Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12
June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
केंद्र सरकारनं नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर अनुसूचित
जमातींसाठी एकलव्य आदर्श निवासी शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय
म्हणजे, अनुसूचित जमातीच्या विकासासाठी मंत्रालयाकडून निर्धारित १०० दिवसांच्या उद्दीष्टाचा
एक भाग असल्याचं, या खात्याचे मंत्री अर्जुन मुंडा यांनी सांगितलं. अनुसूचित जमातीच्या
कल्याणासाठी राज्यांची अनुसूचित जमातींची मंत्रालयं आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी
झोकून देऊन काम करण्याचं आवाहन मुंडा यांनी केलं.
****
दुष्काळ निवारणसाठी आवश्यक उपाय योजना करण्यास सरकार
कमी पडल्याची टीका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.
ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. फळबागा जगवण्यासाठी एकरी पन्नास हजार
रूपये आणि फळबागा नुकसानीपोटी एकरी एक लाख रूपये मदतीची मागणी शेट्टी यांनी केली. मागणी
मान्य न केल्यास, येत्या आठ दिवसात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढणार
असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क अनेक ठिकाणी माफ झालं नाही,
बसचा पास मोफत मिळाला नाही, जाचक अटींमुळे अनेक चारा छावण्या बंद पडत आहेत, असे आरोप
त्यांनी केले. उंबरठा उत्पादन जास्त दाखवून, शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवलं
जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या दोन आर्थिक वर्षात विमा कंपन्यांचा नफा १९
हजार कोटी रूपये झाला आहे. त्यामुळे ही ‘पंतप्रधान पीक विमा योजना नसून, कॉर्पोरेट
कल्याण योजना’ असल्याची टीका त्यांनी केली.
****
पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार
करणारा आरोपी नीरव मोदी याला लंडन उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा जामीन नाकारला आहे.
यापूर्वी नीरव मोदीने लंडनच्या स्थानिक न्यायालयात तीन वेळा जामीनासाठी अर्ज केला होता,
मात्र तीनही वेळा न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानं, त्याच्या वकीलांनी उच्च
न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र जामीन मिळाल्यास, नीरव मोदी फरार होण्याची
शक्यता असल्याचं सांगत, उच्च न्यायालयानं, त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
****
राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत आणि
राहतील, असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रासह
चार राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत काँग्रेसच्या
ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर सुरजेवाला यांनी पत्रकारांशी बोलताना ही
बाब स्पष्ट केली.
****
जहाल नक्षलवादी नर्मदाक्का आणि तिचा पती किरणकुमार
यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयानं त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी
सुनावली आहे. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून गडचिरोली पोलिसांनी, तेलंगणा पोलिसांच्या
सहकार्याने या दोघांना सिरोंचा बसस्थानकावर अटक केली. नर्मदाक्कावर गडचिरोली जिल्ह्यात
६५ गुन्हे दाखल असून, या दोघांवर अनेक नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.
राज्य शासनाने या दोघांवरही प्रत्येकी २५ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. या
दोघांना जांभुळखेडा भू-सुरुंग स्फोट प्रकरणी अटक केल्याचं, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे
यांनी सांगितलं.
****
धुळे शहराजवळच्या आज तिहेरी अपघातात चार जण ठार तर
तीन जण जखमी झाले. मुंबई-आग्रा महामार्गावर लळींग गावाजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये
एका बालिकेचा समावेश आहे. चालकाचं नियंत्रण सुटलेला ट्रक, दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूने
जाणाऱ्या दोन वाहनांवर आदळून हा अपघात झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात ८१ गावं आणि १५ वाडी-तांड्यावर ९८
टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या सुमारे चारशे एक्काहत्तर विहिरी
अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे प्रकल्पातून कालवे
खोदण्याच्या कामाला आज प्रत्यक्ष सुरुवात झाली. हे कालवे भूमिगत अथवा जलवाहिनीद्वारे
व्हावेत अशी मागणी, इथल्या शेतकऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरली होती. अकोले
इथले आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वात यासाठी आंदोलनही करण्यात आलं होतं, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
वायू चक्रीवादळाचा संभाव्य धोका पाहता, पश्चिम रेल्वेनं
मुंबईहून गुजरातमध्ये वेरावळ, ओखा, पोरबंदर, भावनगर, भूज आणि गांधीधामकडे जाणाऱ्या
सर्व रेल्वेगाड्या अंशत: किंवा पूर्ण रद्द केल्या आहेत. शुक्रवार सकाळपर्यंत गाड्यांची
ही स्थिती कायम राहील. या भागात अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णयही
रेल्वेनं घेतला आहे. रेल्वे प्रशासनानं आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणेला सज्ज राहण्याचे
निर्देशही दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment