Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 06 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जून २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश
परिक्षा- नीटमध्ये राजस्थानचा नलीन खंडेलवाल देशात तर सार्थक भट राज्यात प्रथम
Ø जेष्ठ
नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी आणि जेष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव
पुरस्कार जाहीर
Ø जागतिक
पर्यावरण दिन आणि ईद उल फित्रचा
सण उत्साहात साजरा
आणि
Ø विश्वचषक क्रिकेट
स्पर्धेत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर तर न्यूझीलंडचा बांग्लादेशवर विजय
****
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय
पात्रता आणि प्रवेश परिक्षा-नीटचा निकाल जाहीर झाला असून
राजस्थानच्या नलीन खंडेलवाल यानं सातशे वीसपैकी सातशे एक गुण
मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सार्थक भट यानं सहाशे
पंचाण्णव गुण मिळवून राज्यात प्रथम आणि देशात सहावा क्रमांक मिळवला आहे. राज्यात साईराज माने यानं दुसरा तर सिद्धार्थ दाते यानं तिसरा क्रमांक पटकावला
आहे. मुलींमध्ये देशात तेलंगणाची माधुरी रेड्डी जी. हिनं प्रथम क्रमांक मिळवला आहे तर दिशा अगरवाल हिनं राज्यात मुलींमध्ये प्रथम
येण्याचा मान मिळवला आहे.
****
देशात नव्यानं एक लाख गावं डिजिटल करण्यासाठी
केंद्र शासन प्रयत्न करत असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ आणि माहिती तंत्रज्ञान
राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली आहे. केंद्रात मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अकोल्यात त्यांचा काल सत्कार करणात आला, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. अकोल्यात केंद्रीय
विद्यालय आवश्यक असून त्या दृष्टीनं प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी
दिलं.
****
रेल्वेत, विशेषतः मुंबईच्या लोकल रेल्वे गाड्यांतल्या प्रत्येक डब्यामध्ये
गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी दोन जागा राखीव ठेवण्याची शिफारस राज्य महिला आयोगानं
रेल्वे मंत्रालयाकडं केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा
विजया रहाटकर यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून ही शिफारस केली आहे.
****
विद्यार्थ्यांची
शिष्यवृत्ती, दुष्काळ,
कृषिपंपांना वीज जोडण्या यासंदर्भातले प्रश्न विधिमंडळाच्या पावसाळी
अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचं, काँग्रेसचे
विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ते
काल गडचिरोली इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मागच्या तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती
मिळालेली नसल्याचं, तसंच, अनुसूचित जाती,
जमाती आणि इतर मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी उच्च शिक्षणासाठीची
शिष्यवृत्तीही बंद असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला.
****
देशभरातल्या सगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये
आणि शैक्षणिक संस्थांमध्ये, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांबाबत मदत करणारी समुपदेशन केंद्रं
आणि चोवीस तास कार्यरत मदत वाहिन्या असाव्यात, अशी मागणी भारतीय
वैद्यकीय परिषदेनं केली आहे. मुंबईतल्या नायर रुग्णालयातल्या
पायल तडवी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर परिषदेनं ही मागणी केली आहे.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार
यंदा जेष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी आणि जेष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांना जाहीर झाला आहे. दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल स्मृतिदिनानिमित्त १४ जूनला हे पुरस्कार
दिले जातात.
****
जागतिक पर्यावरण दिन काल देशभर विविध कार्यक्रमांनं
साजरा करण्यात आला. हवामान बदलाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज असून,
पुढल्या पिढीसाठी हिरवागार पर्यावरणस्नेही रहिवास सुपूर्द करण्यासाठी
वचनबद्ध आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पर्यावरण दिनानिमित्त
दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
निसर्गाशी ताळमेळ राखला तरच भविष्य सुंदर ठरेल असं म्हटलं आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘सेल्फी
विथ सॅपलिंग’ हा उपक्रम सुरू केला आहे. राज्यातही हा दिवस अनेक कार्यक्रमांनी
साजरा करण्यात आला.
औरंगाबाद इथंही या दिनानिमित्त चिकलठाणा इथल्या कचरा
प्रक्रिया परिसरात शेतकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं तसंच चिकलठाणा इथल्या
औद्योगिक परिसरातही उद्योजकांनी वृक्षारोपण केलं. शहरातल्या जागृती मंचच्या वतीनं वृक्षदान आणि पर्यावरणावर आधारित
चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी नागरिकांना ५००
रोपट्यांचं मोफत वाटप करण्यात आलं , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही या दिनानिमित्त कुलगुरू डॉ.
देवानंद शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात
आलं. शहरात पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणारी मानवी साखळीही काढण्यात आली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
देशासह राज्यभरात काल ईद उल फित्रचा सण उत्साहात
साजरा करण्यात आला. औरंगाबाद
इथं छावणी इदगाह मैदानावर ईदची मुख्य नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर खासदार
इम्तियाज जलील यांच्यासह अन्य मान्यवरांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. परभणीत
ईदगाह मैदानावर सामूहिक प्रार्थना झाली. यावेळी महानगरपालिका
प्रशासनाच्यावतीनं स्वागत कक्ष उभारून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.
अहमदनगर इथल्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कोटला मैदानावर सामूहिक
नमाज अदा करून पावसासाठी प्रार्थना करण्यात आली. नाशिक शहर आणि
परिसरात तसंच मालेगाव इथंही रमजान ईद उत्साहात साजरी झाली. परभणी,
नांदेड, जालना, उस्मानाबाद, वाशिम आणि बुलडाणा
इथंही ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
लातूर इथं बार्शी रस्त्यावरील इदगाह मैदानावर सकाळी सामुहिक नमाज अदा करण्यात आली. राज्यातला दुष्काळ हटावा, पाऊस पडण्यासाठी दुवा मागण्यात आली. यावेळी खासदार सुधाकर श्रृंगारे आमदार विक्रम काळे उपस्थित
होते. जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील
निलंगेकर यांनीही ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
****
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं दक्षिण
आफ्रिकेवर सहा गडी राखून विजय मिळवला. दक्षिण
आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी २२८ धावांचं
लक्ष्य ठेवलं. भारतानं हे आव्हान ४८व्या षटकात चार फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
या सामन्यात भारताच्या रोहित शर्मानं शतक झळकावत भारताला हा विजय
मिळवून दिला.
दरम्यान,
काल झालेल्या
दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनं बांगला देशावर दोन गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. बांग्लादेशानं विजयासाठी न्यूझीलंडसमोर २४५ धावांचं आव्हान ठेवलं होतं.
प्रत्युतरात न्यूझीलंडनं ते ८ गडी गमावून ४८व्या षटकात पूर्ण केलं.
या स्पर्धेत आज वेस्टइंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे.
****
ऑस्ट्रेलियात सिडने इथं सुरू झालेल्या
ऑस्ट्रेलियन खुल्या बँडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी,व्ही.
सिंधूनं इंडोनेशियाच्या आणि समीर वर्मा यानं मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्याचा
पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला.
****
अहमदनगर इथल्या सावेडी उपनगर कचरा डेपोला लागलेल्या आगीच्या कारणावरून महापालिका आयुक्त राहुल द्विवेदी
यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रमुख तथा आरोग्याधिकारी डॉ. एन.
एस. पैठणकर यांना निलंबित केलं आहे. महापालिकेच्या सावेडी कचरा डेपोला सोमवारी सायंकाळी पाच वाजता आग लागली होती.
कचऱ्यात प्लास्टिक असल्यानं प्रशासनाला वेळीच आग विझवण्यात
अपयश आलं. या सर्व परिस्थितीला पैठणकर यांना
जबाबदार धरण्यात आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात काल रात्री
साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वादळी वारा आणि विजांच्या
कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. कळमनुरीत गारपीट झाली. आखाडा
बाळापूर, पोतरा, दांडेगाव, वारंगा, नांदापूर, कवठा,
वसमत अदि परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, या वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला तर अनेकांच्या घरावरील पत्रे
उडाली. सांगली मिरज परिसरात
काल सायंकाळी गारांचा वर्षाव होऊन हलका पाऊस झाला.
****
राज्यात बंदी असलेला
सुमारे २५ ते ३० लाख रूपयांचा प्रतिबंधित गुटखा अकोला पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखानं काल पहाटे जप्त
केला. हा गुटखा कंटेनरद्वारे
मध्यप्रदेशमध्ये अकोला मार्गे जात असतांना, पकडण्यात आला.
या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आलं. तेलंगणा
राज्यातल्या हैदराबाद इथून हां गुटखा आणण्यात आला
होता.
****
नंदूरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणात काल
पोहण्यासाठी गेलेल्या चार तरूणांचा बुडून मृत्यु झाला. ईदचा सण असल्यानं पोहण्याचा आनंद घेण्यासाठी
हे चार जण धरणात गेले होते, मात्र पोहत असतांना पाण्याचा अंदाज
न आल्यानं या तरूणांचा
बुडून मृत्यु झाला.
****
लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या आलमला इथं
आडातला गाळ काढताना विषारी वायुमुळे मृत पावलेल्या तिघा मुलानी कुटुंबियांच्या वारसांना
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत देण्यात आली. मार्च महिन्यात फारुख खुदबुद्दीन मुलाणी, सद्दाम फारुख
मुलाणी आणि सय्यद दाऊद
मुलाणी या तीन जणांचा आडातल्या विषारी वायूने गुदमरून मृत्यू
झाला होता.
****
बुलडाणा जिल्हा पुरवठा विभागाकडून धान्याचा पुरवठा झाला नसताना लाभार्थ्यांचे
ठसे घेऊन धान्य वितरण केल्याचं दर्शवणाऱ्या मेहकर तालुक्यातल्या १४ स्वस्त दुकानदारांचे
परवाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याने निलंबित केले आहेत.
जिल्हा पुरवठा विभागाने तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचा ऑनलाइन
आढावा घेतला असता हा प्रकार निदर्शनास आला.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या अनेक शेतकरी कुटुंबांना कन्या वन समृध्दी योजनेनेअंतर्गत
वृक्ष लागवड करण्यासाठी शासनाकडून रोपं पुरवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातल्या एक हजार ५०२ शेतकरी कुटुंबांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज केले असून, या पावसाळ्यात या कुटुंबांना
वृक्षांचं वाटप केलं जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment