Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 09 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ जुलै
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø राज्यातल्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विम्याची रक्कम तात्काळ देण्याची कृषी मंत्र्यांची
केंद्र सरकारकडे मागणी
Ø शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन कमी करण्यासंदर्भात नव्यानं दिशानिर्देश
देण्याची आवश्यकता नसल्याचं, मुंबई उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण
Ø राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात तीन
टक्क्यांनी वाढ
Ø विधानसभेच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मागणी
आणि
Ø विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा न्यूझीलंड
सोबत उपांत्य फेरीचा सामना
****
राज्याच्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विम्याची
रक्कम तात्काळ देण्याची मागणी, राज्याचे कृषी मंत्री डॉ.
अनिल बोंडे यांनी केली आहे. नवी दिल्ली इथं केंद्रीय
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीनं आयोजित राज्यांच्या कृषी मंत्र्यांच्या
परिषदेत ते काल बोलत होते. कापसाला देण्यात आलेला किमान
हमी भाव कमी असून तो ५०० रुपयांनी वाढवण्याची
मागणीही त्यांनी यावेळी केली. राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘एकात्मिक शेतकरी कल्याण योजना’ राबवण्यात येणार असल्याचंही बोंडे म्हणाले.
****
मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या
निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार
आहे. राज्य सरकारनं मराठा
समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गांतर्गत सोळा टक्के आरक्षणाचा कायदा संमत
केला होता, मुंबई उच्च न्यायालयानं, या
कायद्यावर शिक्कामोर्तब करत, मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के
तर नोकरीत १३ टक्के आरक्षण असावं, असं सांगितलं होतं.
राज्य विधिमंडळानं, त्यानुसार कायद्यात बदलही केला
आहे. न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
देण्यात आलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात
कॅव्हिएटही दाखल आहे.
****
शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन कमी करण्यासंदर्भात
नव्यानं दिशानिर्देश देण्याची आवश्यकता नसल्याचं, मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. यासंदर्भात
दाखल याचिकेवर काल झालेल्या सुनावणीत, मुख्य न्यायमूर्ती प्रदीप
नंद्राजोग आणि न्यायमूर्ती एन एम जमादार यांच्या पीठानं, शालेय
विद्यार्थ्यांच्या दप्तरात अनावश्यक ओझं असल्याचं, वाटत नाही,
असं नमूद केलं. याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन, शालेय अभ्यासक्रमाचा आढावा घ्यावा, आणि काही आक्षेप असल्यास,
ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावेत, अशी
सूचना न्यायालयानं केली आहे.
****
राज्यातल्या २९७ धरणांची तात्काळ दुरुस्ती आवश्यक असल्याचं,
धरण सुरक्षा संदर्भातल्या अहवालात म्हटलं आहे. उर्वरित एक हजार पंचावन्न धरणांच्या बाबतीत किरकोळ देखभालीची गरज या अहवालातून
वर्तवली आहे. राज्यातल्या एक हजार तीनशे अठ्ठावन्न धरणांची पावसाळ्यापूर्वी
आणि पावसाळ्यानंतर अशी वर्षातून दोनदा तपासणी होत असल्याचं, या
अहवालात म्हटलं आहे.
****
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात तीन टक्क्यांनी
वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता हा महागाई भत्ता ९ टक्क्यांहून १२ टक्के
इतका झाला आहे. वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी
ही माहिती दिली. या बाबतचा शासननिर्णय वित्त विभागानं काल निर्गमित
केला असून १ जानेवारी २०१९ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ
वेतनावर हा महागाई भत्ता देय आहे. ही वाढ
चालू महिन्यापासून रोखीनं देण्यात येईल तर १ जानेवारी ते ३० जून २०१९ या कालावधीतील
थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित केले जातील असंही मुनगंटीवार म्हणाले.
****
राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुका इलेक्ट्रॉनिक
मतदान यंत्रांऐवजी, मतपत्रिकेवर
घ्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज
ठाकरे यांनी केली आहे. ठाकरे यांनी काल नवी दिल्लीत मुख्य निवडणूक
आयुक्त सुनील अरोरा यांची भेट घेऊन, त्यांना हे निवेदन सादर केलं.
आपण दिलेलं मत अपेक्षित उमेदवारांना मिळतं की नाही, या बाबत मतदारांमध्ये असलेली साशंकता, तसंच नोंदवलेल्या आणि प्रत्यक्षात मोजलेल्या
मतांमध्ये तफावतीच्या तक्रारी, या पार्श्वभूमीवर जुन्या पद्धतीनं
मतपत्रिकेवर मतदान घ्यावं, असं ठाकरे यांनी या निवेदनात म्हटलं
आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी काल सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी
जाऊन भेट घेतली. राज्यात होणाऱ्या विधानसभा
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेली ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर अद्याप कायम
असून मुंबई आणि परिसरात काल जोरदार पाऊस झाला, या पावसामुळं मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर
पाणी साचल्यानं, सुमारे वीस
मिनिटांसाठी धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती.
दरम्यान, आज
दिवसभरही मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली
असून प्रशासनानं नागरिकांना सर्तकतेचं आवाहन केलं आहे.
रायगड जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत
झालं आहे. जिल्ह्यातल्या उल्हास, पाताळगंगा,
सावित्री, गांधारी या नद्या देखील धोक्याच्या खुणेजवळून
वाहत आहेत. जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नाशिक शहरात पाऊस थांबला असला तरी जिल्ह्यात अनेक भागात
पाऊस सुरूच असून या पावसानं त्र्यंबकेश्वर, पेठ आणि येवला या तीन ठिकाणी २७ घरांचं नुकसान झालं तर चार जनावरं वाहून गेली. पावसामुळं जिल्ह्यातल्या धरण साठ्यात वाढ झाली असून हा साठा
१४ टक्के इतका झाला आहे. गंगापूर धरणाचा पाणीसाठा ३९ टक्के इतका
झाला आहे. या पावसामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीत ३ हजार १५५ घनफूट प्रतिसेकंद या
वेगानं पाणी येत आहे. जळगाव जिल्ह्यातही चांगला
पाऊस झाला. हतनूर धरणाचे
नऊ दरवाजे उघडल्यामुळे तापी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा आणि निळवंडे धरण क्षेत्रातही जोरदार
पाऊस झाल्यामुळे भंडारदरा धरण ३० टक्के भरलं आहे. लातूर शहरातही काल
मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला तर हिंगोली जिल्ह्यात
सर्वत्र दमदार पाऊस पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा
जोर कायम असून या पावसामुळं
राधानगरी धरण ४५ टक्के भरले आहे तर कोदे धरण पुर्णपणे भरलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विश्वचषक क्रिकेट
स्पर्धेत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारताचा आज न्यूझीलंड सोबत पहिला
उपांत्य सामना होणार आहे. दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान येत्या गुरुवारी खेळला
जाणार असून, स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे.
ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत पाच वेळा विश्वचषक जिंकला असून भारतानं १९८३
आणि २०११ या वर्षीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे. न्यूझीलंड
आणि इंग्लंड संघ अद्याप एकदाही विश्वचषक जिंकू शकलेले नाहीत.
****
औरंगाबाद विमानतळावरील हवाई वाहतूक वाढवण्यासंदर्भात
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची शिष्टमंडळासह दिल्लीत उद्या संध्याकाळी
सहा वाजता उड्डायन मंत्रालयाच्या प्रधान सचिवांसोबत बैठक होणार आहे. औरंगाबाद विमानतळ लहान शहरांना जोडण्यासाठी
या बैठकीत निर्णय होण्याची अपेक्षा असल्याचं मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड यांनी सांगितलं आहे. विमान कंपन्यांचे मालक, संचालक, राज्यमंत्री अतुल सावे, जिल्ह्यातील उद्योजक,
हॉटेल व्यावसायिक, मसिआचे पदाधिकारी उपस्थित राहणार
असल्याचंही कराड यांनी सांगितलं.
****
वेगवेगळ्या जिल्ह्यात देशी- विदेशी दारू तसंच चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या आणि दरोडा घालणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला पकडण्यात औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना यश आलं
आहे. या टोळीनं नुकताच सिल्लोड तालुक्यात डोंगरगाव फाटा इथल्या तीन सुतगिरण्यांमध्ये
दरोडा घातल्याचं कबूल केल्याची माहिती पोलिस अधिक्षक मोक्षदा
पाटील यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना दिली. औरंगाबाद, जालना
आणि बुलडाणा जिल्ह्यातही विविध ठिकाणी या टोळीनं मद्य तसंच वाहनांची चोरी केल्याची
कबुली दिल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात धर्माच्या नावावर मत मागितले
म्हणून शेख नदीम यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठात याचिका दाखल केली आहे. राज्य घटनेच्या कलम १२३ नुसार
धर्माच्या आधारावर मत मागता येत नसल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी सांगत निवडणूक
रद्द करण्याची मागणी केली आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव इथं महिलांनी काल
नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं. पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची मुदत ३०
जून रोजी संपल्यानं, टंचाईच्या स्थितीचा कोणताही आढावा न घेता
थेट, टँकर बंद करण्यात आल्यानं, हे आंदोलन
करण्यात आलं. मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी तातडीने टँकर सुरू
करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब नगर
परीषदेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक शिवाजी कराळे यांनी
भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
****
जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मंडळाधिकारी
भागेश भार्डीकर आणि तलाठी श्रीकृष्ण गुलापल्ली यांना १४ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत विभागानं काल
अटक केली. सातबारा उताऱ्यावर चुकीच्या नावात
दुरुस्ती करून फेर घेण्यासाठी दोघांनी मिळून तक्रारदाराकडे २४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, त्यातील १४ हजार रूपये स्वीकारतांना ही अटक करण्यात आली.
****
जालना जिल्ह्यात टिप्पर आणि दुचाकीच्या
अपघातात तीन जण ठार झाले. मंठा-तळणी रस्त्यावर रविवारी रात्री उशीरा
ही दुर्घटना घडली. अंधारात उभ्या असलेल्या टिप्परवर दुचाकी मागून
धडकून हा अपघात झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment