आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
1 जानेवारी २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
बोसॉन म्हणजेच उर्जा वाहक कणांचा शोध लावणारे विख्यात शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ
बोस यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त
आज कोलकाता इथं आयोजित एका कार्यक्रमाला पंतप्रधान
नरेंद्र मोदी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. भौतिक
शास्त्रातले निष्णात शास्त्रज्ञ एस.एन. बोस यांनी १९२० च्या दशतकात केलेल्या क्वाँटम
मेकॉनिक्स या विषयातलं संशोधन जगभरातल्या भौतिक शास्त्राज्ञांना दिशादर्शक ठरलं
आहे.
****
देशभरात नव्या वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात
आलं. मावळत्या वर्षाला निरोप देऊन नववर्ष साजरं करण्यासाठी ठिकठिकाणी विविध प्रकारच्या
मनोरंजनपर कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात
आली होती. रात्री बारा वाजेच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. राष्ट्रपती
रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी जनतेला
नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
****
जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा इथल्या
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवर काल पहाटे हल्ला
करणारे तिन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. त्यानंतर ही चकमक संपल्याचं राज्याचे पोलीस
महासंचालक एस पी वैद यांनी सांगितलं. काल दिवसभर चाललेल्या या चकमकीत चार
जवान हुतात्मा झाले, तर एका अधिकाऱ्याचं
ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.
****
नांदेड इथून निघणारी सचखंड एक्स्प्रेस-जलदगती रेल्वेगाडी आज नियमित वेळेऐवजी दुपारी सव्वा दोन
वाजता सुटणार आहे. उत्तर प्रदेशात पडलेल्या धुक्यामुळे ही गाडी बारा तास उशीरानं धावत
आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.
****
अहमदनगर इथं चार दिवस सुरु असलेल्या राज्यस्तरीय एकांकिका
स्पर्धेचा काल समारोप झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सिने आणि नाट्य
लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप हे होते. मराठवाड्यात अंबेजोगाई इथली नाट्य चळवळ सुरु
ठेवणारे केशवराव देशपांडे यांना यावेळी रंगयोगी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या एकांकिका
स्पर्धेचं प्रथम पारितोषिक पुण्यातल्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या
‘सॉरी परांजपे’ या एकांकिकेला, तर द्वितीय पारितोषिक अहमदनगरच्या ‘सेकंड चान्स’ या
एकांकिकेला मिळालं.
*****
No comments:
Post a Comment