Saturday, 8 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 08.06.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जून २०१९ सायंकाळी ६.००
****

 मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती समुळ नष्ट करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर स्टेशन इथं चारा छावणीला भेट दिल्यानंतर बोलत होते.  मराठवाड्याला हक्काचं पाणी देण्यासाठी सरकारनं एकात्मिक पाणीपुरवठा योजनेसह अनेक उपाय हाती घेतले असून समन्यायी पाणी वाटपाचं आपलं सूत्र आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
****

 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे किमान पंचवीस आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत, असा दावा राज्याचे जलसंसाधन मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. या आमदारांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा दर्शवल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना मोठा धक्का बसणार असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं. काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते राधाकृष्ण विखे पाटील विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी भाजपमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश करण्याची शक्यताही महाजन यांनी बोलून दाखवली.
****

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागाचा दहावी परिक्षेचा निकाल बहात्तर पूर्णांक सत्त्याऐंशी टक्के लागला आहे. यात, मुलींच्या उत्तीर्ण होण्याचं प्रमाण जास्त, म्हणजे अट्ठ्याहत्तर पूर्णांक बावीस टक्के इतकं असून, उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण अडुसष्ट पूर्णांक पस्तीस टक्के, इतकं आहे. लातूर विभागातल्या सत्तर  शाळांचा शंभर टक्के निकाल लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 सोलापूर विभागाचा निकाल एक्क्याऐंशी पूर्णांक त्रेचाळीस टक्के इतका लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात नऊ टक्क्यांची घसरण झाली आहे.

 गडचिरोली जिल्ह्याचा निकाल चोपन्न पूर्णांक पासष्ट टक्के इतका लागला असून, नागपूर विभागातला हा सर्वात कमी निकाल असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 शिवसेना औरंगाबाद शाखेच्या चौतिसाव्या वर्धापन दिनानिमित्त औरंगाबाद इथं आज कार्यकर्ता मेळावा झाला. बांधकाम मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं. पक्षाचे उपनेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेच्या  मराठवाड्यातल्या वाटचालीचा आढावा घेतला.
****

 औरंगाबाद महानगरपालिकेच्या सिध्दार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातल्या वाघाच्या बछड्यांचा आज नामकरण सोहळा झाला. एक नर आणि तीन मादी जातीच्या या बछड्यांची कुश, अर्पिता, प्रगती, आणि देविका अशी नावं ठेवण्यात आली. शहरवासियांकडून या बछड्यांसाठी नावं मागवण्यात आली होती. शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते सोडत पध्दतीनं ही नावं काढण्यात आली.

दरम्यान, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्यामुळे एमआयएमच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार घालत निषेध नोंदवला.
****

 राज्यभरात फक्त गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आढळून येणाऱ्या सारस या पक्ष्यांच्या गणनेला आज सुरुवात झाली असून ही गणना येत्या बारा तारखेपर्यंत चालणार आहे. जगातल्या सर्वात मोठ्या उडणाऱ्या पक्ष्यांमध्ये समावेश असलेल्या सारस पक्ष्याचा अधिवास अगदी मोजक्या ठिकाणी असल्यामुळे या जिल्ह्यातल्या अनेक स्वयंसेवी संस्था, शेतकरी आणि सारस प्रेमी स्वत:हून त्यांच्या संवर्धनाचं  काम करत आहेत. मागच्या वर्षी गोंदिया जिल्ह्यात छत्तीस सारस पक्षी आढळून आले होते.
****

 बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथून श्री संत गजानन महाराज संस्थानतर्फे दरवर्षी काढण्यात येणाऱ्या, श्री गजानन महाराजांच्या पालखीच्या वारीला आज सुरुवात झाली. शेगावपासून पंढरपूरपर्यंत ही पायी वारी काढण्यात येते. आज सकाळी पालखीचं पूजन झाल्यानंतर विठ्ठल नामाचा तसंच ज्ञानेश्वर आणि तुकारामांचा नाम घोष करत श्रींची पालखी पंढरपूरकडे रवाना झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 धुळे तालुक्यातल्या वार इथला ग्रामसेवक राजाराम सांगळे याला पन्नास हजार रुपयांची लाच घेताना आज धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे. आरोपी सरपंचपदावर काम करत असताना, तक्रारदारानं विकासकामासाठी दिलेली दीड लाख रुपयांची अनामत रक्कम तक्रारदाराला परत करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...