Thursday, 15 June 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 15.06.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१५ जून २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष मध्यावधी निवडणुकीची तयारी करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन भाजपचा घटक पक्ष असलेला शिवसेना पक्ष विरोधात गेल्यानं, मध्यावधी निवडणुकांची चर्चा सुरु होती. त्यावर परत निवडणुका झाल्यास भाजपच बहुमतानं विजयी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

****

नाशिक जिल्ह्यात वणी दिंडोरी रस्त्यावर लखमापूर फाटा इथं काल झाडाला धडकून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. आज पहाटे हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून, ते अहमदाबादहून अहमदनगरला जात होते. अद्याप कोणाचीही ओळख पटली नसून, मृतांना शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जम्मू काश्मीरमधल्या राजौरी आणि पूँछ जिल्ह्यात सीमेपलिकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असलेले दोन पाकिस्तानी जवान ठार झाले. पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार तसंच उखळी तोफांचा मारा करण्यात आला. भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिल्याचं संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनिष मेहता यांनी सांगितलं.    

****

उन्हाळी सुटीनंतर शाळांना आजपासून सुरुवात होत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं अभिनव पध्दतीनं स्वागत केलं जाईल. अनेक ठिकाणी पाठपुस्तकांचं वाटपही केलं जाणार आहे. अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना मिठाई देऊन शाळेचा पहिला दिवस साजरा केला जाणार आहे.

****

नांदेड - तिरुपती - नांदेड आणि नगरसोल - तिरुपती - नगरसोल या दोन विशेष रेल्वे गाड्यांना सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. नांदेड - तिरुपती ही गाडी नांदेडहून दर मंगळवारी संध्याकाळी निघून तिरुपती इथं बुधवारी दुपारी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी तिरुपती इथून बुधवारी दुपारी निघून गुरुवारी सकाळी नांदेड इथं पोहोचेल.

****

कृषी कर्जाच्या व्याजदरात अनुदान देण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत, कृषी कर्जासाठी दोन टक्के अनुदान तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त तीन टक्के अनुदान देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...