Monday, 3 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.06.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यशासनाची एकात्मिक पाणी पुरवठा योजना - वॉटर ग्रीड प्रकल्पाचं काम लवकरचं सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज परळी इथं दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. या प्रकल्पासाठी पाच प्रकल्प अहवाल मंजूर झाले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न दिवगंत गोपीनाथ मुंडे यांनी बघितलं होतं. त्याअनुषंगानं मराठवाड्याच्या हक्काचं एकवीस टीएमसी पाणी लवकरात लवकर देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमुद केलं. केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रतिम मुंडे यांची यावेळी अभिवादनपर भाषणं झाली.
****
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठ वाडा विद्यापीठातील दहा दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीराचं आज राज्यपाल - कुलपती चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते उदघाटन झालं.
अशी शिबीरं विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात आणि जगणं समृद्ध करतात, असं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केलं. स्वच्छ भारत योजनेत प्रत्येकानं सहभागी होण्याचं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वाटचालीचा राज्यपालांनी यावेळी गौरव केला.
****
वायुदलाच्या एका विमानाचा आज दुपारी जोरहाट इथून उड्डान केल्यानंतर थोड्याच वेळात नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला आहे. या एएन ३२ विमानात चालक दलाचे आठ सदस्य आणि पाच प्रवासी असल्याची माहिती वायूदलानं दिली आहे. बेपत्ता विमानाच्या शोधासाठी सुखोई ३० लढाऊ विमान आणि सी १३० विशेष विमान तैनात करण्यात आलं, असल्याचंही वायूदलानं म्हटलं आहे.
****
बलात्काराचे गुन्हे दाखल असलेल्या दोषींना आजन्म कारावास किंवा मृत्यूदंडाची शिक्षा देणा-या भारतीय दंड संहितेच्या सुधारित कलमाच्या घटनात्मक वैधतेचं मुंबई उच्च न्यायालयानं समर्थन केलं आहे. शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या तीन दोषींनी त्यांना २०१४ मधे सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेच्या घटनात्मक वैधतेचा आव्हान देणारी याचिका न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठानं आज फेटाळली. २०१२ मधल्या निर्भया प्रकरणानंतर भारतीय दंड संहितेच्या ३१६ व्या कलमात सुधारणा करुन बलात्कार प्रकरणातल्या गुन्हेगारांना आजन्म कारावास किंवा मृत्युदंडच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. ही शिक्षा कायद्याच्या चौकटीत बसणारी असल्याचा निर्वाळा खंडपीठानं आज दिला.
****
बाराव्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कारांची घोषणा राज्याचे कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी, तज्ञ, संस्था यांचा सन्मान या पुरस्कारनं करण्यात येतो. परभणी जिल्ह्यातल्या झरी इथं कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शेतकरी  मेघा देशमुख यांच्यासह राज्यातल्या अकरा जणांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार असून  तीन जुलै रोजी  मुंबई दूरदर्शन इथं या पुरस्काराचं वितरण होणार आहे.
****
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या शहागड, पाथरवाला, डोमलगाव, वाळकेश्वर,गंधारी परिसरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह पाउस झाला. वादळी वाऱ्यामुळे काही घरावरील पत्रे उडाली. तसंच शहागडमध्ये विद्युत तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा काही काळ खंडीत झाला होता. हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी मेघ गर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वाशिम जिल्ह्यात कारंजा इथंही आज वादळी वाऱ्यासह पाउस झाला. काही ठिकाणी जुनी झाडे उन्मळुन पडली तर काही ठिकाणी फळबागांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. धुळ्यातही शहरासह जिल्ह्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून बदलेल्या वातावरणामुळे उन्हाचा कडाका कमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यात प्रमुख खरीप पिकांना विमा नाकारण्यात आल्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं आज अंबड तालुक्यातल्या वडीगोद्री इथल्या औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक तास `रस्ता बंद` आंदोलन करण्यात आलं. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचं आश्वासन कृषी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...