Sunday, 19 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.08.2018 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 August 2018

Time 18.00 to 18.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ ऑगस्ट २०१८ सायंकाळी ६.०० वा.

****



 अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी सचिन अणदुरे याला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला २६ ऑगस्टपर्यंत केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयची कोठडी सुनावली आहे. अणदुरे यानं महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून नेमबाजीचं प्रशिक्षण घेतल्याचं सीबीआयनं न्यायालयाला सांगितलं. या प्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकानं जालना इथल्या एका माजी नगरसेवकालाही ताब्यात घेतलं आहे. एका राजकीय पक्षाचा नगरसेवक म्हणून दहा वर्ष कार्यरत राहिल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून हा संशयित राजकारणात सक्रिय नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 दरम्यान, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला उद्या पाच वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज लातूर शहरातल्या गांधी चौकात अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि समविचारी संस्था-संघटनांच्या वतीनं ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आलं. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास कधी पूर्ण होणार, असा प्रश्न सरकारला यावेळी विचारण्यात आला.

****



 माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचं आज हरिद्वारमध्ये गंगा नदीत विसर्जन करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंग, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यावेळी उपस्थित होते. वाजपेयी यांच्या अस्थींचं विसर्जन देशातल्या शंभर नद्यांमध्ये करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 मॉरिशसमधे पोर्ट लुईस इथं आयोजित जागतिक हिंदी परिषदेत परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते आज पाणिनी भाषा प्रयोगशाळेचं उद्घाटन झालं. परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचं संरक्षण, प्रसारमाध्यमं आणि भारतीय संस्कृती, जागतिक स्थलांतर -भाषा आणि संस्कृती, हिंदी बाल साहित्य आणि भारतीय संस्कृती इत्यादी विषयांवर चर्चा सुरू आहे. प्रसिध्द गीतकार, लेखक आणि कवी प्रसून जोशी यांच्यासह भारत आणि मॉरिशसमधील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****



 केरळमधल्या पूरग्रस्तांसाठी आज मुंबईतून तटरक्षक दलाच्या जहाजातून ६५ टन उपयोगी साहित्य पाठवण्यात आलं. राज्य सरकार तसंच विविध स्वयंसेवी संस्थांनी दिलेलं हे साहित्य संकल्प नावाच्या जहाजातून पाठवल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे.

****



 भारतीय जनता पक्ष जातीय राजकारण करत असून, लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. गोंदिया इथं आज पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती होणार असून, सत्ताही याच पक्षांची असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप मात्र नागरिकांना परत खोटी आश्वासनं देऊन सत्तेत येण्याचा प्रयत्न करेल, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.

****



 माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आज जालना इथं सर्वपक्षीय श्रध्द्धांजली अर्पण करण्यात आली. फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित या श्रद्धांजली सभेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आदींनी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

****



 इंडोनेशिया इथं सुरु असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताच्या सुशील कुमारला पहिल्याच लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. तर बजरंग पुनिया आणि संदीप तोमर यांनी विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जलतरण स्पर्धेत साजन प्रकाश आणि श्रीहरी नटराज या जोडीनं अंतिम फेरीत धडक मारली. साजन पुरूषांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात दुसरा आला, तर नटराजनं १०० मीटरच्या बॅकस्ट्रोक प्रकारात पहिला क्रमांक पटकावला. रोईंग स्पर्धेत ओम प्रकाश, सवर्ण सिंग या जोडीनं आणि मलकीत सिंग आणि गुरींदर सिंग या जोडीनंही अंतिम फेरीत धडक मारली. कबड्डी मध्ये भारतीय महिला संघानं जपानचा ४१ - १२ असा, तर पुरुष संघानं बांग्लादेशचा पराभव केला.



 दरम्यान, या स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळवून देणारे नेमबाज अपूर्वी चंदेला आणि रविकुमार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. १० मीटर रायफल मिश्र सांघिक प्रकारात या जोडीनं आज कांस्य पदक पटकावलं.

****



 महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुणे इथं असोसिएशनच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात झाली. संजीवराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...