आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१७ जून २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
लोककल्याण सर्वांसाठी प्राधान्याचा विषय असेल, अशी
आपल्याला आशा असून विरोधी पक्षांचा प्रत्येक शब्द आपल्याकरता महत्वाचा असल्याचं प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभाप्रसंगी
आज केलं. ते संसद परिसरात अधिवेशनासाठी आले असता माध्यमांशी संवाद साधत होते. राज्यसभेचं
अधिवेशन गुरुवारपासून सुरु होईल. संसदेचं हे पावसाळी अधिवेशन 26 जुलैपर्यंत चालणार
आहे. या सत्रात लोकसभेत 30 तर राज्यसभेत 27 बैठका होतील.
****
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु
होत असून, या अधिवेशनात एकूण 28 विधेयकं चर्चेला घेण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. या अधिवेशनात
तेरा नवीन विधेयकं आणि पंधरा प्रलंबित विधेयकं चर्चेला घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. काल मंत्रीमंडळात सहभागी झालेले 13 सदस्य जबाबदारीनं उत्तम काम करतील असा
विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
****
कोलकाता इथं डॉक्टरांना अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ
आज देशभरात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी बंद पुकारला आहे. भारतीय वैद्यक संघटना
- आयएमएच्या औरंगाबाद शाखेकडून ही माहिती देण्यात आली. चोवीस तासांच्या या बंद दरम्यान
आपत्कालीन सेवा सुरु राहणार असल्याचं, संघटनेकडून कळवण्यात आलं आहे.
****
गडचिरोली
जिल्ह्यात जांभूळखेडा इथं महाराष्ट्र दिनी झालेल्या भूसुरुंगस्फोट प्रकरणी आणखी दोन
नक्षलवाद्यांना काल अटक करण्यात आली. दिलीप हिडामी आणि परसराम तुलावी
अशी या दोघांची नावं आहेत. त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणात नक्षल साहित्य सापडलं असून
न्यायालयानं दोघांना बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
***
अहमदनगर
जिल्ह्यात काल एका महिलेसह दोन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. कर्जत तालुक्यातल्या
घुमरी इथं ही दुर्घटना घडली. शेततळ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका ३० वर्षीय महिलेच्या
अनुक्रमे सात आणि पाच वर्षांच्या मुली शेततळ्यात पडल्या, त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात
या महिलेचाही मृत्यू झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment