Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 03 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ जून २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø दुष्काळमुक्तीसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं आवाहन
Ø येत्या विधानसभा
निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता
पक्ष प्रत्येकी १३५ जागा लढवणार तर १८ जागा मित्र पक्षांना सोडणार
Ø गोव्याला सहलीसाठी
जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या तरूणांच्या मोटारीला बेळगावमध्ये
अपघात; सात जणांचा मृत्यू
आणि
Ø विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांग्लादेशचा दक्षिण
अफ्रिकेवर एकवीस धावांनी विजय
****
दुष्काळ मुक्तीसाठी शासन करत असलेल्या उपाय योजनांमध्ये स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा
असं आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. औरंगाबाद शहरात ‘महाराष्ट्रातील दुष्काळ आणि स्वयंसेवी संस्थांची भूमिका’ या विषयावरील बैठकीत ते बोलत होते. दुष्काळावर मात करण्यासाठी
पाणी, गुरांना चारा, हाताला काम आणि शेतकऱ्यांना
नुकसान भरपाई देण्यावर शासन भर देत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. दुष्काळावर मात करण्यासाठी शासन वेळे अगोदर सज्ज झालं असून वेळेच्या आत राज्यात दुष्काळ जाहीर
केला असंही महसूल मंत्री पाटील यांनी नमूद केलं.
पाटील यांनी काल औरंगाबाद तालुक्यात करमाड इथं सुरू करण्यात आलेल्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चारा छावणीलाही भेट दिली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मराठवाडा
विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, आमदार अतुल सावे, बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, आदी त्यांच्या सोबत होते. शेळ्या मेंढ्यांच्या छावण्याही सुरू करण्याबाबत स्वयंसेवी संस्थांनी
पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
छत्रपती शिवरायांच्या ‘ किल्ले रायगड ’ या स्वराज्याच्या राजधानीचं
जतन करुन देशभक्तीचा
जाज्वल्य इतिहास पुढच्या
पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल रायगडच्या किल्ल्याला भेट दिली,
त्यावेळी ते बोलत होते. रायगडाच्या विकासासाठी
शासनानं सहाशे कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला
असून पहिल्या टप्प्यात
एकोणसाठ कोटी रुपयांची कामं पूर्ण होत आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी किल्ल्याच्या जतन
संवर्धन कामांची काल पाहणी केली. भारतीय
पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचं काम योग्य पद्धतीनं
सुरु असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
राज्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची
युती विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी प्रत्येकी १३५ जागा लढवेल आणि उर्वरित १८ जागा अन्य
मित्र पक्षांना सोडेल, अशी
माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
औरंगाबाद मध्ये वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
युतीच्या जागा वाटपाचा हा फॉर्म्युला ठरला असून मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस हेच राज्यात युतीचं नेतृत्व करतील, असंही पाटील यांनी
यावेळी सांगितलं. औरंगाबादचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव
हा भारतीय जनता पक्षामुळे नव्हे तर शिवसेनेच्याच माजी आमदारामुळे झाल्याचं त्यांनी
वार्ताहरांच्या एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितलं.
****
औरंगाबाद शहरातल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तातडीच्या
उपाय योजना राबवण्याकरता १०५ कोटी रूपयांचा
निधी उपलब्ध करून देण्याची मागणी महापौर नंदकुमार
घोडेले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे
केली आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त
भागाची पाहणी करण्यासाठी पाटील हे काल औरंगाबाद मध्ये आले होते,
त्यावेळी महापौर घोडेले आणि आमदार अतुल सावे यांनी त्याची भेट घेतली.
जायकवाडी धरणातला पाणीसाठा मृत साठ्यात गेला असून
धरणाच्या मूळ कालव्यातून होणारा पाणीपुरवठा बंद झालेला आहे. त्यामुळे
महापालिकेनं आपत्कालीन पाणीपुरवठा योजना सुरू केली आहे.
जायकवाडीतल्या मुख्य योजनांचे पंप बदलणे, योजनांचे
सक्षमीकरण करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे इत्यादी कामांसाठी
हा निधी उपलब्ध व्हावा असं या निवेदनात म्हटलं आहे.
****
गोव्याला सहलीसाठी निघालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या
सात तरूणांच्या मोटारीला कर्नाटकात पुणे-
बंगळुरू महामार्गावर, बेळगाव शहरानजिक श्रीनगर गार्डनजवळ अपघात झाला. यात हे सातही तरूण ठार झाले. काल दुपारी दीड वाजता ही दुर्घटना घडली. कोल्हापूरहून
गोव्याकडे निघालेल्या या मोटारीचं समोरचं टायर फुटल्यानं चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला
आणि ती दुभाजकाला धडकून
दुसऱ्या बाजूला जाऊन आदळली. त्याचवेळी कोल्हापूरला जाणाऱ्या भरधाव ट्रकची या मोटारीला जोरदार
धडक बसली. यात मोटारीतले पाच जण जागीच ठार झाले. तर, अन्य दोघे बेळगावच्या रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत पावले. मृत तरूण दौलताबाद आणि शरणापूरचे
रहिवासी आहेत.
****
देशात उष्णतेची तीव्रता असताना काल नाशिक जिल्ह्यातल्या
मनमाड आणि लासलगाव इथं मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. या दोन्ही ठिकाणी सुमारे एक तास पाऊस
झाला. जळगाव, धुळे आणि सातारा
जिल्ह्यात काल काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाउस झाला. जळगाव जिल्ह्यतल्या यावल इथं
झालेल्या गारपीटीमुळं केळाच्या पिकांचं नुकसान झालं आहे. घरांवरील पत्रेही
उडाल्यामुळं एक मुलगा जखमी झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही काल
वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. येत्या काही
दिवसात मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या
पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
देतांना कृषि, महसूल,
ग्रामविकास, महावितरण आदी शासकीय विभागांनी संवेदनशीलपणे
काम करावं असं आवाहन बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
त्या काल बीड इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत बोलत होत्या.
शेतकऱ्यांना शासकीय योजना आणि उपाययोजनांचा फायदा
पोहचावा म्हणून खरिप हंगामात आवश्यक बी-बियाणे, खते तसेच पिक कर्ज आणि अनुदान वेळेत दिलं जावं असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲपचं यावेळी पालकमंत्री मुंडे
यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्यातील शेतकरी आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील तसंच शिवसेना कार्यकर्त्यांनी
काल सेलू तालुक्यातल्या मोरगाव इथं निम्न दुधना प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याचं
जलपूजन केलं. आज सकाळी झरी इथं ग्रामस्थ जलपूजन करणार आहेत. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून
परभणी जिल्ह्यासाठी हे पाणी सोडण्यात आलं आहे.
****
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक
क्रिकेट स्पर्धेत काल बांगलादेशनं दक्षिण
अफ्रिकेला एकवीस धावांनी पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशनं पन्नास षटकात तीनशे तीस धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण अफ्रिकेचा संघ
मात्र, पन्नास षटकात आठ बाद ३०९ धावांच करू शकला. फलंदाजी करताना
७५ धावा करणारा आणि एक बळी घेणारा बांगलादेशचा
शाकिब अल हसन सामनावीर ठरला.
****
भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या वैद्यकीय आणि सामाजिक विकासाचं काम
सोहम संस्थेमार्फत करणारे ‘डॉक्टर फॉर बेगर्स’ डॉक्टर मनिषा आणि डॉक्टर अभिजित सोनवणे दांपत्याचा मुक्त संवादाचा कार्यक्रम
काल औरंगाबाद इथं झाला. संवाद सेतु प्रतिष्ठान आणि सेवांकुर यांच्यातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. गरीबांना भीक न देता त्यांना स्वता:च्या पायावर उभं राहण्यासाठी
, त्यांच्या पुनर्वसनाचं काम आपण करत असल्याचं
डॉक्टर अभिजित सोनवणे यांनी नमूद केलं.
****
प्रधानमंत्री पीक वीमा योजनेत सहभागी होण्यासाठी
२४ जुलै पर्यंत मुदत देण्यात आली असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाच्या वतीनं देण्यात
आली आहे. या योजनेत सहभागी
होण्यासाठी बॅंक आणि “आपले सरकार सेवा केंद्र” यांच्या मार्फत ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठात प्रस्तावित श्री गुरुगोविंदसिंघजी अध्यासन संकुलाच्या इमारतीचं
भूमिपूजन, तसंच
प्राणी संग्रहालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते केले
जाणार आहे. विद्यापिठाच्या “आव्हान-२०१९” या कार्यक्रमाचा शुभारंभही
त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
****
परभणी इथं काल शासनाचा सामाजिक न्याय विभाग आणि संबोधी अकादमीतर्फे ७६ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी राज्य अनुसुचित जाती-जमाती आयोग सदस्य माजी न्यायमुर्ती सी. एल. थूल, आमदार डॉक्टर राहुल पाटील, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
****
विष्णुपुरी प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून नांदेड
शहराला पाणी पुरवठा केला जाणार असल्यामुळे आता शहराला पाच दिवसाआड पाणी सोडावं लागणार आहे, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
यापार्श्वभूमीवर महापालिकेनं नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी
कमीत कमी पाणी वापर करून सहकार्य करण्याचं
आवाहन केलं आहे.
****
पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा शेततळ्यात
बुडून मृत्यू झाल्याची दूर्घटना अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या गाडेगाव
इथं घडली. बारा वर्षीय रोहित वानखडे आणि अकरा वर्षीय देवा वानखडे
अशी या बालकांची नावं असून शनिवारी सायंकाळी बुडालेल्या या दोन बालकांचे मृतदेह काल
दुपारी शेततळ्यात सापडले.
****
उत्तर प्रदेशातल्या बरेलीहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या, हॉलिडे एक्स्प्रेसच्या वातानुकुलित डब्याचे
चाक तुटल्याची दुर्घटना, काल सकाळी नाशिक जिल्ह्यात नांदगांव
रेल्वे स्थानकाजवळ घडली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक
ठप्प झाली होती.
*****
***
No comments:
Post a Comment