Wednesday, 17 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.07.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१७ जुलै  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 मुंबईतल्या डोंगरी भागात काल इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा आता तेरा झाला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या प्रवक्त्यानं आज ही माहिती दिली. मदत आणि बचाव कार्य सुरू असून, इमारतीचा पडलेला भाग संपूर्ण साफ करेपर्यंत हे काम सुरूच राहील, असंही त्यांनी सांगितलं.

 दरम्यान,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची तर जखमी झालेल्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमी व्यक्तींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.
****

 गृहमंत्री अमित शाह आज राज्यसभेत राष्ट्रीय तपास संस्था सुधारणा विधेयक २०१९ मांडणार आहेत. हे विधेयक लोकसभेत याआधीच मंजूर झालं आहे. या विधेयकामुळे राष्ट्रीय तपास संस्थेचं कार्यक्षेत्र वाढण्यास संमती मिळणार असून, विविध प्रकरणांची त्वरित सुनावणी होणं शक्य होणार आहे.
****

 कर्नाटकच्या विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यासंदर्भात विचार करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. काल यासंदर्भात सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. दहा बंडखोर आमदारांनी या महिन्याच्या दहा तारखेला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत, विधानसभा अध्यक्ष आपले राजीनामे स्वीकारण्यास जाणूनबुजून उशीर लावत असल्याची तक्रार केली होती.
****

 जम्मू काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यातील सोपोर भागात आज सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षादलांदरम्यान चकमक सुरू आहे. सोपोरच्या गुंडबराथ गावामध्ये सुरक्षादलांच्या संयुक्त पथकानं दहशतवाद्यांना वेढा घालून शोध मोहीम हाती घेतली असून तिथं दोन दहशतवादी लपून बसले असल्याचा अंदाज आहे.
****

 श्रीलंकेतल्या कोलंबो इथे झालेल्या नवव्या सार्क चित्रपट महोत्सवात भारताला सहा पारितोषिकं मिळाली आहेत. यात, नगरकीर्तन या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट संदेशांमधून ही माहिती दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक कौशिक गांगुली यांना उत्कृष्ट दिग्दर्शक तर रिद्धीसेन यांना उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला आहे.
*****
***

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 16 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 16 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...