Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 05 April 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०५ एप्रिल २०२० दुपारी
१.०० वा.
****
औरंगाबाद शहरात कोरोनाचे आणखी चार रुग्ण आढळले आहेत.
त्यांचे लाळेच्या नमुन्यांचे तपासणी अहवाल सकारात्मक आले असून, आता शहरातील एकूण रुग्णसंख्या
६ झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.
यापूर्वी
चिकलठाण्यातील कोरोना रुग्णालयात दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्यापैकी आरिफ
कॉलनी येथे आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील चार जणांचे स्वॅब नमुने सकारात्मक आल्यामुळे
त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आणखी काही जणांचे तपासणी अहवाल येणं
बाकी असल्याचं डॉ. कुलकर्णी यांनी म्हटलं सांगितलं.
****
उस्मानाबाद शहरातले १९ जण लातूर जिल्ह्यातल्या निलंगा
इथं आढळलेल्या ८ कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आले होते. यापैकी नऊ जणाच्या लाळेचे नमुने
आतापर्यंत घेण्यात आले असून, त्यांना विलगीकृत करण्यात आल्याचं उपविभागीय पोलिस अधिकारी
मोतीचंद राठोड यांनी सांगितलं आहे. त्यांचे अहवाल आज रात्रीपर्यंत अपेक्षित आहेत. इतर
दहा जणांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या शहागड
इथल्या तीन कुटुंबांतले लोक लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथल्या कोरोनाग्रस्तांच्या
संपर्कात आल्याचं समोर आलं आहे. या तीन कुटुंबांतल्या २५ जणांना जिल्हा रुग्णालयातल्या
विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या घशातल्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी
पाठवण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय कुलकर्णी यांनी दिली
आहे.
दरम्यान शहागड इथं संचारबंदी अधिक कडक करण्यात आली असून, पोलीस बंदोबस्त
वाढवण्यात आला आहे. मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत.
****
नवी मुंबईत कोरोना विषाणूचा
संसर्ग पसरवल्याबदद्ल १० फिलिपाईन्स नागरिकांवर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. वाशीच्या नुरूल इस्लाम ट्रस्टच्या तबलिगी जमातमध्ये पोलिसांना कोणतीही माहिती
न देता हे फिलिपाई नागरिक १० ते १६ मार्च दरम्यान राहिले होते. त्यातले सहाजण इतर ठिकाणी
गेल्यानंतर ३ जण वाशीतल्या मशिदीतच राहिले होते. या तिघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं
आढळून आलं. ही माहिती त्यांनी प्रशासनापासून लपवून ठेवली. या दोघांमुळे वाशीतल्या १३
जणांना आणि नेरूळ मधल्या नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.
****
कोरोना प्रतिबंधासंदर्भातील
उपाययोजनांमध्ये हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरुन नाशिकच्या स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य
कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना महानगर
पालिकेनं नोटिस बजावली आहे.
दिल्लीहून नाशिक शहरात परतलेल्या
काही व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचं विलगीकरण करण्याच्या सूचना पोलीस महासंचालकांनी दिल्या
होत्या, मात्र थविल यांनी या सूचनांचं पालन न केल्यामुळे महापालिका आयुक्त राधाकृष्ण
गमे यांनी थविल यांना नोटिस बजावली आहे. प्रशासनानं थविल यांच्यावर संशयित रुग्णांच्या
विलगीकरणाची जबाबदारी सोपवली आहे.
****
पुण्याच्या वृत्तपत्र वितरकांनी वृत्तपत्रांचं वितरण
बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एक आठवडा वितरण बंद केल्यानंतर ते १ एप्रिलला पुन्हा
सुरु करण्यात आलं होतं, मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता
उद्यापासून पुन्हा वितरण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
****
रायगड जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसंच जिल्हा
आपत्ती प्रतिसाद निधीला देखील बँकेनं ५ लाख रूपये दिले. बँकेच्या वतीनं काल जिल्हाधिकारी
निधी चौधरी यांच्याकडे मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या
जवळाबाजार इथं दारू तयार करण्याचं दोन हजार लिटर रसायन,
तसंच ३८ लिटर दारु पोलिसांनी जप्त केली. पारधी वस्तीतल्या एका हातभट्टीवर ही दारु तयार करणाऱ्या १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आयुष्मान
भारत पंतप्रधान आरोग्य योजनेत ५० कोटींहून अधिक गरीब व दुर्बल घटकातले लोक कोरोनाची तपासणी करु शकतील, तसंच उपचार
घेऊ शकतील,
अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. या
योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अधिकृत खाजगी प्रयोगशाळांमध्ये आणि रुग्णालयांमधून मोफत सेवा दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. खाजगी प्रयोगशाळा आणि रुग्णालयांनी
यासाठी अधिकाधिक योगदान द्यावं, असं आवाहनही हर्षवर्धन यांनी केलं आहे.
****
कोरोनाच्या निर्मूलनासाठीच्या उपाययोजनांकरिता खाजगी क्षेत्र, सरकारी-निमसरकारी संघटना आणि आंतरराष्ट्रीय
संघटनांशी समन्वय साधण्यासाठी सरकारनं निती
आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली एक गट स्थापन केला
आहे. हा गट हितचितकांच्या तीन समूहांसमवेत कोरोनासंदर्भातल्या
समस्यांची चर्चा करुन त्यावर प्रभावी योजना तयार करणार असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment