Monday, 6 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.04.2020 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 April 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.
****

Ø  घराघरांमध्ये दीप प्रज्वलन करून कोविड -१९ च्या विरोधातली लढाई जिंकण्याचा जनतेकडून संकल्प व्यक्त
Ø राज्यात जीवनावश्यक वस्तू आणि औषधींची कोणतीही टंचाई नसल्याचं राज्य शासनाचं स्पष्टीकरण
Ø कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार हवेतून होत नसल्याचा भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ रमण गंगाखेडकर यांचा पुनरूच्चार
Ø राज्यात ११३ नवे कोरोना विषाणू बाधित; १३ जणांचा मृत्यू; मृतात औरंगाबादमधल्या एक जणाचा समावेश
आणि
Ø संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई; शेकडो वाहने जप्त
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरात काल रात्री नऊ वाजता घराघरांमध्ये दीप प्रज्वलन करून कोविड -१९ च्या विरोधातली लढाई जिंकण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. रात्री बरोबर ९ वाजता देशवासियांनी घरातले विजेचे दिवे मालवून, घराच्या दारात, सज्जात तेलाचे दिवे, मेणबत्ती, विजेरी, मोबाईलचे फ्लॅशलाईट लावून पंतप्रधानांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद दिला. ९ मिनिटांपर्यंत हे दिप पाजळण्यात आले. लॉकडाऊनमुळे आपापल्या घरात असलेले लोक हे एकाकी पडलेले नसून, संपूर्ण देशाची सामुहिक शक्ती सर्वांसोबत आहे, हे दाखवून देण्यासाठी हे दिवे लावण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातली सर्व लोक यामध्ये सहभागी झाले.
****

 देशातल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभा पाटील, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग यादव, अखिलेश यादव, यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाश सिंग बादल या सर्व नेत्यांशी त्यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला.
****

 सध्याच्या टाळेबंदीच्या काळात जिवनावश्यक वस्तु आणि अन्य किराणा सामानाचा आंतर राज्य आणि राज्यांतर्गंत पुरवठा सुरळीत राहावा यासाठी या क्षेत्राशी संबंधित मालमोटार चालक आणि कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना केंद्र सरकारनं  सर्व राज्यांना केली आहे. जिवनावश्यक  वस्तुंचा विनाअडथळा पुरवठा कायम राहील याची काळजी घेण्यासाठी पोलिसांसोबत समन्वय ठेवण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची सूचना ग्राहक कार्य सचिव पवनकुमार अग्रवाल यांनी यासंदर्भात राज्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. टाळेबंदीच्या काळात ट्रक चालकांना पोलिसांकडून कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यास या पत्रात सांगण्यात आलं आहे.
****

 राज्यात जीवनावश्यक वस्तू आणि औषधींची कोणतीही टंचाई नसल्याचं राज्य शासनानं स्पष्ट केलं आहे. किराणा दुकानांना वस्तुंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरता शासन यंत्रणा खबरदारी घेत असून, टंचाई भासवून चढ्या दरानं विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा शासनानं काल जारी केलेल्या एका पत्रकाद्वारे दिला आहे. स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून अन्न धान्याचा पुरवठा करण्यासाठी राज्यात मुबलक प्रमाणात धान्याचा साठा उपलब्ध असल्याचंही यात सांगण्यात आलं. स्वयंपाकासाठीच्या एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून ऑईल कंपन्यांकडूनही त्यांचा नियमित पुरवठा होत आहे. पुरवठा कामगारांचा तुटवडा असूनही गॅस सिलिंडर ग्राहकांना घरपोच देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यामध्येही गती आली आहे, याकडे या पत्रकात लक्ष वेधण्यात आलं आहे. दूध, फळे, भाजीपाला यांचाही राज्यात तुटवडा नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****

 देशातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं १४ एप्रिलनंतर सुरु करण्यासंदर्भातला निर्णय हा त्यावेळी कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाची स्थिती पाहूनच घेतला जाईल, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत बोलत होते. १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन सुरु ठेवावं लागलं, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचं नुकसान होणार नाही, याचं नियोजन शासनानं केलं असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जिवाची सुरक्षा आपल्यासाठी महत्वाची असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****

 सध्या सुमारे चार दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. नवी दिल्लीतला धार्मिक कार्यक्रम झाला नसता तर रुग्ण संख्या दुप्पट व्हायला सुमारे साडे सात दिवस लागले असते असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी काल देशभरातले जिल्हाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पोलिस आणि इतरांशी चर्चा केली. विविध औषधं आणि वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करणाऱ्यांना कुठलेही अडथळे येऊ देऊ नका अशा सूचना त्यांनी यावेळी सर्वांना दिल्या.

 सध्या देशभरात २७ हजाराहून अधिक निवारा केंद्र उभारण्यात आली असून साडेबारा लाख लोकांना त्याचा लाभ होतो आहे. याशिवाय देशभरात अन्न वाटपासाठी उभारण्यात आलेल्या १९ हजाराहून अधिक केंद्रांमधून सुमारे ७५ लाख लोक जेवण घेऊन जात असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली आहे. याशिवाय सुमारे साडेतेरा लाख कामगारांना ते काम करत असलेल्या कंपन्यांकडून निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
****

 कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार हवेतून होत असल्याचं अजून तरी सिद्ध झालं नसल्याचा पुनरुच्चार इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ रमण गंगाखेडकर यांनी केला आहे. जर हवेतून याचा प्रसार झाला असता तर रुग्णांनी ज्या हवेतून श्वास घेतला त्याच हवेतून इतर व्यक्ती, त्याचे कुटुंबीयही श्वास घेत होते. त्यांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचं आढळून आलेलं नाही. किंवा हे रुग्ण रुग्णालयात दाखल झालेले होते तेव्हा ते ज्या हवेत श्वास घेत होते त्याच हवेत इतरही श्वास घेत होते. त्यांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले नसल्याचे गंगाखेडकर यांनी स्पष्ट केलं.
****

 कोरोना विषाणू निर्मूलनासाठीच्या उपाययोजनांकरिता खाजगी क्षेत्र, सरकारी-निमसरकारी संघटना आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी समन्वय साधण्यासाठी सरकारनं निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली एक गट स्थापन केला आहे. हा गट हितचितकांच्या तीन समुहांसमवेत कोरोना विषाणूसंदर्भातल्या समस्यांची चर्चा करुन त्यावर प्रभावी योजना तयार करणार असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं.
****

 नवी मुंबईत कोरोना विषाणूचा संसर्ग पसरवल्याबदद्ल १० फिलिपाईन्स नागरिकांवर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशीच्या नुरूल इस्लाम ट्रस्टच्या तब्लिगी जमातमध्ये पोलिसांना कोणतीही माहिती न देता हे फिलिपाईन्सचे नागरिक १० ते १६ मार्च दरम्यान राहिले होते. त्यातले सहाजण इतर ठिकाणी गेल्यानंतर तीन जण वाशीतल्या मशिदीतच राहिले होते. या तिघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं. ही माहिती त्यांनी प्रशासनापासून लपवून ठेवली. या दोघांमुळे वाशीतल्या १३ जणांना आणि नेरूळमधल्या नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.
****

 राज्यात काल कोरोना विषाणू बाधित ११३ नव्या रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातली एकूण रुग्ण संख्या ७४८ झाली असून आतापर्यंत ५६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. काल राज्यात १३ करोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला.
****

 औेरंगाबादमध्ये काल आणखी सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या दहा झाली आहे. त्यापैकी एका ५८ वर्षीय पुरुष रुग्णाचा काल शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यू झाला.


 विभागात औरंगाबादसह हिंगोलीत एक, लातूरमध्ये आठ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात चार असे एकूण २० लाळेचे नमुने सकारात्मक असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयानं प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
****

 लातूर जिल्ह्यात बाहेरून आलेल्या एकाही मजुराचं स्थलांतर होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी संबंधितांना दिले आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बनसोडे यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत उदगीर उपविभागातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. बाहेरून आलेल्या सर्व मजुरांना प्रशासनानं जीवनावश्य्क सेवा पुरवाव्यात, तसंच त्यांच्या वैद्यकीय तपासण्याही करुन घाव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****

 लातूर जिल्ह्यातल्या निलंगा शहरात कोरोना विषाणुचे आठ रुग्ण आढळून आल्यानंतर शहर पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. प्रशासनाकडून नागरिकांना जीवनावश्यक सेवा पुरवल्या जात असल्याची माहिती नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे यांनी दिली आहे. आंध्र प्रदेशात निघालेले हे कोरोना बाधित निलंगा शहरातल्या ज्या धार्मिक स्थळात राहिले होते, त्या परिसरातल्या ८७० कुटुंबांची वैद्यकीय तपासणी केली जात असल्याचं उपजिल्हाधिकारी डॉ. विकास माने यांनी सांगितलं. तसंच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून, सहा जणांचं त्यांच्या  घरातच विलगीकरण करण्यात आल्याची माहिती माने यांनी दिली.

 उस्मानाबाद शहरातले १९ जण लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथं आढळलेल्या ८ कोरोना विषाणूग्रस्तांच्या संपर्कात आले होते. यापैकी नऊ जणाच्या लाळेचे नमुने आतापर्यंत घेण्यात आले असून, त्यांना विलगीकृत करण्यात आल्याचं उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी सांगितलं आहे. इतर दहा जणांचं घरातच विलगीकरण केलं आहे.

 जालना जिल्ह्यातल्या शहागड इथल्या तीन कुटुंबांतले लोक लातूर इथल्या कोरोना विषाणूग्रस्तांच्या संपर्कात आल्याचं समोर आलं आहे. या तीन कुटुंबांतल्या २५ जणांना जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या घशातल्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय कुलकर्णी यांनी दिली आहे.

 दरम्यान, शहागड इथं संचारबंदी अधिक कडक करण्यात आली असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत.
****

 दरम्यान, निलंगा प्रकरणाची प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून, पालकमंत्री अमित देशमुख यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. लॉकडाऊनच्या काळात यात्रेकरूंना निलंगा इथल्या मशिदीमध्ये आश्रय देण्यात आला  होता, खरेतर असे अनोळखी इसम आढळून येताच याची माहिती संबंधितांनी पोलीस, जिल्हा प्रशासन किंवा जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं द्यावयास हवी होती, याप्रकरणी मशीद आणि मशिदीचे कार्यवाह यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही देशमुख यांनी सांगितलं. या घटनेची  कठोर शब्दात निंदा करत असल्याचं सांगून त्यांनी, यापुढे जिल्ह्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रत्येकानं कायद्याचं कठोर पालन करावं असं आवाहनही पालकमंत्र्यांनी केलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध राज्यात सर्वत्र कडक कारवाई केली जात आहे. नांदेड शहरात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईत शहर वाहतूक शाखेनं जवळपास सतराशे वाहनं जप्त केली आहेत, तर अकरा लाख तेरा हजार सहाशे रुपये महसूल वसूल केला आहे.

 अहमदनगर इथं अनावश्यकरित्या फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करतांना तीनशेहून अधिक दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातही संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची वाहनं जप्त करुन, गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 जालना जिल्ह्यात सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं कडक कारवाई करण्यात येत आहे. अंबड आणि जाफ्राबाद या ठिकाणी असे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांनी दिली आहे. नागरिकांनी समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित करु नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. ते म्हणाले,

 सर्वांनी लक्षात घ्या. शत्रु दुसरा माणूस नाही. सगळ्यांचा शत्रू सध्या कोरोना व्हायरस आहे. तरीसुध्दा काही लोक सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या कामात आहे. याची आम्ही गंभीर दखल घेत आहोत. आमच्या सगळ्या पेट्रोलिंग टिम चोवीस तास सर्व वॉटस ॲप ग्रुप, फेसबुकपेज मॉनिटर करत आहेत. आणि कोणीही असा मेसेज व्हायरल करतात तर सुमोटो आपोआप दखल घेऊन, गुन्हा दाखल करून त्या व्यक्तीला अटक करण्याचे आदेश सर्वांना दिले आहेत.

****

 नांदेड शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हा आणि तालुका स्तरावर कार्यकारी समिती आणि तांत्रिक समिती स्थापन करण्याचे आदेश काढले आहेत. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नियंत्रण आराखड्यातल्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या समितीची असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 
****

 हिंगोली जिल्ह्यातल्या जवळाबाजार इथं दारू तयार करण्याचं दोन हजार लिटर रसायन, तसंच ३८ लिटर दारु पोलिसांनी जप्त केली. पारधी वस्तीतल्या एका हातभट्टीवर ही दारु तयार करणाऱ्या १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरात एटीएम वापरतांना सामाजिक अंतराचा वापर करतांनाच ठिकठिकाणी सॅनिटायझरनं हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजी बाजारात मात्र सामाजिक अंतर पाळण्याबाबत अभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
****

 बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं एका धार्मिक स्थळावर सामुहिक प्रार्थना करण्यासाठी गेलेल्या पाच जणांविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी या पाचही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याचं उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे यांनी सांगितलं. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोणत्याही धार्मिक स्थळावर गर्दी न करण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. 
****

 लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत काल ७० जणांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात ५७ जणांना घरात विलगीकरण करुन ठेवलं आहे. 
****

 जालना इथल्या चंदनझिरा पोलिसांनी काल चंदनझिरा परिसरातल्या तृतीयपंथीयांसह गरजुंना जीवनावश्यक साहित्याच्या १५० पाकिटांचं वाटप केलं.
****

 नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातल्या नारनाळी परिसरात काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली तर वृक्ष उन्मळून पडली. या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
****

 लातूर इथल्या या आठ कोरोनाग्रस्तांना बीड जिल्ह्यातल्या सीमेवर अडवण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांनी पोलिस कर्मचार्यांबरोबर वाद घातला होता. या पार्श्वभूमीवर या पोलिस कर्मचारयांच्या तपासणी करून त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****

 उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातल्या हराळी इथल्या ज्ञान प्रबोधिनी संस्थेनं वात्सल्य  सामाजिक संस्था आणि आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सहकार्यानं नळदुर्ग आणि तुळजापूर परिसरातल्या गरजू कुटुंबांचं सर्वेक्षण करुन त्यांना मदत करणं सुरु केलं आहे. यामध्ये रेशन कार्ड नसलेले गरजू, निराधार, भिक्षेकरी, भटके-विमुक्त, एकल महिलांचा समावेश आहे. प्रति कुटुंबाला १५ दिवस पुरेल एवढे धान्य देण्यात येत आहे. 
****

 नांदेड जिल्ह्याच्या किनवट इथल्या गोकुंदा शासकीय आश्रमशाळेत राजस्धान, छत्तीसगड राज्यातल्या ३३ कामगारांची राहण्याची व्यवस्था केली आहे. या सर्वांना आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून, त्यांची मानसिक आणि शारीरिक तंदुरूस्ती रहावी यासाठी गोकुंदा इथले योगशिक्षक देविदास मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना योगाचं प्रशिक्षणही देण्यात येत आहे.
****

 राज्यात जिल्हाबंदी लागू असुनही परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातल्या गोदाकाठच्या सिमा अद्यापही सुरुच आहेत. पाथरी तालुक्यातली १७ गावं बीड जिल्ह्यातल्या माजलगावला लागून आहेत. नाथ्रा इथल्या बंधाऱ्यावरचं गेट बंद केलं असलं तरी नागरीक पाऊल वाटांचा वापर करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय घाटीत कोरोना संशयितांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी काल आवश्यक आरोग्य सुरक्षा किट उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी निदर्शनं केली. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी लवकरात लवकर या आरोग्य किट पुरवण्याचं आश्वासन दिल्याचं मार्ड संघटनेचे औरंगाबाद अध्यक्ष डॉ. आमेर तडवी यांनी सांगितलं आहे.
****

 होम क्वारंटाईनचा शिक्का असताना बाहेर फिरणाऱ्या आठ टांझानियन नागरिकांना पुणे पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. हे आठ जण पाच मार्चला भारतात आले होते. त्यांचा तपासणी अहवाल नकारात्मक आला असला, तरी त्यांना १४ दिवस विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आलं होतं.
****

 नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत एकही कोरोना बाधीत रूग्ण आढळला नसून, ४२३ जणांना विलगीकरणात ठेवलं आहे. मात्र तरीदेखील काळजी घेण्याचं आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. ते म्हणाले...

****

 परभणी इथल्या जिल्हा रुग्णालयात आजपर्यंत २४१ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी १६२ जणांचं घरात विलगीकरण केलं आहे.
****

 परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा इथल्या उत्तमराव जोगवाडकर आश्रम शाळेच्यावतीनं राज्य रस्ता महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाटसरुंसाठी खिचडी वाटप करण्यात येत आहे.
****

 परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या अंबरवाडी इथल्या एका ३० वर्षीय महिलेने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बाब एकाने पाहिल्यामुळे आरडाओरड होऊन त्या महिलेस वाचवण्यात यश आलं असलं तरी दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. काल सकाळी ही घटना घडली.
****

 महावीर जयंती आज साजरी होत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****

 कोरोना विषाणू प्रतिबंधासंदर्भातल्या उपाययोजनांमध्ये हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरुन नाशिकच्या स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना  महानगर पालिकेनं नोटिस बजावली आहे. दिल्लीहून नाशिक शहरात परतलेल्या काही व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचं विलगीकरण करण्याच्या सूचना पोलीस महासंचालकांनी दिल्या होत्या, मात्र थविल यांनी या सूचनांचं पालन न केल्यामुळे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी थविल यांना नोटिस बजावली आहे. प्रशासनानं थविल यांच्यावर संशयित रुग्णांच्या विलगीकरणाची जबाबदारी सोपवली आहे.
****

 सांगली आणि मिरज शहरातही काल वारे आणि गारांसह पाऊस पडला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ, इचलकरंजी आणि गडहिंग्लज तालुक्यातल्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला.

 येत्या ३६ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 13 October 2026 Time 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...