Friday, 17 April 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 17.04.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 April 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ एप्रिल २०२० सायंकाळी ६.००

****

·      देशात कोरोना संसर्गाच्या वेगात ४० टक्के घट; रुग्णांचं कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण १३ पूर्णांक ६ टक्के.

·      राज्यात घरमालकांनी भाडेकरुंकडून भाडेवसुली तीन महिने पुढे ढकलण्याची गृहनिर्माण विभागाची सूचना.

·      हिंगोली जिल्ह्यातला पहिला कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त; रुग्णालयातून सुटी.

आणि

·      लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील कौळखेडच्या सात जणांचे अहवाल नकारात्मक.

****

देशात कोरोना संसर्गाच्या वेगात सुमारे ४० टक्के घट झाली असून रुग्णांचं कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण १३ पूर्णांक सहा दशांश टक्के असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. आरोग्य खात्याचे सचिव लव अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लॉकडाऊनपूर्वी देशातल्या रुग्णांची संख्या दर तीन दिवसांनी दुप्पट होत होती, आता सव्वा सहा दिवसांनी रुग्ण संख्या दुप्पट होत असल्याचं, अग्रवाल यांनी सांगितलं. देशातंर्गत चाचण्यांचं प्रमाण वाढलेलं असताना, रोगप्रसारात आलेली घट समाधानकारक आहे. सरकारकडून रोगनिदान आणि प्रतिबंधासाठी आणखी प्रयत्न सुरू असून, जलद चाचणी प्रक्रियेचा वेग वाढवून तीस मिनिटात अहवाल मिळवण्याचे प्रयत्न करत असल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.

देशात सध्या कोरोना बाधितांची संख्या १३ हजार ३८७ झाली असून, गेल्या २४ तासात एक हजार ७ नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासात देशात २३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एक हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात टपाल खात्यानं १०० टन औषधांसह अनेक आवश्यक वस्तूंची वाहतुक केली असून, दोन लाख पोस्टमनमार्फत बँक खात्यातला पैसा खातेधारकांपर्यंत पोहोचवला जात असल्याचं गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.

दरम्यान, विलगीकरण क्षेत्रात सलग चार आठवड्यात कोरोना बाधित नवीन रुग्ण आढळला नाही, तर त्या भागावरचं नियंत्रण शिथील करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. देशात महाराष्ट्रासह दिल्ली, तामिळनाडू, मध्यप्रदेश तसंच राजस्थानातून सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून देशभरात १७० हॉटस्पॉट, १२३ हॉटस्पॉट जिल्हे आढळले असून २०७ जिल्ह्यात एकही कोरोना हॉटस्पॉट नसल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यात घरमालकांनी भाडेकरुंकडून भाडेवसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, असे सूचना गृहनिर्माण विभागाने जारी केली आहे. कोरोना प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कामगारांचा रोजगार बंद असल्याने, त्यांना नियमित घरभाडे भरणं शक्य होत नसल्याचं दिसून येत आहे. या परिस्थितीत घरभाड्याची रक्कम वेळेवर अदा न केल्याच्या कारणावरून कोणत्याही भाडेकरूला घरातून काढू नये अशी सूचनाही करण्यात आली आहे. गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी याबाबतचं पत्र जारी केलं आहे.

****

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक - पीएमसी बँक आर्थिक घोटाळ्यातला आरोपी राकेश वाधवान याचा अंतरिम जामीन अर्ज मुंबईतल्या विशेष न्यायालयानं फेटाळून लावला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वाधवान यानं प्रकृतीचं कारण देत जामीन मागितला होता. मात्र न्यायालयानं जामीन नाकारला आहे.

****

सांगली शहरातील ९ भागातील रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. संचारबंदीच्या काळात प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नागरिक रस्त्यावर येत असल्यानं पोलिसांनी रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला. शहरातील प्रमुख मार्ग सुरू ठेवले असून या मार्गाने कोणी फिरताना आढळल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

****

धुळे शहरात कोरोना विषाणूची साथ पसरु नये यासाठी धुळे महापालिका प्रशासनानं मास्क न लावणे, सामाजिक अंतर न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यावर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. याबद्दल आयुक्त अजीज शेख यांनी लेखी आदेश आज जारी केले आहेत.

****

रायगड जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात बेकायदेशीरपणे वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करून गेल्या २२ दिवसांत रायगड पोलीसांनी ५१ लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ३ हजार ३१ वाहने जप्त केली असून १७ हजार ७९५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

****

राज्यशासनाने रब्बी हंगाम २०२० चा कापणी अहवाल स्वीकारला असून हरभरा खरेदीचं प्रमाण वाढवलं आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातल्या हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांचा ११ पूर्णांक २९ क्विंटल हरभरा खरेदी केला जाणार आहे. याआधी जिल्ह्यातून फक्त साडे सहा क्विंटल हरभरा खरेदीचा निर्णय शासनानं घेतला होता, मात्र यावर्षी हरभऱ्याचं हेक्टरी उत्पादन १० ते १५ क्विंटल पर्यंत झालं असल्यानं, खरेदीचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी यासाठी पाठपुरावा केला होता, त्यानंतर आता औरंगाबाद जिल्ह्यात प्रतिहेक्टरी ९ पूर्णांक ६२ क्विंटल, जालना १० पूर्णांक ५८, बीड ११ पूर्णांक ५६, लातूर ११ पूर्णांक २९, उस्मानाबाद ८ पूर्णांक ५, नांदेड १७ पूर्णांक ८, परभणी ८ पूर्णांक ६८, तर हिंगोली जिल्ह्यात प्रतिहेक्टर ९ पूर्णांक ८५ क्विंटल हरभरा खरेदी केला जाणार आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत २८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सध्या २४ कोरोनाबाधित रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. ५४ जणांना रुग्णालयात भरती करून देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. तर २३ जणांना घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिलेला असल्याचं, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.

****

परभणी शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. परभणीत कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे, जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी येत्या रविवारपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. परभणी शहरासह तीन किलोमीटरच्या परिघात याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे. शहरात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात पहिला कोरोना सकारात्मक रूग्ण आज कोरोनामुक्त झाला आहे. त्याला आज जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. यावेळी रुग्णालयातील विलगीकरण कक्षातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी या रूग्णास आनंदाने निरोप दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बुलडाणा जिल्ह्यात २० रुग्णांपैकी तिघांचा अहवाल नकारात्मक आल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आता १७ कोरोना सकारात्मक रुग्ण आहेत. यापैकी दोन बुलडाण्यामध्ये, तीन चिखलीमध्ये तीन, देऊळगाव राजा दोन, सिंदखेड राजा एक, मलकापूर चार, खामगाव तालुक्यातील चितोडा इथं दोन आणि शेगाव इथं तीन रुग्णसंख्या आहे. या १७ रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील कौळखेडच्या सात जणांचे अहवाल नकारात्मक आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय ढगे यांनी दिली आहे. देशात संचारबंदी लागू असतांना हे कुटुंब मुंबईहून एका खाजगी वाहनानं उदगीर तालुक्यातील कौळखेड इथं आलं होते. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात या कुटूंबाविरोधात गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. या सर्वांचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल नकारात्मक आला असून या सर्वांना घरात विलगीकरणात ठेवण्यात आल्याचं डॉ.ढगे यांनी सांगितलं.

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे रोजगार बंद झालेला असताना, प्रधानमंत्री जनधन योजनेच्या महिला खातेधारकांना पाचशे रुपये तर प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतला दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा झाला आहे. यामुळे शेतकरी तसंच महिला वर्गात समाधानाचं वातावरण आहे. मराठवाड्यात नांदेड, हिंगोलीसह अनेक भागातल्या नागरिकांनी याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

****

नांदेड इथल्या संत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रमाच्या वतीने कोविड १९ नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख अकरा हजार एकशे एक रूपये मदत देण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष सुधाकरराव टाक यांच्यासह विश्वस्तांच्या हस्ते निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांचेकडे या रकमेचा धनादेश आज सुपूर्द करण्यात आला.

****

दोंडाईचा इथं हस्ती कोऑपरेटिव्ह बँकेनं पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५ लाख आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ लाख, असा एकत्रित १० लाख रूपयांचा निधी दिला आहे. जिल्ह्याधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्याकडे दहा लाख रूपयांचा मदत निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसंच धुळे शहरातील उज्ज्वल ऑटोमोटिव्हतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तीन लाख रुपयांची मदत केली आहे.

****

नांदेड जिल्ह्यात ग्रामीण, नागरी आणि औद्योगिक क्षेत्रात ॲन्टी कोरोना कवच -फोर्सची स्थापना जिल्हादंडाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी आदेशाद्वारे नुकतीच केली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ.विपीन इटनकर यांनी दिले आहेत

****

हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी कुरुंदा आणि गिरगांव आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...