Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 04
June 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ जून
२०१९ दुपारी १.०० वा.
****
कस्तुरीरंगन समितीनं
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात काही सुधारणा केल्या असून, तीन भाषांच्या
निवडप्रक्रियेच्या सूत्रात नव्यानं बदल केले आहेत. आता या मसुद्याची सुधारित आवृत्ती,
सर्व राज्य आणि नागरिकांच्या प्रतिसादासाठी एक महिन्याकरता संकेतस्थळावर प्रसारीत केल्याचं
समितीनं म्हटलं आहे. शाळांमधे तीन भाषांच्या निवडप्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या पसंतीला
प्राधान्यक्रम देण्यासाठी मसुद्यात सुधारणा केल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. हा
मसुदा म्हणजे केंद्रसरकारचं अंतिम धोरण नव्हे, तर समितीच्या शिफारसी आहेत, असं मनुष्यबळ
विकास सचिव आर सुब्रमण्यम् यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातला निर्णय घेण्यापूर्वी
सर्व संबंधितांशी चर्चा केली जाईल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी या
आधीच सांगितलं आहे.
****
निवडणूक प्रक्रियेच्या
विविध बाजू सांभाळण्यासाठी निवडणूक आयोगानं मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांचे
नऊ कार्यगट तयार केले आहेत. मतदार याद्यांशी संबंधित प्रश्न, मतदान केंद्र व्यवस्थापन,
निवडणूक आचार संहिता,मतदान प्रक्रिया आणि साहित्याची सूची, क्षमता निर्मिती आणि खर्च
व्यवस्थापन इत्यादींचा त्यात समावेश आहे. सर्व कार्यगट त्यांच्याशी संबंधित विषयाचा
आढावा घेऊन येत्या ऑगस्टपर्यंत शिफारसी करतील. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी
काल नवी दिल्ली इथं आयोजित कार्यशाळेत ही माहिती दिली.
****
प्रसारभारतीची स्वायत्तता
महत्त्वाची असून नवं सरकार ती कायम ठेवणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण
मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं दूरदर्शन भवनमध्ये प्रक्षेपणासाठी
उपयुक्त १७ अत्याधुनिक वाहनं `डीएसएनजी व्हॅन्स`चं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते.
प्रसार भारतीनं व्यवस्थित काम करावं तसंच नवे कार्यक्रम आणि परिमाण शोधावेत, अशी अपेक्षा
त्यांनी यावेळी व्यक्त केली. दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या कार्यक्रमांची जावडेकर यांनी
यावेळी प्रशंसा केली. सार्वजनिक प्रसारण क्षेत्रात काम करताना प्रसारभारती पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेनं सर्वांचा विश्र्वास प्राप्त करण्याच्या दिशेनं पुढं
जात असल्याचं प्रसारभारतीचे अध्यक्ष सूयर्प्रकाश यावेळी म्हणाले.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते
नितीन गडकरी यांनी आज सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री पदाचा पदभार स्विकारला.ग्रामीण
कृषी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढवण्यावर त्यांचं मंत्रालय लक्ष केंद्रीत करणार
असल्याचे गडकरी यांनी आज सांगितले. प्रतापचंद्र सारंगी यांनी आज सुक्ष्म लघु आणि मध्यम
उद्योग केंद्रीय राज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला.
****
औरंगाबाद इथं नक्षत्रवाडी
भागात आठ हेक्टरमध्ये गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ -म्हाडाची दीड हजार सदनिकांची
योजना लवकरचं सुरु करणार असल्याचं म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी जाहीर केलं आहे.
त्यांच्या हस्ते आज औरंगाबाद इथं म्हाडाच्या औरंगाबाद गृहनिर्माण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या
तिसगाव, वाळूज, देवळाई आणि पैठण इथल्या
गृहनिर्माण प्रकल्पातल्या ९१७ सदनिकांची सोडत झाली. त्यावेळी ते बोलत होते.
देवळाई इथल्या म्हाडाच्या वसाहतीला पाणी पुरवठा
योजनेसाठी दोन कोटी रुपये निधीची घोषणा त्यांनी यावेळी केली. लातुर इथं ९०० घरांची
सोडत विधानसभा निवडणुकीपूर्वी काढण्यात येणार असल्याचं म्हाडाचे अध्यक्ष सामंत यांनी
यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, आज झालेल्या सोडतीमधील यशस्वी
आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावं म्हाडाच्या संकेतस्थळावर
आज संध्याकाळी सहा वाजता जाहीर केली जाणार असल्याचं म्हाडानं नमुद केलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातल्या मुस्लिम कर्मचारी
बांधवांना उद्या ईद उल फित्र- रमजान ईद उत्साहात
साजरी करता यावी, यासाठी या कर्मचाऱ्यांचं मे महिन्याचं वेतन आज करावं, असे आदेश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे
अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा
सात तारखेला होतं. पण मुस्लिम बांधवांचा सण लक्षात घेऊन त्यांचे वेतन तातडीने करण्याचे
निर्देश देण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या ७१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच असा निर्णय
घेण्यात आल्याचं महामंडळानं म्हटलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment