Tuesday, 18 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.06.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ जून २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  सतराव्या लोकसभेच्या पहिल्या सत्राला कालपासून सुरुवात; विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही प्रारंभ
Ø  आर्थिक पाहणी अहवाल विधीमंडळात सादर; आज अर्थसंकल्प सादर होणार
Ø  योग प्रशिक्षण हा तज्ज्ञांनी पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून स्वीकारावा - राज्यपालांचं आवाहन
आणि
Ø  भारतीय वैद्यक संघटनेच्या चोवीस तासांच्या बंदला बहुतांश डॉक्टरांचा प्रतिसाद

****

 सतराव्या लोकसभेच्या पहिल्या सत्राला कालपासून सुरुवात झाली. लोकसभेचे हंगामी अध्यक्ष डॉ. वीरेंद्र कुमार यांनी नवनिर्वाचित खासदारांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. काही खासदारांना आज शपथ दिली जाणार आहे.

 दरम्यान, लोकसभेच्या या सत्रात उद्या लोकसभा अध्यक्षांची निवड होईल, परवा गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन्ही सदनांच्या संयुक्त सभेला संबोधित करतील. तर येत्या पाच जुलैला, चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्यसभेच्या सत्राला गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे.

दरम्यान, या सत्राला प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधानांनी काल संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना, विरोधी पक्ष यंदा कामकाजात सक्रीय सहभागी होईल, अशी आशा व्यक्त केली.
****

 भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते जे पी नड्डा यांची निवड करण्यात आली आहे. काल नवी दिल्लीत पक्षाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं, नड्डा यांना कार्यकारी अध्यक्ष करण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. विरोधकांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि दुष्काळाच्या मुद्यावरून जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मंत्र्यांचा परिचय करुन दिला. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी राजीनामा दिलेल्या सहा मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले. त्याशिवाय गिरीश बापट, अनिल गोटे, राधाकृष्ण विखे पाटील, प्रतापराव चिखलीकर, उन्मेश पाटील, हेमंत पाटील तसंच सय्यद इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव यांचे राजीनामेही स्वीकारल्याचं, बागडे यांनी सांगितलं.

 राज्याचा २०१८-१९ चा आर्थिक पाहणी अहवाल काल विधान सभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर विधान परिषदेत अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सादर केला. या अहवालात, २०१८-१९ च्या अंदाजानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत सात पूर्णांक पाच दशांश टक्के वाढ अपेक्षित आहे. कृषीच्या दरात दोन पूर्णांक आठ दशांश टक्के तर उद्योग क्षेत्रात सात टक्क्यांनी घट अपेक्षित आहे. सेवा क्षेत्राच्या दरात नऊ पूर्णांक दोन दशांश टक्के इतकी वाढ होण्याचा अंदाज आहे. २६ टक्क्यांपेक्षा अधिक सरकारी जागा रिकाम्या असल्याचं, या अहवालातून स्पष्ट झालं आहे. गेल्या आर्थिक वर्षात सतरा लाख ८४ हजार घरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम उपलब्ध करून दिल्याची माहिती, या अहवालात देण्यात आली आहे. अहवालातील आकडेवारीची वस्तुस्थिती पडताळून पाहण्यासाठी समिती नेमावी अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

दरम्यान, आज विधिमंडळात चालू आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.
****

 योग प्रशिक्षण हा पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून स्वीकारावा असं आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी योग शिक्षकांना केलं आहे. येत्या शुक्रवारी साजऱ्या होणाऱ्या जागतिक योगदिनाच्या पार्श्वभूमीवर, काल मुंबईत एका योग प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. संतुलित शरीर, मन आणि स्वास्थासाठी योग हा उत्तम असल्यानं, तणावमुक्त राहण्यासाठी सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये योगाचा समावेश करणं आवश्यक असल्याचंही राज्यपाल म्हणाले.
****

 राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येईल, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. काल मुंबईत सौरऊर्जे संदर्भात एका कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राज्यातल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांनी पथदिव्यांसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
****

 महिलांना स्वावलंबी करायचं असेल तर त्यांचा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विकास झाला पाहिजे असं मत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केलं आहे. महिला आयोगाच्यावतीनं प्रज्ज्वला योजने अंतर्गत काल नाशिक इथं महिला मेळावा घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. महिलांनी आर्थिक साक्षर झालं पाहिजे असं रहाटकर यांनी नमूद केलं.
**** 

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल मुंबईत प्रधानमंत्री तसंच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतल्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत आतापर्यंत २३ हजार ७४६ किलोमीटर तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत १० हजार ६४८ किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं.
****

 कृषी सहायकासाठी ग्रामपंचायत अथवा तलाठी कार्यालयामध्ये स्वतंत्र बैठक व्यवस्था करावी असे निर्देश कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी काल दिले. कृषी सहायकांशी संवाद साधण्यासाठी ऑडिओ ब्रिज यंत्रणा राबवावी, तसंच कृषिमित्रांना प्रशिक्षण देण्यासाठी आराखडा, मोबाईल ॲप तयार करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
*****

 राज्यात माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी कृषी पदवीधारक उमेदवार ही आता पात्र ठरणार आहेत. माध्यमिक शिक्षकांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेतल्या मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदव्यांमध्ये सुधारणा करुन काही नव्या पदव्यांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. या बाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला.
****

 कोलकाता इथं डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय वैद्यक संघटना- आयएमएनं काल सकाळी सहा वाजेपासून चोवीस तासांचा बंद पुकारला होता. या बंदमध्ये औरंगाबाद, परभणी, हिंगोली तसंच नाशिक पालघर, कोल्हापूर, वाशीम जिल्ह्यांतले बहुतांश खाजगी दवाखान्यातले डॉक्टर सहभागी झाले. औरंगाबाद जिल्हयात सुमारे पंधराशे डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले. परभणीत डॉक्टरांनी या आंदोलनानिमित्त काढलेल्या फेरीत सर्व वैद्यकीय संघटनांनी सहभाग घेतला. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा तयार करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
****

क्रिकेट
 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल, अत्यंत चुरशीच्या सामन्यात बांग्लादेशानं वेस्ट इंडिजचा सात गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करून वेस्ट इंडीजनं दिलेलं तब्बल ३२२ धावांचं आव्हान, बांग्लादेशानं ४२ व्या षटकात पूर्ण केलं. या स्पर्धेतलं आपलं दुसरं शतक पूर्ण करणारा शकिब अल हसन यानं लिटॉन दास सह केलेली १३५ चेंडूतली नाबाद १८९ धावांची भागीदारी या सामन्यात निर्णायक ठरली. गुणतालिकेत बांग्लादेश आता पाचव्या स्थानी आहे.

दरम्यान, या स्पर्धेत आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघात सामना होणार आहे.
****

 राज्यातल्या अकरा क्रीडा प्रबोधिनींमध्ये विविध खेळांचं मोफत प्रशिक्षण दिलं जातं, या प्रशिक्षणासाठी सरळ प्रवेशाकरता चाचणी घेण्यात येणार आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन क्रीडा विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. येत्या २४ जून पासून चाचणी प्रक्रिया सुरू होत असल्याचं याबाबतच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटलं आहे.
****

 उन्हाळी सुटीनंतर राज्यातल्या शाळा कालपासून पुन्हा सुरु झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांचं समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं रांगोळ्या काढून, फुलं आणि खाऊ देऊन स्वागत करण्यात आलं. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना गणवेश तसंच पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं. लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढली.
****

 परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या ढेंगळी पिंपळगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेतली शैक्षणिक पातळी खालावत असून विद्यार्थ्यांची संख्याही कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर काल पालकांनी शाळेतल्या मुख्याध्यापकांची भेट घेतली. शाळेतले शिक्षक आणि शाळेतली सदोष शिक्षण पद्धती याला कारणीभूत असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.
****

 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र- `ईव्हीएम` हटवून मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात यावं, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघानं औरंगाबाद, परभणी, हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल घंटानाद आंदोलन केलं. आगामी विधानसभा, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेची निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावी या प्रमुख मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
****

 जालना जिल्ह्यात विहिरीत स्फोट करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये जिलेटीन कांड्यांचा स्फोट होऊन दोन जण गंभीर जखमी झाले. घनसावंगी तालुक्यातल्या लिंगेसावडी इथं काल सायंकाळी ही दुर्घटना घडली. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
****

 औरंगाबाद महापलिकेच्या नागरी मित्र पथकानं गेल्या दोन दिवसात ६५ दुकानदारांकडून सव्वाशे क्विंटल प्लॅस्टिक जप्त केलं. या कारवाईत ५८ हजार ९०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
****

 औरंगाबाद शहर परिसरात काल सायंकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसानं वाहनचालकांची तारांबळ उडाली.

उस्मानाबाद जिल्ह्यात अद्याप पावसानं हजेरी लावलेली नाही, शेतकरी वर्ग पावसाची प्रतीक्षा करत आहे. पाण्यासाठीही नागरिकांचे हाल होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 दरम्यान, मराठवाड्यातल्या काही भागात आज पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****

 औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी पदाचा दुरूपयोग करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षानं महानगरपालिकेसमोर काल एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. आंदोलकांनी यावेळी घोषणाबाजी करत महापौरांच्या प्रतिमेला काळं फासलं.

*****
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 13 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...