Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 17
June 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जून
२०१९ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या या अधिवेशनात सर्व राजकीय पक्ष चर्चेत
सहभाग घेतील, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. सतराव्या लोकसभेचं
पहिलं सत्र सुरू होण्यापुर्वी ते आज संसद परिसरात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते.
संसदीय लोकशाही प्रणालीत सक्रीय विरोधी पक्ष आणि त्यांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचंही
पंतप्रधानांनी यावेळी नमुद केलं. दरम्यान, लोकसभेत सध्या सदस्यांचा शपथविधी सुरू आहे.
****
राज्य पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधीमंडळाबाहेर भाजपच्या नेतृत्वाखालील
सरकार लोकविरोधी असल्याची टीका करत आणि मंत्रिमंडळ विस्ताराविरुद्ध निदर्शनं केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी
पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आदींचा समावेश असलेल्या आमदारांनी
सरकारविरोधी घोषणा देत विकासाचं आश्र्वासन पूर्ण केलं जात नसल्याचा आरोप केला. विरोधी
पक्षांतून बाहेर पडलेल्यांना मंत्रिमंडळात समावीष्ट करण्यात सरकार गुंतलं असल्याची
टीकाही यावेळी करण्यात आली.
****
जम्मू
काश्मीर मधे कट्टर फुटीरतावादी नेत्यांना परदेशातून पैसा उपलब्ध होत असून त्याचा
वापर ते वैयक्तिक फायद्यासाठी करत असल्याचं एन.आय.ए.अर्थात राष्ट्रीय
तपास संस्थेनं म्हटलं आहे.
काश्मीरमधे फुटीरतावाद पसरवण्यासाठी पाकिस्तानातून पैसा मिळत
असल्याचं मान्य केल्याचं हुरीयत कॉन्फरनस्सह इतर संघटनांच्या नेत्यांशी चौकशी केल्यानंतर लक्षात
आल्याचं एन.आय.ए.म्हटलं आहे. दुखतरन-ए-मिलात संघटनेचे नेते असिया अंद्रावी यांनी
परदेशातून निधी गोळा करत असल्याची कबुली चौकशी दरम्यान दिल्याचं एन.आय.ए.नं म्हटलं
आहे.
****
आयएमए अर्थात भारतीय वैद्यकीय महासंघाने पश्चिम बंगालच्या
संपकरी डॉक्टरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी आज देशव्यापी संपाची हाक दिली आहे.
या संपात सुमारे साडे तीन लाख डॉक्टर्स सहभागी होतील असं आयएमएनं म्हटलं आहे. यामुळं
देशभरातल्या आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आपत्कालाईन सेवा वगळता बाह्य
रुग्ण विभागासह सर्व अनावश्यक सेवा सकाळी सहा वाजल्यापासून पुढले २४ तास बंद राहतील
असं आयएमएनं म्हटलं आहे.
****
येत्या
21 जूनला
साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तयारीला वेग आला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या योग दिवसाच्या मुख्य
कार्यक्रमाचं आयोजन झारखंडची राजधानी रांची इथं करण्यात आलं आहे. या कार्यक्रमामधे
सुमारे 30 हजारांहून अधिक लोक सहभागी होतील असा अंदाज आहे. यामधे योग संस्था,
योग गुरु यांच्यासोबत अनेक मान्यवरांचा सहभाग असेल. योगाच्या प्रसारासाठी
महत्त्वाचं योगदान देणाऱ्यांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते
प्रधानमंत्री योग पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
****
राज्यातल्या
शाळा उन्हाळी सुटीनंतर आजपासून सुरु झाल्या. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी
शाळांनी जय्यत तयारी केली होती. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत
पाठ्यपुस्तकांचं वाटप आणि माध्यान्ह भोजनात गोड पदार्थ देण्याचं शासनातर्फे
सांगण्यात आलं होतं. नाशिक शहरासह जिल्ह्यात आज सर्व मराठी शाळा सुरू झाल्या. शाळेत मुलं
येताच त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. पहिल्याच दिवशी संस्थाचालक
आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते गणवेषांचं वाटप करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यात माध्यमिक
शिक्षकांच्या नोकरीसाठी कृषी पदवीधारक उमेदवारही आता पात्र ठरणार आहेत. माध्यमिक
शिक्षकांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेतल्या मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या
पदव्यांमध्ये सुधारणा करुन काही नव्या पदव्यांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य
शासनानं घेतला आहे. या बाबत बारा जून रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात
आला आहे. त्यात कृषी पदवीचा समावेश केल्यानं राज्यातल्या हजारो कृषी पदवीधारकांना
दिलासा मिळणार आहे.
****
सांगली जिल्हा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी
आमदार विलासराव शिंदे यांचं काल अल्पशा आजाराने
निधन झाले. त्यांचे वय 84 वर्षांचे होते. विलासराव शिंदे हे 1978 ला वाळवा विधानसभा आणि 2004
ला सांगली-सातारा विधानपरिषद मतदार संघाचे आमदार होते. सांगली
जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपद त्यांनी
भूषवले.
****
वेगवान गोलंदाज भुवनेश्र्वरकुमार
विश्र्वचषक क्रिकेट स्पर्धेतीली किमान दोन सामने खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
काल मँचेस्टरमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याचा डावा गुडघा दुखावला होता.
त्यामुळं त्याला तिसरं षटक टाकत असताना मैदान सोडावं लागलं होतं.
*****
***
No comments:
Post a Comment