Monday, 3 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.06.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०३ जून  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 जम्मू काश्मीरमधे शोपियां जिल्ह्यातल्या मोलू चित्रगाम परिसरात आज पहाटे सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. त्यांचे मृतदेह मिळालं असून ओळख पटवण्याचं काम सुरु असल्याचं सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितलं. या भागातून जाणाऱ्या सैन्याच्या धडक कृती दलावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केल्यानंतर ही चकमकम सुरू झाली होती.
****

 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सियाचेन ग्लेशिअरला भेट देऊन पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागातल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेणार आहेत. लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत हे देखील त्यांच्या सोबत असतील. या भेटी दरम्यान राजनाथ सिंह जवान आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. लष्कराची सज्जता तसंच १४ कॉर्प्स आणि १५ कॉर्प्स या तुकड्यांच्या कार्यप्रणालीवर आधारित सविस्तर सादरीकरण त्यांच्या समोर केलं जाणार आहे. या तुकड्यांवर चीन आणि पाकिस्तानलगतच्या नियंत्रण रेषेवर तसंच काश्मीर खोऱ्यात दहशतवादविरोधी मोहिमेची जबाबदारी असल्याची माहिती सैन्यदलानं दिली आहे.
****

 दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देताना कृषि, महसूल, ग्रामविकास, महावितरण आदी शासकीय विभागांनी संवेदनशीलपणे काम करावं, असं आवाहन बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्या काल बीड इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत बोलत होत्या. शेतकऱ्यांना शासकीय योजना आणि उपाययोजनांचा फायदा पोहचावा म्हणून खरिप हंगामात आवश्यक बी-बियाणं, खतं तसंच पिक कर्ज आणि अनुदान वेळेत दिलं जावं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲपचं यावेळी पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
****

 पंतप्रधान पीक वीमा योजनेत सहभागी होण्यासाठी २४ जुलै पर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी बॅंक आणि “आपले सरकार सेवा केंद्र” यांच्या मार्फत ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.
****

 देशात उष्णतेची तीव्रता असताना काल नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड आणि लासलगाव इथं मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. या दोन्ही ठिकाणी सुमारे एक तास पाऊस झाला. जळगाव, धुळे आणि सातारा जिल्ह्यात काल काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यतल्या यावल इथं झालेल्या गारपीटीमुळं केळाच्या पिकांचं नुकसान झालं आहे. घरांवरील पत्रेही उडाल्यामुळं एक मुलगा जखमी झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. येत्या काही दिवसात मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
****

 औरंगाबाद शहरातल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तातडीच्या उपाय योजना राबवण्याकरता १०५ कोटी रूपये निधी उपलब्ध करून देण्याची मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पाटील हे काल औरंगाबाद मध्ये आले होते, त्यावेळी महापौर घोडेले आणि आमदार अतुल सावे यांनी त्याची भेट घेतली. जायकवाडीचा पाणी साठा मृत साठ्यात गेला असून धरणाच्या मूळ कालव्यातून होणारा पाणीपुरवठा बंद झालेला आहे. त्यामुळे महापालिकेनं आपत्कालीन पाणीपुरवठा योजना सुरू केली आहे. जायकवाडीतल्या मुख्य योजनांचे पंप बदलणं, योजनांचं सक्षमीकरण, टँकर पाणीपुरवठा आदी कामांसाठी हा निधी उपलब्ध व्हावा असं या निवेदनात म्हटलं आहे.
****

 विष्णुपुरी प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून नांदेड शहराला पाणी पुरवठा केला जाणार असल्यामुळं आता शहराला पाच दिवसाआड पाणी सोडावं लागणार  असल्याची माहिती नांदेड महापालिकेनं दिली आहे. महापालिकेनं नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी कमीत कमी पाणी वापर करून सहकार्य करण्याचं आवाहन केलं असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****

 नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालूक्यातील जांब पंचायत समिति गणाची पोटनिवडणूक प्रकिया आज पासून सुरु झाली असून उमेदवारी अर्ज सहा जून पर्यंत दाखल करता येणार आहेत.  २३  जून रोजी मतदान घेतलं जाणार असून २४  जून रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. पंचायत समिती गणाबरोबरच मुखेड तालूक्यातील १९ ग्राम पंचायतीच्या पोट निवडणुकीची प्रक्रियाही सुरु झाली आहे
*****
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 05 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...