Monday, 17 April 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 April 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ एप्रिल २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      शेतीसाठी दिवसा अखंड बारा तास वीज पुरवठा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रस्तावित राष्ट्रीय बहिर्गमन चाचणीला  १२ राज्य आणि ४ केंद्रशासित प्रदेश अनुकूल

·      जुलै  आणि ऑगस्ट २०१६ मध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १०० रूपये अनुदान देण्याचा राज्य शासनाचा निर्णय

आणि

·      सिंगापूर खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत भारताच्या साईप्रणीतला पुरुष एकेरीचं विजेतेपद

****

शेतीसाठी दिवसा बारा तास अखंड वीज पुरवठा करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सह्याद्री वाहिनीच्या ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमातून शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते काल बोलत होते. केंद्र सरकार उपलब्ध करून देत असलेल्या निधीतून राज्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचं काम सुरु आहे. यातूनच शेतकऱ्यांसाठी दिवसा १२ तास अखंड वीज उपलब्ध होणार आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरणार आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सरकारी साखर कारखाने तसंच शेतकऱ्यांच्या मदतीनं राज्य शासन, राज्यातल्या पाच धरण क्षेत्रातील संपूर्ण ऊस शेती ठिबक सिंचनावर आणणार असल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातल्या अपूर्ण सिंचन प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून २६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्याचा विकास करताना कृषी आणि ग्राम विकासाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही त्यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली.

****

देशात वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रस्तावित राष्ट्रीय बहिर्गमन चाचणी - नॅशलन एक्झिट टेस्ट - नेक्स्ट वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बंधनकारक करण्यास १२ राज्य आणि ४ केंद्रशासित प्रदेशांनी अनुकूलता दर्शवली आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. माहिती अधिकार कायद्यातर्गंत प्राप्त एका अर्जाच्या उत्तरात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. ही चाचणी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच फक्त डॉक्टर म्हणून मान्यता देण्याची तरतूद यामध्ये असून देशातल्या नऊ राज्यांनी मात्र याला विरोध केला आहे.  

एका उच्चस्तरीय समितीनं सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ही चाचणी अनिवार्य करण्याची शिफारस केली होती. या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं भारतीय वैद्यकीय परीषद सुधारणा विधेयक २०१६ चा मसुदा तयार करून राज्यांच्या अनुकूलतेसाठी पाठवला होता, त्यावर राज्यांनी आपली मतं सरकारला कळवली आहेत.

****

देशभरात मुंबईसह महत्त्वाच्या तीन विमानतळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विमान अपहरणाची शक्यता वर्तवणारा ई - मेल आल्यानंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली. एका महिलेनं पाठवलेल्या या ई - मेलमध्ये सहा तरूण विमान अपहरणाबाबत चर्चा करत असल्याचं, म्हटलं आहे. या ई मेलनंतर मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जुलै ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १०० रूपये अनुदान देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. प्रती शेतकरी जास्तीत जास्त दोनशे क्विंटलसाठी हे अनुदान दिलं जाईल. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता राज्यातल्या सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना लागू असेल. परराज्यातून आवक झालेल्या आणि व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी मात्र ही योजना लागू राहणार नाही. गेल्या वर्षी कांद्याच्या दरात घसरण झाली होती. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आल्याचं, याबाबतच्या शासन निर्णयात म्हटलं आहे.

****

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी - पीएफवर ८ पूर्णांक ६५ टक्के व्याज देण्यास कामगार मंत्रालयाच्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयानं मान्यता दिली आहे. या निर्णयाचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सुमारे चार कोटी सदस्यांना लाभ होणार  आहे. गेल्या वर्षीच्या पीएफवर हे व्याज मिळणार आहे.

****

शेतकरी कर्जमाफीसाठी निघालेल्या विरोधकांच्या संघर्ष यात्रेनं काल जळगाव जिल्ह्यातल्या विविध गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला. विधान सभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी, 'रिपाइं'चे जोगेंद्र कवाडे यांच्यासह अनेक मान्यवर या यात्रेत सहभागी झाले आहेत. पाळधी, एरंडोल आदी गावांत शेतकऱ्यांशी संवाद साधत, त्यांची निवेदनं स्वीकारत ही संघर्ष यात्रा धुळे आणि नंदुरबारकडे मार्गस्थ झाली.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातल्या चिंचोली इथल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड परिसर विकासासाठी २५ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश,  ग्रामविकास,  मंत्री  पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाची निवड करण्यात आली असून या गडाच्या विकाससंदर्भात काल बीड इथं त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. गडाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या बांधकामाचा स्वतंत्रपणे ९ कोटी रुपयांचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागानं तयार करुन शासनाला पाठवावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

बीड जिल्हा परिषदेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावाही पालकमंत्री मुंडे यांनी घेतला.

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत शहाबाजपूर इथं सुरू असलेल्या डोबरी नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाची पाहणीही पालकमंत्री मुंडे यांनी काल केली. मुंडे यांच्या हस्ते यावेळी शेततळ्याचं जलपूजन करण्यात आलं.

****

औरंगाबाद इथं आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा काल ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या उपस्थित समारोप झाला. या दोन दिवसीय संमेलनात प्रकट मुलाखत, कथाकथन, कवी संमेलन, तसंच परिसंवाद घेण्यात आले. राज्यभरातून शिक्षक साहित्यिक या संमेलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

बीड जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमरसिंह पंडित आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्याविरुद्ध, माजी मंत्री सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन आष्टी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार पंडित आणि सोळंके यांनी बीडमध्ये एका वार्ताहर परिषदेत धस दांपत्याविषयी प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणार आणि अवमानकारक वक्तव्य केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.

****

सिंगापूर खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत भारताच्या साईप्रणीतनं भारताच्याच के श्रीकांतवर मात करत, पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात श्रीकांतनं दमदार सुरूवात करत, पहिला सेट २१-१७ नं जिंकत सामन्यात आघाडी घेतली, मात्र साईप्रणीतनं पुढचे दोन सेट २१-१७, २१-१२ नं जिंकून विजेतेपद पटकावलं. भारतीय बॅटमिंटनपटूंनी एखाद्या स्पर्धेत विजेतेपद आणि उपविजेतपद मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

****

औरंगाबाद इथल्या अजिंठा क्रिडा मंडळाच्या खो-खो उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला कालपासून प्रारंभ झाला. सर्व वयोगटातल्या खेळाडूंसाठी हे शिबिर विनामूल्य आहे. शहरातल्या जिल्हा परिषद मैदानावर दररोज सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ६ ते ७ यावेळेत खेळाडूंना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत हे शिबिर चालणार आहे.

****

परभणी, लातूर आणि चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज सायंकाळी ६ वाजता या ठिकाणचा प्रचार संपेल. येत्या बुधवारी या निवडणुकीचं मतदान होणार असून मतदानाची वेळ एक तासानं वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. २१ तारखेला मतमोजणी होणार आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा इथं शुक्रवारी झालेल्या दगडफेकीच्या घटनेप्रकरणी ४० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, काल दुसऱ्या दिवशीही पूर्णा शहरात तणावपूर्ण शांतता होती, दुकानं आणि अन्य व्यवहार कालही बंद होते.

****

उस्मानाबाद इथं येत्या शुक्रवारपासून ९७ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला प्रारंभ  होत असून, नाट्यसंमेलनपूर्व नाट्य महोत्सवाचं उद्घाटन काल आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं.

//********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...