Sunday, 2 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.06.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
महाराष्ट्रातल्या विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेचा प्रकोप जाणवत आहे. पुढील चार दिवस उन्हाचा कडाका कायम राहाण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. देशाच्या अनेक भागातही उष्णतेची लाट कायम असून राजस्थानात चुरु इथं तापमानानं ५० अंश सेल्सियसचा टप्पा ओलांडला. ५० पूर्णांक ८ अंश सेल्सियस तापमानासह काल चुरु हे देशातलं सर्वात उष्ण ठिकाण होतं. येत्या दोन दिवसांत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. याकाळात, राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
राज्यामध्ये शिवसेना आणि भाजप युती विधानसभा निवडणुकीतील २८८ पैकी प्रत्येकी १३५ जागा लढवेल आणि उर्वरित १८ जागा अन्य मित्र पक्षांना सोडेल, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यांनी काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्यात युतीचं नेतृत्व करतील, असंही पाटील यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं. 
****
विद्यापीठातल्या अभ्यासक्रमांमध्ये मोठा बदल घडवून आणण्याची गरज असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. उद्योगांनी विद्यापीठातल्या विविध शाखांशी चर्चा करुन त्यांच्या मदतीनं सध्याच्या काळात आवश्यक असे अभ्यासक्रम तयार करायला हवेत असंही ते म्हणाले. उपराष्ट्रपती, विशाखापट्टणम इथं शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी, इंडस्ट्री - ‍अॅकॅडमीच्या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात मार्गदर्शन करत होते. औद्योगिक संस्थांनी पुढं येऊन शैक्षणिक संस्थांना त्यांच्या पायाभूत सुविधा आणि उच्च दर्जाचं संशोधन साहित्य तयार करायला मदत करण्यास पुढाकार घेतला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. देशाची शैक्षणिक पद्धत आमूलाग्र रितीनं बदलायला हवी आणि विद्यापीठांनी तसंच इतर शैक्षणिक संस्थांनी संशोधन वृत्तीचा विकास करायला हवा, असंही उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, या परिषदेत म्हणाले.
****
बरेली इथून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या, हॉलिडे एक्स्प्रेसच्या वातानुकुलित डब्याचे चाक तुटल्याची दूर्घटना, आज सकाळी नांदगांव रेल्वे स्थानकाजवळ घडली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच मनमाड इथून, दुर्घटना राहत ही विशेष गाडी घटनास्थळी पोहचली असून कोणीही जखमी झाल्याचं वृत नसल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.  
****
यवतमाळ जिल्ह्यात बोगस खतांचं प्रकरण गाजत असताना स्थानिक एमआयडीसीतल्या 'हिंदुस्तान ॲग्रो'ला कृषी विभागानं सील ठोकलं आहे. साठे बुक  आणि अन्य माहिती उपलब्ध होईपर्यंत हा कारखाना सीलबंद राहणार आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कृषी संजीवक आणि कीटकनाशकाचा साठा आढळला. अवैधपणे या कारखान्यात खतं कीटकनाशकं तयार केली जातात, असा आरोप होता. यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामापूर्वी मोठ्या प्रमाणात नियमबाह्य खतं आणि औषधी साठा आला असून शेतकऱ्यांची  फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातील शेतकरी आणि आमदार डॉ. राहुल पाटील तसंच शिवसेना कार्यकर्त्यांनी आज सेलू तालुक्यातील मोरगाव इथं निम्न दुधना प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याचं जलपूजन केलं. उद्या सकाळी झरी इथं परिसरातील ग्रामस्थ जलपूजन करणार आहेत, अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून परभणी जिल्ह्यासाठी काल पाणी सोडण्यात आलं आहे.
****
पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दूर्घटना अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव इथं घडली. बारा वर्षीय रोहित  वानखडे आणि अकरा वर्षीय देवा  वानखडे अशी या बालकांची नावे असून शनिवारी सायंकाळी बुडालेल्या या दोन बालकांचे मृतदेह आज दुपारी शेततळ्यातून काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
चंद्रपूर जिल्ह्यातील, सिंदेवाही तालुक्यात, गडबोरी गावात, आज पहाटे एका नऊ महिन्यांच्या बाळाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 05 July 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...