Saturday, 13 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.07.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –  13 July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ जुलै २०१९ दुपारी .०० वा.
****

 भारत आणि अमेरिके दरम्यानचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि दोन्ही देशांमधले व्यापारातले तणावाचे मुद्दे दूर करण्याच्या दृष्टीनं उभय देशांमध्ये सहमती झाली आहे. अमेरिकेचे सहाय्यक व्यापार प्रतिनिधी ख्रिस्तोफर विल्सन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं  भारताच्या वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव संजय चड्ढा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय अधिकाऱ्यांसोबत काल नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी द्विपक्षीय व्यापार आणि वाणिज्य संबंधावर चर्चा झाली. तसंच परस्पर लाभांच्या निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी चर्चा सुरु ठेवण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. भारत आणि अमेरिकेदरम्यानचे द्विपक्षीय व्यापार आणि वाणिज्य संबंध मजबूत करण्याचा या बैठकीचा उद्देश होता. जी ट्वेन्टी परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात गेल्या आठवड्यात जपानच्या ओसाका इथं झालेल्या चर्चेतल्या निर्देशांप्रमाणे ही बैठक पार पडली.
****

 सर्व राज्यांमधल्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं अधिसूचना जारी केली आहे. रुग्णालयांमधे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय आणि निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी करण्यासह जागतिक स्तरावर डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातलं गुणोत्तराचं प्रमाण योग्य राखण्यासाठी ही पदं भरण्यात येणार आहेत. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात आरोग्य राज्यमंत्री अश्विनिकुमार चौबे यांनी ही माहिती दिली. दुर्गम भागात काम करणाऱ्या डॉक्टर तसंच वैद्यकीय आणि निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वित्तीय प्रोत्साहन देण्याची तरतूद करण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या असल्याचंही चौबे यावेळी म्हणाले. रुग्णालयात डॉक्टरांवर होणारे हल्ले टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजनेच्या निर्देशाबरोबरच एकसमान कायदा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असल्याचं ते म्हणाले.
****

 देशात अल्पवयीन बालकांवरच्या बलात्काराच्या वाढत्या घटनांची सर्वोच्च न्यायालयानं स्वत:हून दखल घेतली आहे. अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी मार्गदर्शिका तयार करण्यासाठी निर्देश देण्यात येणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मुलांवरील अत्याचाराबाबत विविध वृत्तपत्र आणि पोर्टलवरील अहवालावरून सर्वोच्च न्यायालयानं, ही दखल घेणार असल्याचं म्हटलं आहे. न्यायालयानं या प्रकरणी ज्येष्ठ विधीज्ञ व्ही गिरी यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती केली आहे. तसंच या प्रकरणी गिरी, केंद्र सरकार शिवाय इतर कोणत्याही पक्षाला या प्रकरणी अर्ज दाखल करता येणार नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं.
****

 गोव्यात आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत. नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज दुपारी ३ वाजता होणार असल्याचं त्यांनी काल पणजीत सांगितलं. काँग्रेसचे १० आमदार भाजपात गेल्याच्या पार्श्वभूमीवर हा बदल होणार असून गोवा फॉरवर्ड पार्टीचे ३ आणि एक अपक्ष आमदार यांना मंत्रिमंडळातून वगळलं जाण्याची शक्यता आहे, असं सावंत म्हणाले. विधानसभेत भाजपाचं संख्याबळ आता २७ झालं आहे.
****

 राज्यातल्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचं राज्य अधिवेशन सांगली इथं आज सुरु झालं. राज्यातले पाच हजार चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रतिनिधी या अधिवेशनासाठी सांगलीत दाखल झाले आहेत.  सहकार पणन मंत्री सुभाष देशमुख आणि सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत अधिवेशनाचं उद्घाटन झालं. जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, अनुकंपा तत्वावरील भरती विनाअट करावी, आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावं आदी मागण्या या संघटनेच्या वतीनं या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत.
****

 राज्यात दूध तसंच  इतर अन्न पदार्थातल्या होणाऱ्या भेसळीचं समुळ उच्चाटन करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या अधिकाऱ्यांनी "ॲक्शन मोड"वर काम करावं, असे निर्देश अन्न तसंच औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. काल मुंबईत अन्न आणि औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक झाली त्यावेळी रावल यांनी हे निर्देश दिले. दूध, तेल, मिठाई यासारख्या अन्न पदार्थांतली  भेसळ ही गंभीर बाब असून ती रोखण्यासाठी जबाबदारीने काम करायला हवं, असं ते म्हणाले. अन्न सुरक्षेविषयी जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी "अन्न सुरक्षा पंधरवडा" राबवण्यात येणार असल्याचंही रावल यांनी सांगितलं.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 21 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...