Wednesday, 5 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.06.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 June  2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जून २०१९ दुपारी .०० वा.
****

 योगाभ्यासाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलं आहे. येत्या एकवीस जून रोजीच्या जागतिक योगदिनाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधानांनी योगासनांचा एक चित्रफित संदेश आज जारी केला आहे. यावर्षीच्या योगदिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी सरकारनं दिल्ली, शिमला, म्हैसूर आणि अहमदाबाद या शहरांची निवड केली आहे.
****

 चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धी दर सात पूर्णांक पाच टक्क्यांवर कायम राहील, असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे. पुढच्या दोन वर्षांसाठीही हा दर कायम राहील, असं जागतिक आर्थिक माहिती अहवालात या बँकेनं म्हटलं आहे. देशातला चलनवाढीचा दर रिझर्व्ह बँकेनं निर्धारित केलेल्या लक्ष्याहूनही खालच्या पातळीवर आल्याचं या अहवालात म्हटलं असून, धोरणांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे भारतातली गुंतवणूक अजून वाढेल, असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे.
****

 चंद्रयान दोन, या भारताच्या चंद्र मोहिमेसाठी, भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोला सुयोग्य कालावधी मिळाला आहे. नऊ ते सोळा जुलै दरम्यान भारताचं दुसरं चांद्रयान प्रक्षेपित करण्यासाठी अनुकूल स्थिती असून, या काळात प्रक्षेपण झालं तर हे यान चंद्रावर सहा सप्टेंबरला उतरेल. या चांद्र मोहिमेच्या यानाच्या सगळ्या चाचण्या बेंगलुरु मध्ये पूर्ण झाल्या असून, हे यान श्रीहरिकोटा इथल्या प्रक्षेपण केंद्रावर पाठवण्यासाठी सज्ज असल्याचं इस्त्रोनं म्हटलं आहे. या मोहिमे मध्ये, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वयंचलित उपकरण उतरवण्याची इस्त्रोची योजना असून, असं झाल्यास, भारत हा असं करणारा जगातला पहिला देश ठरणार आहे.
****

 जम्मू-कश्मीर विधानसभेच्या निवडणुका यावर्षी घेण्याबाबत निवडणूक आयोग विचार करणार आहे. राज्यातल्या एकंदर स्थितीची पाहणी करण्याचं काम सुरू राहील, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. अमरनाथ यात्रा संपल्यावर, आणि सर्व स्तरांतून माहिती घेतल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, असं आयोगानं सांगितलं आहे.
****

 देशभरातल्या सगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांबाबत मदत करणारी समुपदेशन केंद्रं आणि चोवीस तास सुरू राहणाऱ्या मदत वाहिन्या असाव्यात, अशी मागणी भारतीय वैद्यकीय परिषदेनं केली आहे. मुंबईतल्या एका रुग्णालयातल्या डॉक्टर पायल तडवी यांनी नुकत्याच  केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर परिषदेनं ही मागणी केली आहे.
****

 राष्ट्रीय महामार्गांच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादानं चिंता व्यक्त केली आहे. याबाबतीत देखरेख करणारी प्रभावी यंत्रणा उभारण्याचे निर्देश लवादानं सरकारला दिले आहेत. याबाबत दोन महिन्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश लवादानं पर्यावरण अणि वन, तसंच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांना दिले आहेत.
****

 भारतीय वायुदलाच्या बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कराच्या मदतीला उपग्रह सुविधा देण्यात आल्या आहेत. या कामात भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोची मदत घेण्यात येत आहे. इस्रोचे कार्टोसॅट आणि रायसॅट हे भूनिरिक्षक उपग्रह,  विमान जिथून दिसेनासं झालं त्या ठिकाणाचे फोटो घेत आहेत. आसाम मधल्या जोरहाट इथून सोमवार पासून हे विमान बेपत्ता झालं असून, विमानात तेरा जण आहेत.
****

 राज्यात प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो, इलेक्ट्रीक बसेस आणि लहान इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरावर भर देण्यासाठी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सांगितले. ते काल पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. राज्यातील दिडशे नगरपरिषदांनी कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती केली आहे. तसंच प्रदुषणाला आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून वीज निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत. पर्यावरणाचं रक्षण करणं हे देशसेवेचं काम आहे आणि यात सर्वांचा सहभाग असणं आवश्यक आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
****

 बीड जिल्हयातल्या केज पंचायत समितीतल्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी जाहीर केला आहे. यासाठी येत्या आठ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून, येत्या तेवीस तारखेला मतदान आणि चोवीस तारखेला मतमोजणी होणार आहे.
*****
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 July 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...