आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०५ जून २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. वायू प्रदूषण हा आजच्या दिवसाचा
विषय आहे.
अधिक स्वच्छ आणि
स्थायी पृथ्वीसाठी वचनबद्ध असल्याचा भारत पुनरुच्चार करतो, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांनी म्हटलं असून, निसर्गाबरोबर सामंजस्यानं राहणं, हा भारतीय संस्कृतीचा एक भाग असल्याचं
नमूद केलं आहे. निसर्गाशी सुसंवाद साधून राहिलं तरच भविष्य चांगलं असेल, असं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी या दिनानिमित्त एका संदेशात म्हटलं आहे.
****
देशभरात आज ईद उल
फित्र साजरी केली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेला ईदच्या शुभेच्छा
दिल्या आहेत. परोपकार, करुणा आणि बंधुभाव या मूल्यांवरचा विश्वास ईदमुळे वाढतो, असं
राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
उपराष्ट्रपती एम.वेंकय्या
नायडू यांनीही ईदच्या शुभेच्छा दिल्या असून, ईद हा प्रेम आणि आनंद एकमेकांमध्ये वाटण्याचा
सण आहे, असं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी जनतेला ईदच्या शुभेच्छा देताना, या सणामुळे समाजात सलोखा, करुणा आणि शांती
राखण्यात मदत होईल, असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातल्या
जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
चालू आर्थिक वर्षात
भारताचा आर्थिक वृद्धी दर सात पूर्णांक पाच टक्क्यांवर कायम राहील, असा अंदाज जागतिक
बँकेनं वर्तवला आहे. पुढच्या दोन वर्षांसाठीही हा दर कायम राहील, असं जागतिक आर्थिक
माहिती अहवालात या बँकेनं म्हटलं आहे.
****
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी
आरोपी अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना पुणे न्यायालयानं १७
जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हे दोघे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अटकेत आहेत.
****
नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यात कृषी विभागानं तीन गावांमध्ये धाड टाकून
बंदी असलेल्या आरआरबीटी कापसाचं बियाणं
जप्त केलं आहे. गुजरात राज्यातून काही व्यापारी हे बियाणे आणून विकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागानं ही कारवाई केली.
****
जालना जिल्ह्यात आज सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण
आहे. औरंगाबाद परिसरातही ढगाळ वातावरण असून काही भागांमध्ये वळवाच्या सरी कोसळल्या.
*****
***
No comments:
Post a Comment