Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17
March 2018
Time 6.50 AM
to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१७ मार्च २०१८ सकाळी
६.५०
मि.
*****
Ø राज्यात प्लास्टिक आणि थर्माकोल
उत्पादनांचा वापर, साठवणूक, विक्री, तसंच वाहतुकीवर बंदी
Ø औरंगाबाद मनपा आयुक्त डी एम मुगळीकर यांची, मराठवाडा
वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिव पदी बदली
Ø मराठवाड्यात अवकाळी पाऊस; येत्या ४८ तासात गारपिटीचा
इशारा
आणि
Ø श्रीलंकेत सुरू असलेल्या निदाहास चषक टी ट्वेंटी
क्रिकेट मालिकेत श्रीलंकेवर मात करत, बांगलादेश अंतिम फेरीत; उद्या भारत आणि बांगलादेश
यांच्यात अंतिम सामना
*****
राज्यात प्लास्टिक तसंच
थर्माकोल पासून बनवण्यात येणाऱ्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. मंत्रिमंडळानं
या प्रस्तावाला मान्यता दिली असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल विधानसभेत
सांगितलं. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना कमाल २५ हजार रुपये दंड
आणि तीन महिन्यांच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. प्लास्टिक पिशव्या, तसंच थर्माकोल
आणि प्लास्टीक पासून बनवण्यात येणाऱ्या ताटल्या, कप, ग्लास, काटे चमचे, वाट्या, स्ट्रॉ, मेणकापड, पाकिटं,
सर्व प्रकारची प्लास्टिक वेष्टनं यांचा वापर, उत्पादन, साठवणूक, वितरण, घाऊक आणि
किरकोळ विक्री, आयात आणि वाहतूक करण्यास राज्यात बंदी असणार आहे. उद्या गुडीपाडव्यापासून
हा निर्णय लागू होणार असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
मात्र औषधांची वेष्टनं, वन आणि
फलोत्पादन, कृषी, रोपवाटिका, या क्षेत्रासह घनकचरा हाताळण्यासाठी आवश्यक
असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि अन्य साहित्य या बंदीतून
वगळण्यात आलं आहे. मात्र या कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या या साहित्यावर ठळकपणे
तसं नमूद करावं लागेल, असं कदम यांनी स्पष्ट केलं आहे.
****
तक्रार दाखल
करण्यासाठीच्या टोल फ्री क्रमांकाचा स्टिकर रिक्षा आणि टॅक्सी मध्ये लावणं अनिवार्य करणार
असल्याचं, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी, काल विधान परिषदेत
सांगितलं. ओला आणि उबेरला शहरांतर्गत टॅक्सीचा
दर्जा देऊन, त्या सीएनजीवर चालवणं सक्तीचं करणार असल्याचं, ते म्हणाले. राज्यातल्या सुमारे चार लाख
बेकायदा रिक्षा चालकांना परवाना घेण्यासाठीची मुदत या महिन्यात
संपते आहे, आवश्यकता भासली तर ही मुदत एक
दोन महिन्यांसाठी वाढवली जाईल, असं सांगतानाच त्यांनी, रिक्षा
तसंच टॅक्सी चालकांनी आपली वर्तणूक सुधारावी असं, आवाहनही केलं.
****
राज्याचं नवीन वस्त्रोद्योग धोरण २०१८ ते २०२३ जाहीर करण्यात आलं आहे. या धोरणात येत्या पाच
वर्षात दहा लाख रोजगार निर्मिती करण्याचं तसंच २०२२ पर्यंत
राज्यातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं लक्ष्य ठेवण्यात
आलं असल्याचं वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधानपरिषदेत सांगितलं.
विनाअनुदानित शाळेतले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं
अनुदान, निवृत्ती वेतन, वैद्यकीय प्रतिपुर्ती यासह विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी
लवकरच विशेष बैठक घेण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल विधान परिषदेत
प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली.
वाळूच्या कमतरतेमुळे रखडलेल्या
सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी, राष्ट्रीय हरित लवादाकडून विशेष बाब म्हणून
धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे
यांनी काल विधानपरिषदेत दिली.
केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्रातही
पुढच्या सहा महिन्यात स्वतंत्र परिचऱ्या संचालनालय स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं
आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं.
****
आगामी लोकसभा निवडणुकीतही भारतीय जनता
पक्ष आणि शिवसेना यांची युती कायम राहील, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार
रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. काल मुंबईत पीटीआयशी बोलताना दानवे यांनी, मध्यावधी
निवडणुकीची शक्यता फेटाळून लावली.
मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा
शिवसेनेला पाठिंबा असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल
मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. या पोटनिवडणुकीसंदर्भात शिवसेनेच्या नेत्यांसोबत आपली
बैठक झाल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्र सरकारविरोधात तेलगू देशम पक्षाने दाखल केलेल्या अविश्वास
प्रस्तावाला शिवसेना समर्थन देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
*****
औरंगाबाद महानगरपालिकेचे
आयुक्त डी एम मुगळीकर यांची, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिव पदावर बदली
करण्यात आली आहे. शासनानं काल याबाबतचे आदेश जारी केले. मुगळीकर यांनी काल या पदाचा
कार्यभार स्वीकारला. दरम्यान, महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार सध्या जिल्हाधिकारी नवल
किशोर राम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
****
मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे
यांना काल औरंगाबाद इथं काळं फासण्यात आलं. राज्य मागासवर्ग आयोगाच्या मराठा आरक्षणा
संदर्भातल्या जन सुनावणीत निवेदन देण्यासाठी आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी
हे कृत्य केल्याचं सांगण्यात आलं.
****
दरम्यान, काल झालेल्या या सुनावणीत, मराठवाडा
पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या
आधारावर मराठवाड्यातल्या मराठा समाजाचा इतर मागास वर्ग ओबीसीत समावेश करावा अशी मागणी
केली. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड आणि सदस्यांकडे चव्हाण
यांनी हे निवेदन दिलं.
****
मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी पावसानं हजेरी
लावली. जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस
झाला. अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, बाजरी या पिकांसह आंबा, खरबूज, टरबुज या फळपिकांचं
नुकसान झालं. येत्या ४८ तासात गारपीटीचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी सतर्क
राहण्याचं आवाहन नांदेड महापालिकेनं केलं आहे.
****
श्रीलंकेत सुरू असलेल्या निदाहास चषक क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या रोमहर्षक सामन्यात
बांगलादेशनं श्रीलंकेचा दोन गडी राखून पराभव केला. श्रीलंकेनं दिलेलं १६० धावांचं लक्ष्य
बांगलादेशनं एक चेंडू आणि दोन गडी राखून साध्य केलं. या स्पर्धेचा अंतिम सामना उद्या
भारत आणि बांगलादेश संघात होणार आहे.
****
इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही.सिंधुनं उपांत्य
फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात सिंधुनं जपानच्या नोझोमी ओखुहारा हिचा २०-२२, २१-१८, २१-१८ असा पराभव केला.
****
मराठवाड्यात जलजागृती सप्ताहाला कालपासून प्रारंभ झाला. उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी
राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते तर नांदेड इथं उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या
हस्ते या सप्ताहाचं उद्घाटन झालं. या सप्ताहांतर्गत प्रत्येक गावात येत्या २२ मार्च
पर्यंत कार्यशाळा घेण्यात येणार असून, पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत जागृती करण्यात
येणार आहे
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं आजपासून
तीन दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवाला प्रारंभ होत आहे. शहरातल्या कृषी महाविद्यालय परिसरात
सकाळी ११ वाजता या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे.
येत्या २४ मार्च पासून लातूर इथंही
जिल्हा कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे, महोत्सवामध्ये शेती उत्पादनांसोबत शासनाच्या
योजनांच्या माहिती दालनांसह कृषीतज्ञाचं मार्गदर्शन, आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात
आलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment