Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 17 January 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जानेवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
अतिशय
वेगानं विकसित होत असलेला रबर उद्योग देशात अधिकाधिक रोजगार संधी निर्माण करील, यामुळे
निर्यात वाढून देशाच्या उत्पन्नात भर पडेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग
मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला आहे. मुबंईत आज दहाव्या ‘इंडिया रबर एक्स्पो
२०१९’चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. रबर उद्योग हा विकसित उद्योग असल्याबद्दल
आपण अभिमान बाळगला पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले. मात्र, त्यात तंत्रज्ञानविषयक आणखी
सुधारणा करण्यावरही त्यांनी भर दिला. हे प्रदर्शन रबर उद्योग क्षेत्रात विकासाच्या
प्रक्रियेला गती देण्याचं काम करेल अशी अपेक्षा प्रभू यांनी व्यक्त केली.
****
केंद्रीय
अन्वेषण विभाग - सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांच्या बदलीसाठी स्थापन करण्यात
आलेल्या समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर
टीका केली आहे. केंद्रीय दक्षता आयोगानं दिलेल्या निर्णयात काही तथ्य आढळली, ज्याकडे
समिती दुर्लक्ष करु शकली नाही, असं जेटली यांनी सामाजिक माध्यमावर लिहीलेल्या संदेशात
म्हटलं आहे. तपास यंत्रणांना परदर्शी बनवणं ही सरकारची जबाबदारी असल्याचंही त्यांनी
म्हटलं आहे.
****
अंधश्रद्धा
निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या
हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात अद्याप आरोपपत्र दाखल केलं नसल्याबद्दल
मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास संथगतीनं सुरु असल्याबद्दल
न्यायालयानं केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआय आणि गुन्हे अन्वेषण विभाग - सीआयडीवर
ताशेरे ओढले. न्यायमूर्ती एस सी धर्माधिकारी आणि एम एस कर्णिक यांच्या खंडपीठानं आज
यासंदर्भातल्या सुनावणीवेळी या हत्या प्रकरणात फरार आरोपींचा शोध लावण्यासाठी दोन्ही
तपास यंत्रणांनी प्रामाणिक प्रयत्न करावे, असं सांगितलं आहे.
****
डान्सबारसंबंधी
सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं राज्य सरकार पालन करेल, तसंच त्याठिकाणच्या
बेकायदेशीर कृत्यावर लक्ष ठेवेल, असं गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी म्हटलं आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. न्यायालयाच्या निर्णयाची
प्रत अद्याप राज्य सरकारकडे आली नसून, ती मिळाल्यावर पुढील दिशा ठरवली जाईल, असं ते
म्हणाले. डान्स बारला सायंकाळी सहा ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंतची मर्यादा, तसंच
बारबालांवर पैसे उधळण्यास बंदी, या राज्य सरकारच्या अटी न्यायालयानं कायम ठेवल्या असल्याचं
त्यांनी नमूद केलं.
****
दरम्यान,
डान्सबारसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय दुर्देवी असून, याप्रकरणी सर्वोच्च
न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं आर. आर. पाटील फाऊंडेशनचे विनोद
पाटील यांनी म्हटलं आहे. डान्सबार मुळे अनेक गुन्हेगारी प्रवृत्ती वर येतील, अनेक कुटुंब
उद्वस्त होतील, असं पाटील यांनी पसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. डान्स बार बाबतचा
२०१६चा कायदा राज्य सरकारनं रद्द करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला
आहे.
****
कोल्हापूर
लोकसभा मतदार संघाचे खासदार धनंजय महाडिक यांना सलग तिसऱ्या वर्षी संसदरत्न पुरस्कार
जाहीर झाला आहे. खासदार म्हणून त्यांनी कोल्हापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या
सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. १९ जानेवारीला चेन्नई इथल्या राजभवनात तमिळनाडूचे
राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते महाडिक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात
येणार आहे.
****
कोल्हापूर
जिल्ह्यात सौर ऊर्जेवर चालणारे चार प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. गडहिंग्लज, आजरा,
चंदगड आणि गगनबावडा या तालुक्यांचा समावेश आहे. वीजटंचाईवर मात करण्यासाठी आणि अपारंपरिक
ऊर्जा मार्गांचा वापर करण्याच्या हेतूनं राज्य शासनानं प्रत्येक जिल्ह्यात सौर ऊर्जा
प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
****
मलेशियात
क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आज पुरुष एकेरीत
किदांबी श्रीकांत आणि महिला एकेरीत सायना नेहवालनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
किदांबी श्रीकांतनं हाँगकाँगच्या वॉंग विंग कीचा, तर सायना नेहवालनं हाँगकाँगच्याच
यिप पुई यिनचा पराभव केला. महिला दुहेरीत मात्र, अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी
यांना इंडोनेशियाच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला.
****
पुणे
इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्रानं आज आणखी दोन सुवर्ण पदक
पटकावली. खो खो मध्ये १७ वर्षांखालच्या राज्याच्या पुरुष संघानं आंध्र प्रदेशचा १९
- आठ असा, तर महिला संघानं दिल्लीचा १९ - १७ असा पराभव करत सुवर्ण पदक जिंकलं. ६६ सुवर्ण,
५१ रौप्य आणि ६२ कांस्य पदकं पटकावत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. ४७ सुवर्ण पदकांसह
दिल्ली दुसऱ्या, तर ३८ सुवर्ण पदकांसह हरियाणा तिसऱ्या स्थानावर आहे.
****
No comments:
Post a Comment