Monday, 8 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 08.07.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जुलै २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  साखर कारखान्यांनी इथेनॉलसह उपपदार्थांच्या निर्मितीकडे वळण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
Ø  ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदाचा तर मिलिंद देवरा यांचा मुंबई काँग्रेसच्या  अध्यक्ष पदाचा राजीनामा
Ø  कृषी विभागाच्या विविध योजनांचा समावेश असलेलं एकात्मिक मॉड्यूल तयार करणार- कृषी मंत्री
आणि
Ø  राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस; नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीला पूर
****

 राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक असणाऱ्या साखर उद्योगास अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखर कारखान्यांनी इथेनॉलसह उपपदार्थांच्या निर्मितीकडे वळण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पुणे इथं झालेल्या साखर परिषदेच्या समारोपप्रसंगी ते काल बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यासाठी विशेष मंत्री गट स्थापन करण्यात येईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****

 कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुरू झालेलं राजीनामा सत्र अजून थांबलेलं नाही. कॉँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे आणि  मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीदेखील काल आपल्या पदांचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल मान्य आहे. त्याची जबाबदारी स्वीकारत पक्षाला मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर कार्यरत राहणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.

 तसंच, भाजप शिवसेने बरोबरच महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव रोखणं पक्षासमोरचं मोठं आव्हान आहे, असं देवरा यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे. मुंबई कॉँग्रेसची धुरा तीन सदस्यीय गटावर सोपवण्याची शिफारसही त्यांनी केली आहे. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देवरा यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात ली होती.
****

 मराठा आरक्षण, कायद्याच्या सर्व कसोटीवर खरं उतरेल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या निर्णय प्रक्रियेत, सक्रीय योगदान दिलेल्या मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यात कोल्हापूर इथं काल ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकावं यासाठी निष्णात कायदेतज्ञांचं सहकार्य घेऊन राज्य शासनानं आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरु केल्या असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****

 प्रधानमंत्री पीक विमा योजना, हवामान धारित फळ पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, मागेल त्याला शेततळे, शेततळे अस्तरीकरण, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा आदी कृषी विभागाच्या योजनांचा समावेश असलेलं एकात्मिक मॉड्यूल तयार करण्यात येणार असून,  शेतकरी कुटुंबाचा सर्वांगीण विकास हाच या मॉड्यूलचा उद्देश असल्याचं कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं कृषी विभागाच्या आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी काल ते बोलत होते.

 औरंगाबाद, जालना आणि  बीड हे अवर्षणग्रस्त जिल्हे आहेत. या ठिकाणी अपुरा पाऊस पडलेला आहे. शेतकऱ्यांना पेरणी दरम्यान तसंच पेरणीनंतर कोणत्याही स्वरुपाच्या अडचणींना सामोरं जावं लागू नये, यासंदर्भात कृषी अधिकाऱ्यांना याबाबत  निर्देश दिले आहेत असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना विमा नाकारणाऱ्या कंपन्याविरूद्ध कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.  
****

 पावसाच्या पाण्याची साठवण करुन जलसंवर्धनातून किमान एक जलाशय पुनरुज्जीवित करण्यासाठी देशातल्या सर्व नगरपालिका आणि महापालिकांनी विशेष गट स्थापन करावा, असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. भूजलाचा ऊपसा आणि पुनर्भरण या प्रक्रियांकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयातर्फे प्रसिद्ध झालेल्या दिशानिर्देशांमधे म्हटलं आहे. याबाबतची माहिती, सर्वांना कळावी म्हणून जाहीर ठिकाणी प्रसिद्ध करावी, असंही त्यात स्पष्ट केलं आहे. गेल्या एक जुलैपासून सुरु झालेल्या जलशक्ती अभियानाचा भाग म्हणून हे दिशानिर्देश जारी करण्यात आले असून या अभियानाचा पहिला टप्पा येत्या १५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 राज्याच्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला, नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, आणि निफाड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे, उपनद्या आणि नाल्यांचं पाणी वाहून आल्यानं रामकुंड परिसरातले सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. पावसामुळे सोमेश्वर धबधबादेखील वाहू लागल्यानं काल रविवारी सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. नांदूर- मधमेश्वर बंधाऱ्यातून काल सायंकाळी आठ हजार सत्तर घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

 जळगाव जिल्ह्यातही काल दिवसभर पाऊस होता. हतनूर पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यानं या धरणातून करण्यात येत असलेला विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे. पुण्यातल्या पवना, खडकवासला, पानशेत, वरसगार, टेमघर धरण परिसरातही चांगला पाऊस झाला. कोयना धरणाच्या जलसाठ्यातही चांगली वाढ झाली आहे.

 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून काल चंदगड, गगनबावडा, शाहूवाडी, तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पंचगंगा आणि भोगावती नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. जिल्ह्यातले २० बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातून मुळा नदी तुडुंब भरून वाहत आहे. भंडारदरा परिसरातही जोरदार पाऊस होत असून मुळा नदीवरचा पिंपळगाव खांड प्रकल्प भरला आहे. वाकी, शिरपुंजे आणि कोथळे लघु पाटबंधारे तलाव काल सकाळी पू्र्ण क्षमतेनं भरले. कोकणातही काल अनेक भागात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बहुतांशी नद्यांना पूर आला आहे.

 दरम्यान, कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
****

      औरंगाबाद आदर्श शहर करण्यासाठी जनतेनं स्वतःच्या अधिकारांची जाणीव ठेवावी आणि लोकप्रतिनिधींना प्रतिप्रश्न करण्याचा आपला अधिकार अबाधित ठेवावा असं आवाहन खासदार इम्तियाज जलिल यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं कालऔरंगाबाद जिल्ह्याचा विकास:संधी आणि समस्या  या विषयावर प्राध्यापक अविनाश डोळस सामाजिक प्रतिष्ठानतर्फे जलिल यांचं व्याख्यान झालं, त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद शहराची संवेदनशील शहर म्हणून असलेली प्रतिमा सुधारून ते विकसित शहर म्हणून करण्याची हीच योग्य वेळ असल्याचंही त्यांनी यावेही सांगितलं.
****

      औरंगाबाद इथं काल, भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला. याप्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष-केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर भागवत कराड, यांसह अन्य पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना दानवे यांनी भाजपला औरंगाबाद जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आणण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं.
****

 उस्मानाबाद इथं एकता फाउंडेशन आणि अन्नपूर्णा ग्रुपच्यावतीनं आयकर विभागाचे सहआयुक्त विश्वास मुंडे यांच्या उपस्थितीत काल वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, आई गोशाळेचे अध्यक्ष सतीश सोमाणी, अन्नपूर्णा ग्रुपचे अध्यक्ष अतुल अजमेरा, एकता फाऊंडेशचे अध्यक्ष अमित कदम, तसंच जिल्हा पोलिस अधिक्षक आर.राजा यांची प्रमुख उपस्थिती होती.

हरिनामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाचा गजर करत देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या देहूच्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं. पुणे जिल्ह्यातल्या शेवटच्या मुक्कामी सराटी गावाजवळ नीरा नदीच्या पात्रात काल सकाळी तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. त्यानंतर सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी पालखीचं स्वागत केलं. पालखीचा मुक्काम काल अकलूज शहरात होता.
 ****

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास युसुफ नायकवडी यांचं सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गट शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं. १९७८ साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नायकवडी यांच्या पार्थिवावर काल रात्री मिरज इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 24 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...