Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 13 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ जुलै
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
v मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
v केंद्र सरकारच्या महसूली उत्पन्नात ११
पूर्णांक १३ शतांश टक्क्यांनी वाढ
v भारतीय स्टेट बँकेकडून NEFT आणि RTGS व्यवहारांवरील शुल्क रद्द
v शासनाचा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक म. रा.
जोशी यांना जाहीर
आणि
v आषाढी एकादशीचा उत्सव सर्वत्र भक्तिभावानं साजरा
****
मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं
नकार दिला आहे. याप्रकरणी
मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या दोन याचिकांवर काल न्यायालयात सुनावणी
झाली, या याचिकांसंदर्भात दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं, राज्य
सरकारला दिले आहेत. मात्र हे आरक्षण २०१४ पासून पूर्वलक्षी प्रभावानं
लागू करता येणार नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाअंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा
महाराष्ट्र राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं वैध ठरवत, शिक्षणात बारा टक्के तर नोकरीत तेरा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय दिला
होता. या निर्णयाला दोन याचिकांच्या माध्यमातून
सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.
****
केंद्र सरकारच्या महसूली उत्पन्नात ११ पूर्णांक
१३ शतांश टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी
दिली आहे. त्या काल राज्यसभेत
अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होत्या. यंदा सरकारला कराच्या
रुपात साडे सोळा लाख कोटी रुपये महसुली उत्पन्न मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.
पुढच्या पाच वर्षांत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात शंभर लाख कोटी रुपयांची
गुंतवणूक करण्याचं सरकारचं उद्दीष्ट आहे, आर्थिक विकासाचा मार्ग
अधिक बळकट करण्यासंदर्भात कोणतीही तडजोड न करता, या अर्थसंकल्पातून
गुंतवणूक वाढण्यास चालना मिळेल, असा विश्वास अर्थमंत्री सीतारामन
यांनी व्यक्त केला.
****
देशातल्या सर्व रेल्वे गाड्यांचे जुने डबे बदलून आधुनिक डबे जोडण्याचा
प्रयत्न असल्याचं, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.
अर्थसंकल्पात रेल्वेसाठीच्या तरतुदींवर लोकसभेत झालेल्या चर्चेला ते
काल उत्तर देत होते. नव्या डब्यांमुळे अपघातातली जीवित हानी टाळता येईल, असा विश्वास गोयल यांनी वर्तवला.
****
प्रत्येकानं आपापली वैयक्तिक
ऑक्सिजन बँक तयार करण्यासाठी आयुष्यात किमान पाच झाडं लावावी
आणि जगवावी असं आवाहन, केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश
जावडेकर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘वन महोत्सव
मोहीम -२०१९’ अंतर्गत काल नवी दिल्लीत महाराष्ट्र सदन
परिसरात वृक्षारोपण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील,
ओमप्रकाश राजेनिंबाळकर, राज्यमंत्री अर्जुन
खोतकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी वृक्षारोपण केलं.
****
राज्यात दूध तसंच इतर अन्न पदार्थातल्या होणाऱ्या
भेसळीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी
अधिकाऱ्यांनी कृतीशीलपणे काम करण्याचे निर्देश अन्न तसंच औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. मुंबईत अन्न आणि औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक काल झाली, त्यावेळी ते बोलत होते. दूध,
तेल, मिठाई यासारख्या अन्न पदार्थांतली भेसळ ही
गंभीर बाब असून ती रोखण्यासाठी जबाबदारीने काम करायला हवं असं ते म्हणाले.
****
कर्नाटकातल्या दहा बंडखोर आमदारांच्या राजीनामा
तसंच अपात्रतेच्या बाबतीत 'जैसे थे' ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा
अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांना काल दिले.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या एका खंडपीठाने
हा निर्णय दिला. यासंदर्भातली पुढील सुनावणी येत्या १६
तारखेला होणार आहे.
दरम्यान,
कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी तयार असल्याचं मुख्यमंत्री
एच डी कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी यासाठी
तारीख निश्चित करावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गोवा राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार
आहे. आज दुपारी तीन वाजता नवीन मंत्र्यांचा शपथग्रहण सोहळा होणार आहे.
****
रिझर्व्ह बँकेने NEFT आणि RTGS व्यवहारांवरील
शुल्क रद्द केल्यानंतर भारतीय स्टेट बँकेनेही या सेवांवरील शुल्क रद्द केले आहे.
योनो अॅप, इंटरनेट बँकिंग तसंच मोबाइल बँकिंगद्वारे
१ जुलै पासून केलेल्या NEFT आणि RTGS व्यवहारांवर
कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. बँक १ ऑगस्ट पासून
IMPS सेवेसाठी आकारण्यात येणारे शुल्कही रद्द करणार आहे.
केंद्र सरकारचं डिजीटल अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठण्यासाठी स्टेट बँकेनं हा
निर्णय घेतल्याचं, भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक पी.
के. गुप्ता यांनी सांगितलं.
****
इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेला येत्या
बुधवारपासून सुरूवात होत आहे. दहावीची पुरवणी परीक्षा १७ ते ३० जुलै दरम्यान तर इयत्ता
बारावी पुरवणी परीक्षा १७ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राज्य शासनाच्या वतीनं दिला जाणारा सन २०१८-१९ चा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक म. रा.
जोशी यांना जाहीर झाला आहे. पाच लाख रोख रूपये, मानपत्र आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं
स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत काल या पुरस्काराची घोषणा केली.
****
नववं विश्व मराठी साहित्य संमेलन येत्या
२८ ऑगस्टपासून कंबोडियात आयोजित करण्यात आहे, मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ.गो.बं.देगलूरकर
यांची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
****
आषाढी एकादशीचा उत्सव काल सर्वत्र
भक्तिभावानं साजरा झाला.
संतांची जन्मभूमी असलेल्या मराठवाड्यात, या निमित्तानं भाविकांनी
ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. हिंगोली जिल्ह्यात
औंढा इथं संत नामदेव आणि विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या
होत्या. नागनाथ मंदिरानजिक असलेल्या गोकर्ण महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी
केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं, आषाढी एकादशी भक्तीमय वातावरणात साजरी
झाली. श्री संत एकनाथ महाराजांच्या वाड्यावर विजयी पांडुरंगाच्या
दर्शनासाठी गावोगावच्या भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. मात्र गोदावरी पात्रात पुरेसं पाणी नसल्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा
लागला. औरंगाबादनजिक प्रतिपंढरपूरला
जाणारे रस्ते वारकरी आणि दिंड्यांनी फुलून गेले होते.
जालना शहराचं आराध्य दैवत असलेल्या जुना जालना
भागातल्या आनंदीस्वामी महाराज मंदिरात भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी
रांगा लावल्या होत्या. सकाळी मंदिरातून निघालेल्या आनंदी स्वामी
महाराजांच्या पालखी मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते
परभणी शहरासह जिल्ह्यातही यानिमित्तानं
विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध शैक्षणिक संस्थांच्या
वतीनं विठ्ठल रखुमाईसह संतांच्या वेशभुषेतल्या बालगोपाळांच्या दिंड्या काढण्यात आल्या.
पूर्णा इथं दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित पालखी तसंच
रिंगण सोहळ्यात वारकरी दिंड्या, आणि महिलांच्या भजनी मंडळांसह
नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले.
लातूर शहरातल्या केशवनगर भागात गेल्या वर्षी आषाढी एकादशीला
लावण्यात आलेल्या वृक्षांचा वाढदिवस काल साजरा करण्यात आला. गेल्या वर्षी या परिसरात प्रत्येक घरासमोर
एक झाड लावण्यात आलं होतं.
अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं साई बाबांच्या
दर्शनासाठी तसंच पारनेर तालुक्यात पळशी इथल्या प्राचीन विठ्ठल मंदिरात भाविकांनी काल दर्शनासाठी गर्दी केली होती.
बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं संत गजानन महाराजांच्या समाधीचं लाखो भाविकांनी दर्शन घेतलं. दुपारी गजानन महाराजांच्या
पालखीची नगर परिक्रमा करण्यात आली.
****
बीड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र नारायण गड इथं
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ते विकास कामांचं भूमिपूजन आणि कोनशीलेचं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या
हस्ते आणि रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत काल अनावरण करण्यात आलं. या कामासाठी
साडे पाच कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. जिल्ह्यातल्या रस्त्यांच्या विकासासाठी ग्रामविकास विभागानं
एक हजार २५० कोटी रूपयांचा निधी दिला असल्याचं मुंडे यांनी यावेळी दिली.
****
मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग
तातडीनं राबवावा
अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव, माजी राज्यमंत्री
आमदार अमित देशमुख यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांना यासंदर्भातलं निवेदन त्यांनी सादर केलं आहे. हा विषय प्रलंबित
न ठेवता तातडीने निर्णय घेवून यावर अंमलबजावणी करणं आवश्यक असल्याचं, या निवेदनात म्हटलं आहे.
****
हज यात्रेसाठी औरंगाबाद इथून जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी
कालपासून तीन दिवसीय लसीकरण कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. औरंगाबादमधल्या एक हजार ८७ हज यात्रेकरूंपैकी
काल पहिल्या दिवशी ४६२ हज यात्रेकरूंना शहरातल्या जामा मशीद इथं लस देण्यात आली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी
उपजिल्हा रूग्णालयातले वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कालपासून कामबंद आंदोलन
पुकारलं आहे. रूग्णांसोबतचे नातेवाईक उद्धटपणे वागत, दमदाटी करत असल्यानं
हे आंदोलन पुकारल्याचं सांगण्यात आलं. रूग्णालयातले जवळपास ६८
अधिकारी आणि कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे रूग्ण सेवा
विस्कळीत झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment