Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17
June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात
झाली. अधिवेशाच्या सुरुवातीलाच विधानभवन परिसरात विरोधक आणि सत्ताधारी आमने–सामने आले
आणि कालच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत आणि दुष्काळावर त्यांनी जोरदार घोषणा बाजी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम नवीन मंत्र्यांच्या परिचय करुन दिला. तसंच
अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी काल राजीनामा दिलेल्या सहा मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले.
त्याशिवाय गिरीश बापट, अनिल गोटे, राधाकृष्ण विखे पाटील, प्रतापराव चिखलीकर, उन्मेश
पाटील, हेमंत पाटील तसंच सय्यद इमतियाज जलील यांचे राजीनामेही स्वीकारले. विधान परिषदेत
आज पहिल्याच दिवशी अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी २०१८-१९ चा राज्याचा आर्थिक पाहणी
अहवाल मांडला अहवालातील आकडेवारीची वस्तुस्थिती पडताळून पाहण्यासाठी समिती नेमावी अशी
मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. देशाच्या विकासदाराचा आकडा फुगवून सांगितलेला
असून त्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आक्षेप मुंडे यांनी यावेळी घेतला. याला उत्तर
देताना अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी स्थिर किंमतीवर
आधारित असल्यामुळं त्यात कोणताही बदल करण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हटलं.
****
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज विधीमंडळात सादर झाला.
२०१८-१९ च्या अंदाजानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत सात पूर्णांक पाच दशांश टक्के वाढ अपेक्षित आहे. गेल्या
वेळी देखील इतकाच म्हणजे सात पूर्णांक पाच दशांश टक्क्यांनी अर्थव्यवस्था वाढण्याचा
अंदाज वर्तवण्यात आला होता. कृषीच्या दरात दोन पूर्णांक आठ दशांश टक्क्यांची घट अपेक्षित
असून कृषी दर चार टक्के असण्याचं पुर्वानुमान आहे. उद्योग क्षेत्रातही सात टक्क्यांनी
घट अपेक्षित आहे. सेवा क्षेत्राच्या दरात नऊ पूर्णांक दोन दशांश टक्के इतकी वाढ होण्याचं
पुर्वानुमान आहे.
****
सतराव्या लोकसभेच्या पहिल्या सत्राला आज सुरुवात झाली.
हंगामी सभापती डॉ. विरेंद्र कुमार यांनी सभासदांना शपथ दिली. सर्वप्रथम पंतप्रधान आणि
सभागृह नेते नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली आणि सभासदांचं स्वागत केलं. त्यानंतर राजनाथ
सिंग, अमित शहा, नितीन गडकरी, डी.व्ही. सदानंद गौडा, हरसिम्रत कौर बादल, रवी शंकर प्रसाद,
संतोष गंगवार तसंच राहुल गांधी यांच्यासह इतरांनी खासदारपदाची शपथ घेतली.
****
दक्षिण काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यातल्या अच्छाबल
परिसरात दहशतवाद्यांशी चकमकीत एक मेजर शहीद झाले असून अन्य एक मेजर आणि दोन सैनिक आज
जखमी झाले आहेत. जखमींना लष्कराच्या श्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची
माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील या भागात दहशतवादी लपून बसले असल्याची
माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली असता ही चकमक उडाल्याचं अधिकाऱ्यांनी
म्हटलं आहे.
****
कोलकत्ता इथं डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ
भारतीय वैद्यक संघटनेनं पुकारलेल्या आजच्या बंदमध्ये औरंगाबाद, परभणी, हिंगोली तसंच
नाशिक पालघर, कोल्हापूर, वाशीम जिल्ह्यांत बहुतांश खाजगी दवाखाने बंद आहेत. औरंगाबाद
जिल्हयात सुमारे पंधराशे डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले. परभणीत डॉक्टरांनी या आंदोलनानिमित्त
काढलेल्या फेरीत सर्व वैद्यकीय संघटनांनी सहभाग घेतला.
****
भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मतदान यंत्र-
`ईव्हीएम` हटवून मतपत्रिकेद्वारे मतदान असावं, या मागणीसाठी औरंगाबाद, परभणी, हिंगोली
इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज घंटानाद आंदोलन केलं. आगामी विधानसभा, जिल्हा परिषद
आणि नगरपरिषदेची निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावी या प्रमुख मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना
देण्यात आलं.
****
येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात
तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तसंच दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी, उत्तर कोकणात
अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी
पदाचा दुरूपयोग करून भष्ट्राचार केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षानं
महानगरपालिकेसमोर आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. आंदोलकांनी यावेळी घोषणाबाजी
करत महापौरांच्या प्रतिमेला काळं फासलं.
****
बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव तालुक्यात सुटाळा इथं आज महसूल विभाग आणि पोलिसांच्या कारवाईत स्वस्त
धान्य दुकानदारांकडून काळ्याबाजारात जाणारा ५० किंटल गहू जप्त करण्यात आल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment