Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05
June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय
पात्रता आणि प्रवेश परिक्षा-नीटचा निकाल जाहीर झाला असून राजस्थानच्या नलीन खंडेलवाल यानं सातशे वीसपैकी
सातशे एक गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सार्थक भट यानं सहाशे पंचाण्णव
गुण मिळवून राज्यात प्रथम आणि देशात सहावा क्रमांक मिळवला आहे. राज्यात साईराज माने
यानं दुसरा तर सिद्धार्थ दाते यानं तिसरा क्रमांक पटकावला आहे. मुलींमध्ये देशात तेलंगणाची
माधुरी रेड्डी जी. हिनं प्रथम क्रमांक मिळवला आहे तर दिशा अगरवाल हिनं राज्यात मुलींमध्ये
प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
****
देशासह राज्यभरात आज ईद उल फित्रचा सण साजरा करण्यात
येत आहे. औरंगाबाद इथं छावणी इदगाह मैदानावर ईदची मुख्य नमाज अदा करण्यात आली. परभणी
शहरासह जिल्हाभरात ईद उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात येत आहे. परभणी शहरातल्या
ईदगाह मैदानावर सामूहिक प्रार्थना झाली. यावेळी महानगरपालिका प्रशासनाच्यावतीनं स्वागत
कक्ष उभारून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे. अहमदनगर इथल्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कोटला मैदानावर सामूहिक नमाज अदा
करून पावसासाठी प्रार्थना करण्यात आली.
नाशिक शहर आणि परिसरात तसंच मालेगाव इथं रमजान ईद
उत्साहात साजरी होत आहे. मालेगाव इथं अठरा ठिकाणी नमाज पठण करण्यात आल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
धुळे शहरात, बुलडाणा जिल्ह्यात तसंच सोलापूर शहर आणि
परिसरातही अनेक ठिकाणी सामूहिक नमाजचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं
आहे.
****
देशात नव्यानं एक लाख गावं डिजिटल करण्यासाठी केंद्र
शासन प्रयत्न करत असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली आहे. केंद्रात
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अकोल्यात त्यांचा
आज सत्कार करणात आला, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. अकोल्यात केंद्रीय
विद्यालय आवश्यक असून त्या दृष्टीनं प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी
दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
रेल्वेत, विशेषतः मुंबईच्या लोकल रेल्वेगाड्यांतल्या
प्रत्येक डब्यामध्ये गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी दोन जागा राखीव ठेवण्याची
शिफारसवजा विनंती राज्य महिला आयोगानं रेल्वे मंत्रालयाकडं केली आहे. राज्य महिला आयोगाच्या
अध्यक्षा विजया रहाटकर यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून ही विनंती
केली आहे.
****
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, दुष्काळ, कृषिपंपांना
वीजजोडण्या यासंदर्भातले प्रश्न विधिमंडळाच्या पावसाळी अधिवशनात उपस्थित करणार असल्याचं,
काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ते आज गडचिरोली
इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मागच्या
तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळालेली नसल्याचं, तसंच, अनुसूचित जाती, जमाती आणि इतर
मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी उच्च शिक्षणासाठीची शिष्यवृत्तीही बंद
असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला.
****
परभणी जिल्ह्यातल्या पाथरी आणि सोनपेठ तालुक्यांमध्ये
काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळानं अनेक घरांचं नुकसान झालं, खपाटपिंप्री
गावात कडब्याच्या गंजींना आग लागून अनेक गंजींसह बैलगाड्या जळून गेल्या. बाबुलतार या
गावात केळीच्या बागांचं आणि ऊस पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आजपासून धुळे
शहरात वृक्ष लागवड मोहिम सुरु करण्यात आली. तापमान वाढीचा विचार करता पर्यावरण रक्षणासाठी
वृक्ष लागवड आणि संगोपन या मोहिमेत प्रत्येक नागरिकानं सहभागी व्हावं, असं आवाहन धुळे
शहराचे महापौर चंद्रकांत सोनार यांनी यावेळी केलं.
****
बुलडाणा जिल्हयातल्या अनेक शेतकरी कुटुंबांना कन्या
वन समृध्दी योजनेनेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी शासनाकडून रोपं पुरवण्यात येणार
आहेत. जिल्ह्यातल्या एक हजार ५०२ शेतकरी कुटुंबांनी या योजनेचा लाभासाठी अर्ज केले
असून, या पावसाळ्यात या कुटुंबांना वृक्षांचं वाटप केलं जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
चित्रपती व्ही शांताराम यांच्या स्मरणार्थ येत्या
सात आणि आठ जूनरोजी कोल्हापूर मध्ये राष्ट्रीय लघुपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं
आहे.
****
No comments:
Post a Comment