Friday, 12 July 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 12.07.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
प्रत्येकाने आपापली वैयक्तिक ऑक्सिजन बँक तयार करण्यासाठी आयुष्यात किमान पाच झाडे लावावी आणि जगवावी असं आवाहन, केंद्रीय वनं आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘वनमहोत्सव मोहीम -२०१९’ अंतर्गत आज नवी दिल्लीत महाराष्ट्र सदन परिसरात वृक्षारोपण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी वृक्षारोपण केलं.
****
मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग तातडीने राबवावा अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भातलं निवेदन त्यांनी सादर केलं आहे. देशमुख यांच्यावतीनं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती देण्यात आली. हा विषय प्रलंबित न ठेवता तातडीने निर्णय घेवून यावर अंमलबजावणी करणं आवश्यक असल्याचं, या निवेदनात म्हटलं आहे.
****
आषाढी एकादशीचा उत्सव आज सर्वत्र भक्तिभावानं साजरा होत आहे. या निमित्तानं हिंगोली जिल्ह्यात औंढा इथं संत नामदेव आणि विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. मंदीर समितीच्या वतीनं, भाविकांसाठी भजन कीर्तन, महाप्रसादासह आवश्यक सुविधांचं नियोजन करण्यात आलं आहे. नागनाथ मंदिरानजीक असलेल्या गोकर्ण महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
परभणी शहरासह जिल्ह्यातही यानिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध शैक्षणिक संस्थांच्या वतीनं विठ्ठल रखुमाईसह संतांच्या वेशभुषेतल्या बालगोपाळांच्या दिंड्या काढण्यात आल्या. पूर्णा इथं दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित पालखी तसंच रिंगण सोहळ्यात वारकरी दिंड्या, आणि महिलांच्या भजनी मंडळांसह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं, आषाढी एकादशी भक्तीमय वातावरणात साजरी होत आहे. श्री संत एकनाथ महाराजांच्या वाड्यावर विजयी पांडुरंगाच्या दर्शनासाठी गावोगावच्या भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. मात्र गोदावरी पात्रात पुरेसं पाणी नसल्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागल्याचं वृत्त आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं साई बाबांच्या दर्शनासाठी तसंच पारनेर तालुक्यात पळशी इथल्या प्राचीन विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
****
हज यात्रेसाठी औरंगाबाद इथून जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी आजपासून पुढचे तीन दिवस आवश्यक लसीकरणास सुरूवात झाली आहे. औरंगाबादमधल्या एक हजार ८७ हज यात्रेकरूंपैकी पहिल्याच दिवशी ४६२ हज यात्रेकरूंना शहरातल्या जामा मशीद इथं लस देण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एस.व्ही कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातल्या २०० हज यात्रेकरूंना यापूर्वीच लस देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी उपजिल्हा रूग्णालयातले वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे. रूग्णांसोबतचे नातेवाईक उद्धटपणे वागत, दमदाटी करत असल्यानं हे आंदोलन पुकारल्याचं सांगण्यात आलं. रूग्णालयातले जवळपास ६८ अधिकारी आणि कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे रूग्ण्सेवा विस्कळीत झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अहमदनगर शहरात तोफखाना परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेले गाळे महापालिकेने आज पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केले. या अतिक्रमणासंदर्भात लोकायुक्तांकडे तक्रार करुनही कारवाई होत नव्हती, नगरविकास विभागाच्या सचिवांना लोकायुक्तांनी अहवाल मागवल्यानंतर महापालिकेने आज सकाळी कारवाईला सुरुवात केली. या कारवाईत दुपारपर्यंत सुमारे १०३ गाळे जमीनदोस्त करण्यात आले आहेत.
****
धुळे जिल्ह्यात गौणखनिज उत्खननासह वाहतुकीवर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी जारी केले आहेत. शिरपूर प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विक्रमसिंग बांदल यांच्यावर काल वाळुमाफियांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. येत्या आठ ऑगस्ट पर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.
****
बुलडाणा जिल्ह्यात आज ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मलकापूर जवळ आज सकाळी हा अपघात झाला.
****
विम्ब्ल्डन पुरुष एकेरीचे उपांत्य फेरीचे सामने आज होत आहेत. रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यात उपांत्य फेरीचा पहिला सामना होईल, तर नोवाक जोकोविच आणि रॉर्बटो बॉटीस्टा अगुट यांच्यात दुसरा उपांत्य सामना होईल. तर महिला एकेरीत सिरेना विल्यम्स आणि सीमोना हालेप यांच्यात उद्या उपांत्य सामना होणार आहे.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...