Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 June 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ जून २०१७ दुपारी १.००वा.
****
कत्तलीसाठी बाजारात प्राण्यांच्या खरेदी विक्रीवर
बंदी घालण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला उत्तर मागितलं आहे.
केंद्र सरकारच्या या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणी दरम्यान
न्यायालयानं केंद्र सरकारला येत्या दोन आठवड्यात यासंदर्भात अहवाल सादर करण्यास सांगितलं
आहे. ही अधिसूचना भेदभाव करणारी आणि असंवैधानिक असल्याचा आक्षेप हैदराबादच्या एका वकीलानं
या याचिकेद्वारे घेतला आहे. यावरील पुढील सुनावणी ११ जुलैला होणार आहे.
****
ग्रामीण भागात महिला बचत गटांना लहान व्यवसायिक
वाहन खरेदीसाठी व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार नवी योजना सुरु करणार
आहे. ग्रामीण भागातल्या सार्वजनिक परिवहन सेवेला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मिती
करण्यासाठी ही योजना राबवली जाणार असल्याचं, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र
सिंह तोमर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. प्रधानमंत्री ग्राम परिवर्तन योजना,
असं या योजनेचं नाव असून, १५ ऑगस्टला ही योजना सुरु करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
५० वर्षांपूर्वीच्या जुन्या धरणांच्या दुरुस्तीसाठी
जागतिक बँकेची मदत मिळण्याच्या दृष्टीनं देशातल्या सर्व राज्यांनी केंद्राच्या धरण
पुनर्वसन आणि सुधारणा योजनेत सहभागी होण्याची गरज असल्याचं, पुण्याच्या राष्ट्रीय जल
अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता चासकर यांनी म्हटलं आहे. ते पुणे इथं वार्ताहर परिषदेत
बोलत होते. या योजनेत केवळ सात राज्यं सहभागी झाली आहेत, मात्र, सर्वाधिक जुनी धरणं
असलेलं महाराष्ट्र आणि गुजरात राज्य यात सहभागी नसल्याचं ते म्हणाले.
****
महावितरण कंपनीनं नवप्रकाश योजनेला ३१ ऑगस्ट
पर्यंत मुदतवाढ दिली आहे. वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडीत झालेल्या कृषी ग्राहकांसह उच्च
आणि लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकी मुक्तीसाठी ही योजना आहे. या योजनेत सार्वजनिक
नळ पाणी पुरवठा योजना वगळता इतर ग्राहकांनी ३१ ऑगस्ट पर्यंत थकबाकीची मूळ रक्कम भरली,
तर ५५ टक्के व्याज आणि विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ होईल, असं महावितरणकडून सांगण्यात
आलं आहे.
****
शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तरावरच्या
ओझ्याची शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्यात तपासणी करावी, असे आदेश राज्य सरकारनं
जारी केले आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीचा अहवाल शिक्षण संचालकामार्फत
दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत राज्य शासनाला सादर करण्याच्या सूचनाही या आदेशात देण्यात
आल्या आहेत. दप्तराच्या ओझ्यातून विद्यार्थ्यांची सुटका करण्याच्या कामात कसूर करणाऱ्या
शिक्षण संस्थेच्या संचालक तसंच मुख्याध्यापकांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुद्ध कारवाईचे
आदेशही देण्यात आले आहेत.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांना माफक दरात आणि त्यांच्या
सोयीनुसार वीज पुरवठा उपलब्ध व्हावा या उद्देशानं सौर कृषी वाहिनी योजना सुरु करण्यासंबंधीचा
शासन निर्णय काल जारी करण्यात आला. या योजनेमुळे पारंपारिक विजेची बचत होईल, महावितरण
कंपनीच्या महसूलात वाढ होईल, तसंच वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी विजेचा दर कमी
राखण्यास मदत होईल, असं यात सांगण्यात आलं आहे.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘अजिंठा-वेरुळ’
लेण्यांवर पदविका अभ्यासक्रम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचं कुलगुरु डॉ. बी ए चोपडे
यांनी सांगितलं आहे. विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. अजिंठा आणि
वेरुळ लेण्यांवर मोठ्या प्रमाणावर संशोधन झालं असून, पदव्यूत्तर स्तरावर आणखी अभ्यास
होण्यासाठी अभ्यासक्रम सुरु करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
****
मॉन्सूनची पश्चिमेकडून पूर्वेकडे होणारी वाटचाल
वातावरणीय बदलांमुळे कुंठित झाली आहे. त्यामुळे तो संपूर्ण कोकणासह पश्चिम महाराष्ट्र
आणि कोकणाच्या बहुतांश भागात दाखल झाला असला, तरी तिथून पुढे सरकलेला नाही. मात्र,
काल मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पाऊस झाला. आजही या भागात अनेक ठिकाणी,
तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा
देण्यात आला आहे.
****
लंडन इथं सुरु असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स चषक
क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश दरम्यान दुसरा उपान्त्य फेरीचा सामना होणार
आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. आजच्या विजेत्या संघासमोर
अंतिम सामन्यात पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. काल झालेल्या पहिल्या उपान्त्य सामन्यात
पाकिस्ताननं इंग्लंडचा आठ गडी राखून पराभव केला.
****
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं सुरु असलेल्या
इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू एच एस प्रणय आणि कदंबी श्रीकांत
पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पोहोचले आहेत. बी साई प्रणितला मात्र पहिल्या फेरीत
पराभव पत्करावा लागला. तर महिला एकेरीत सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू उप उपान्त्य
सामन्यात पोहोचल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment