Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
–
02 June 2019
Time
20.00 to 20.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जून २०१९
- २०.००
****
छत्रपती शिवरायांच्या किल्ले रायगड या स्वराज्याच्या
राजधानीचं जतन करुन देशभक्तीचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील
असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज रायगडच्या किल्ल्याला भेट दिली, त्यावेळी ते
बोलत होते. रायगडाच्या विकासासाठी शासनानं
सहाशे कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला
असून पहिल्या टप्प्यात एकोणसाठ कोटी रुपयांची
कामं पूर्ण होत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी किल्ल्याच्या जतन संवर्धन कामांची
काल पाहणी केली. भारतीय पुरातत्व विभागाच्या
मार्गदर्शनाखाली किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचं काम योग्य पद्धतीनं सुरु असल्याचं
त्यांनी नमूद केलं.
****
दुष्काळमुक्तीसाठी शासन करत असलेल्या उपाययोजनांमध्ये
स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी
केलं आहे. औरंगाबाद शहरात ‘महाराष्ट्रातील दुष्काळ आणि स्वयंसेवी संस्थांची भूमिका’
या विषयावरील बैठकीत ते बोलत होते. दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी, गुरांना चारा,
हाताला काम आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यावर शासन भर देत असल्याचंही त्यांनी
यावेळी सांगितलं. दुष्काळावर मात करण्यासाठी शासन वेळेअगोदर सज्ज झालं असून वेळेच्या
आत राज्यात दुष्काळ जाहीर केला असंही महसूल मंत्री पाटील यांनी नमूद केलं.
****
दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
देतांना कृषि, महसूल, ग्रामविकास, महावितरण आदी शासकीय विभागांनी संवेदनशीलपणे काम
करावं असं आवाहन बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्या काल
बीड इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत बोलत होत्या. शेतकऱ्यांसाठीच्या शासकीय योजना
आणि उपाययोजनांचा फायदा पोहचावा म्हणून खरिप हंगामात आवश्यक बी-बियाणे, खते तसेच पिक
कर्ज आणि अनुदान वेळेत दिलं जावं असंही त्यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात
आलेल्या मोबाईल ॲपचं यावेळी पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
****
राज्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती
विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी प्रत्येकी १३५ जागा लढवेल आणि उर्वरित १८ जागा अन्य मित्र
पक्षांना सोडेल, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
यांनी दिली आहे. मुंबईत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस हेच राज्यात युतीचं नेतृत्व करतील, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
देशात उष्णतेची तीव्रता असताना आज नाशिक जिल्ह्यातल्या
मनमाड आणि लासलगाव इथं मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. या दोन्ही ठिकाणी सुमारे
एक तास पाऊस झाला.
****
उत्तर प्रदेशातल्या बरेलीहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या,
हॉलिडे एक्स्प्रेसच्या वातानुकुलित डब्याचे चाक तुटल्याची दुर्घटना, आज सकाळी नाशिक
जिल्ह्यात नांदगांव रेल्वे स्थानकाजवळ घडली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक
ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच मनमाड इथून, अपघात मदत विशेष गाडी घटनास्थळी
पोहचली आहे.
****
कर्नाटकमध्ये बेळगाव शहरात श्रीनगर गार्डनजवळ पुणे
- बंगळुरू महामार्गावर मोटारीला झालेल्या अपघातात सात युवक जागीच ठार झाले. आज दुपारी
दीड वाजता ही दुर्घटना घडली. यातले मृत सर्वजण औरंगाबादचे रहिवासी होते. कोल्हापूरहून
गोव्याकडे निघालेल्या या मोटारीचा टायर फुटल्यानं चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि
ती दुभाजकाला धडकून दुसऱ्या बाजूला जाऊन आदळली. त्याचवेळी कोल्हापूरहून येणाऱ्या एका भरधाव ट्रकनं या मोटारीला
जोरदार धडक दिली. यात मोटारीतले सर्व प्रवासी ठार झाले.
****
यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक औद्योगिक परीसरातल्या 'हिंदुस्तान
ॲग्रो' या कंपनीला कृषी विभागानं टाळं लावलं आहे. साठा पुस्तक आणि अन्य माहिती उपलब्ध
होईपर्यंत हा कारखाना बंद राहणार आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कृषी संजीवक आणि कीटकनाशकाचा
साठा आढळला. अवैधपणे या कारखान्यात खतं कीटकनाशकं तयार केली जातात, असा आरोप होता.
****
परभणी जिल्ह्यातील शेतकरी आणि आमदार डॉ. राहुल पाटील
तसंच शिवसेना कार्यकर्त्यांनी आज सेलू तालुक्यातल्या मोरगाव इथं निम्न दुधना प्रकल्पातून
सोडण्यात आलेल्या पाण्याचं जलपूजन केलं. उद्या सकाळी झरी इथं ग्रामस्थ जलपूजन करणार
आहेत. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून
परभणी जिल्ह्यासाठी हे पाणी सोडण्यात आलं आहे.
****
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांग्लादेशनं दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी तीनशे
एकतीस धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. दक्षिण अफ्रिकेनं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण अफ्रिकेनं दहा
षटकात एक बाद ४९ धावा केल्या होत्या.
****
No comments:
Post a Comment