांनी विजय
****

 संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. लोकसभेचं कामकाज आजपासून तर राज्यसभेचं कामकाज गुरुवारपासून सुरू होईल. हे सत्र २६ जुलै पर्यंत चालेल. येत्या २० तारखेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. पाच जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामन् २०१९-२० या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील. मुस्लीम महिला विवाह संरक्षण, अर्थात तिहेरी तलाक विधेयक, आधार आणि इतर कायदे सुधारणा विधेयक २०१९, ा अधिवेशनात सादर होण्याची शक्यता आहे. ‘एक देश एक निवडणूक’ या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा, एकोणीस तारखेला सर्व पक्षांच्या अध्यक्षांची बैठक घेणार आहेत, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.
****

 सतराव्या लोकसभेच्या पहिल्या सत्राची सर्वपक्षीय बैठक काल नवी दिल्लीत पार पडली. संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सुरळीत चालावं, यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन सरकारनं केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी, काँग्रसचे गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे के. टी. आर. बालू, तृणमूल काँग्रसचे डेरेक ओ-ब्रायन, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, अण्णा द्रमुक पक्षाच्या नवनीता कृष्णन् आणि समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव या बैठकीला उपस्थित होते.
****

 राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात उद्या मांडला जाणारा अर्थसंकल्प हा पुरोगामी आणि राज्याला पुढे नेणारा असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत  पत्रकार परिषदेत सांगितलं. या अधिवेशनात १३ नवी विधेयकं तसंच विधान सभेतले प्रलंबित १२ आणि विधान परिषदेतले प्रलंबित तीन अशी एकूण २८ विधेयकं चर्चेला येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान, विधीमंडळ कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काल विरोधी पक्षांची भेट घेऊन, अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्याचं आवाहन केलं.
****

 कृषी, औद्योगिक, आर्थिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात विकासाचा आभास निर्माण करणारं फडणवीस सरकार हे आभासी सरकार असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या वतीनं आपण सरकारचा धिक्कार करत असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये, सरसकट कर्जमाफी, एफएसआय घोटाळाप्रकरणी माजी मंत्री प्रकाश मेहतांविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागण्या अधिवेशनात लावून धरणार असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. राज्य दुष्काळात होरपळत असल्यानं, सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****  

 केंद्र सरकारनं अयोध्येत राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा, कायदा करून मंदीर बांधावं, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ठाकरे यांनी काल अयोध्येत, रामजन्मभूमीला भेट देऊन, बालस्वरुपातल्या श्रीरामाची पूजा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना, त्यांनी राम मंदीर बांधण्याचा पुनरुच्चार केला. शिवसेनेचे नवनिर्वाचित १८ खासदार यावेळी उपस्थित होते. आजपासून सुरू होत असलेल्या १७ व्या लोकसभेच्या कामकाजापूर्वी, शिवसेनेचे खासदार प्रभू रामाच्या दर्शनासाठी आल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.
****

 बालगृहातून बाहेर पडणाऱ्या युवकांना अनाथ प्रमाणपत्र दिलं जाणार असल्यानं, त्यांना नोकरीसाठी याचा फायदा होणार असल्याचा विश्वास, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी वर्तवला आहे. त्या काल मुंबईत या संदर्भातल्या बैठकीत बोलत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. बालगृहातल्या सुधारणांसाठी शासन नवीन धोरण आणणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
**** 

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 उन्हाळी सुटीनंतर राज्यातल्या सर्व शाळा आज विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप आणि माध्यान्ह भोजनात गोड पदार्थ देण्याचं शासनातर्फे सांगण्यात आलं आहे.
****

 राज्य मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला. राजभवनात झालेल्या शपथग्रहण सोहळ्यात राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी १३ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली, यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, संजय कुटे, सुरेश खाडे, डॉक्टर अनिल बोंडे, प्राचार्य अशोक उईके आणि ॉक्टर तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्री म्हणून, तर योगेश सागर, अविनाश महातेकर, संजय उर्फ बाळा भेगडे, डॉक्टर परिणय फुके आणि अतुल सावे यांना राज्यमंत्री म्हणून राज्यपालांनी शपथ दिली.

 वीन मंत्र्यांना खातेवाटपही काल करण्यात आलं. विखेपाटील यांना गृहनिर्माण, क्षीरसागर यांना रोजगार हमी, शेलार यांना शालेय शिक्षण आणि युवककल्याण, तानाजी सावंत यांना जलसंधारण खातं देण्यात आलं आहे. राज्यमंत्री अतुल सावे यांच्याकडे उद्योग आणि खनिकर्म, वक्फ आणि अल्पसंख्याक विकास या खात्यांचा कार्यभार देण्यात आला आहे.

 दरम्यान विष्णू सावरा, राजकुमार बडोले, प्रवीण पोटे, दिलीप कांबळे, प्रकाश मेहता आणि अंबरिश अत्राम या सहा मंत्र्यांनी काल आपल्या पदाचे राजीनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.
****

 जयदत्त क्षीरसागर यांची कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल बीड शहरातल्या बशीरगंज भागात शिवसैनिकांनी जल्लोष केला. अतुल सावे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेताच औरंगाबादेतही फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद साजरा झाला.
****
क्रिकेट
 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं पाकिस्तानचा ८९ धावांनी दणदणीत पराभव केला. नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं भारताला प्रथम फलंदाजीला पाचारण केलं. भारतीय संघानं के एल राहुल आणि रोहित शर्माची १३६ धावांची भागिदारी, रोहितच्या १४०, कर्णधार विराट कोहलीच्या ७७ आणि राहुलच्या ५७ धावांच्या बळावर भारतीय संघानं पाकिस्तानसमोर आजवरच्या सर्वोच्च तीनशे छत्तीस धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरादाखल सावध खेळत असलेल्या पाकिस्तानी संघाचे सहा फलंदाज झटपट बाद झाले. पस्तीसाव्या षटकानंतर सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला, त्यामुळे पंचांनी डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानी संघाला चाळीस षटकात तीनशे दोन धावांचं लक्ष्य देण्यात आलं, मात्र पाकिस्तानचा संघ दोनशे बारा धावाच करू शकला. रोहित शर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि विजय शंकर या तिघांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. आपल्या कारकिर्दीत विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बळी घेणारा, विजय शंकर पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला. कोहलीनं या डावात, सर्वात जलद दोनशे बावीस डावात अकरा हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम नोंदवला. 
कालच्या विजयामुळे भारत सात गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला. भारताचा पुढचा सामना येत्या शनिवारी अफगाणिस्तानसोबत होणार आहे.
****

 नेदरलँडमध्ये आयोजित जागतिक तीरंदाजी स्पर्धेत भारताच्या पुरुष रिकर्व्ह संघानं रौप्य पदक पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात चीनच्या संघानं तरुणदीप राय, अतानु दास आणि प्रवीण जाधव यांच्या संघाला सहा -दोन अशा फरकानं पराभूत केलं. या स्पर्धेत भारतीय महिला संघानं दोन कांस्य पदाकांची कमाई केली.
****

 कोलकाता इथं डॉक्टरांना अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ आज देशभरात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी बंद पुकारला आहे. भारतीय वैद्यक संघटना - आयएमएच्या औरंगाबाद शाखेकडून ही माहिती देण्यात आली. चोवीस तासांच्या या बंद दरम्यान आपत्कालीन सेवा सुरु राहणार असल्याचं, संघटनेकडून सांगण्यात आलं.
*****
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 13 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...