Tuesday, 16 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.07.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
औरंगाबाद इथल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी भागातल्या जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मीच्या परिसरातली ३३ एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.
या विद्यापीठासाठी यापूर्वी कांचनवाडी इथेच १७ एकर जागा देण्यात आली आहे. आजच्या निर्णयानंतर या विद्यापीठासाठी आता ५० एकर जागा उपलब्ध झाली आहे.
चकमकीत वीरमरण किंवा अपंगत्व आलेल्या सैनिकांना देण्यात येणाऱ्या एक रकमी आर्थिक मदतीत भरीव वाढ करण्याला मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मंजूरी दिली. या निर्णयानुसार हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना पूर्वी मिळणाऱ्या २५ लाख रुपयांऐवजी आता एक कोटी रूपये मदत मिळेल. तर जखमी होऊन दिव्यांग झालेल्या सैनिकांना १५ लाखांऐवजी ६० लाख रूपये मदत मिळणार आहे.
समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या मानधनाच्या फरकाची रक्कम राज्याच्या निधीतून देण्याला मान्यता, महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी चार हजार कोटी रुपयांचं अंतरिम कर्ज उभारण्यासाठी शासन हमी देण्यालाही या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर मुंबई अध्यक्षपदी आमदार मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने आज याबाबतचं पत्र जारी केलं. केंद्र सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तर आशिष शेलार यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
****
दलित पँथरचे संस्थापक सदस्य आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांच आज सकाळी विक्रोळी येथील राहत्या घरी निधन झाल. ते ७८ वर्षांचे होते. ढाले यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेलं एक वादळी व्यक्तिमत्व आपण गमावल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केली.
****
मुंबईच्या डोंगरी परिसरात इमारत कोसळून झालेल्या अपघातात बारा जण ठार झाले असून, आणखीन सुमारे चाळीसहून अधिक लोक या ढिगाऱ्याखाली असल्याची भीती पीटीआयनं वर्तवली आहे. आज दुपारी पावणे बारा वाजता ही दुर्घटना घडली. या परिसरातल्या इतर इमारतींमधल्या रहिवाशांना सुरक्षेचा उपाय म्हणून इतरत्र हलवण्यात आलं आहे.
दरम्यान, दुर्घटनेची सर्वंकष चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दुर्घटनेची माहिती घेतल्यानंतर ते बोलत होते.
****
माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या निकाल देणार आहे. पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने हेरगिरीच्या आरोपाखाली कुलभूषण यांना फाशीची शिक्षा सुनावली होती, या शिक्षेला भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिलं आहे.
****
संगीत नाटक अकादमीचे २०१८ चे अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रसिद्ध तबला वादक उस्ताद जाकीर हुसैन, नृत्यांगना सोनल मानसिंग यांच्यासह चौघांना अकादमी रत्न तर चाळीस जणांना अकादमी पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आणि अभिनेत्री सुहास जोशी यांचा समावेश आहे. अकादमी पुरस्कार एक लाख रुपये, ताम्रपत्र आणि अंगवस्त्र अशा स्वरुपाचा असून, अकादमी रत्न पुरस्कार तीन लाख रुपये स्वरुपाचा आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली, स्मृतीचिन्ह आणि २५ हजार रूपये स्वरुपाचा हा पुरस्कार बत्तीस कलाकारांना जाहीर झाला आहे.
****
पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत धूरमुक्त महाराष्ट्र मोहीम राबवण्यात येणार आहे. घरगुती वापराचा गॅस नसलेल्या महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन, परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठचे तहसीलदार आशिष बिरादार यांनी केलं आहे. आज सोनपेठ तालुक्यात या योजनेचा प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात ५ महिला लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आलं. ही योजना १४ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...