Thursday, 6 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.06.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
जर्मन उद्योजकांनी उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्राला नेहमीच प्राधान्य दिलं आहे. यापुढं तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता यासह सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांमध्येही जर्मनीनं गुंतवणूक वाढवावी, यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची राज्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे. लिन्डर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. दोन्ही देशांतील सांस्कृतिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक देवाण – घेवाण वाढावी याबाबत मुख्यमंत्री आणि जर्मनीच्या राजदूतांच्या या बैठकीत चर्चा झाली.
****
महात्मा गांधीजी यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त विविध धोरणं आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी दिडशे कोटी रुपयांचा निधी  विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती राज्याचे अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
आज मुंबईत एका बैठकीत ते बोलत होते. यानिमित्तानं महात्मा गांधी यांचं कार्य आणि विचारधारेवर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक वेरूळ घृष्णेश्वर मंदिर विकास आराखड्यातील कामांनी या मंदिराच्या वास्तू शिल्पात  भर पडावी, अशा सूचना मुनगंटीवार यांनी केल्या आहेत. त्यांनी घृष्णेश्वर विकास आराखड्यातील कामांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिर परिसर विकासासाठी ११२ कोटी ४१ लाख रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान आणि परिसर विकासासाठी १४८ कोटी ३७ लाख रुपयाचा आराखडा मंजूर करण्यात आला असल्याची माहितीही अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी `एनईएफटी` आणि `आरटीजीएस` वरचं शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेनं चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा दुसरा द्वैमासिक आढावा आज जाहीर केला. रिझर्व्ह बँकेनं प्रमुख व्याजदर रेपो दरात पाव टक्क्यानी कपात केली असून रेपो दर सहा टक्क्यांवरून पावणेसहा टक्के झाला आहे. पतधोरण समितीची बैठक संपल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मुंबईत वार्ताहरपरिषदेत ही माहिती दिली. गेल्या चार महिन्यातली रेपो दरात केलेली ही सलग तिसरी कपात आहे. रेपो दरात कपात केल्यामुळे वाहनकर्ज आणि गृहकर्जाचे हप्ते कमी होण्याची शक्यता आहे. रिव्हर्स रेपो दर साडेपाच टक्के तर बँक दर सहा टक्के राहणार आहे. आर्थिक वृद्धी दराच्या यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजात बदल करून तो आता सात टक्के राहील, असा नवा अंदाजही रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे. 
****
केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज मुंबईत चित्रपट विभागाच्या आवारात वृक्षारोपण केलं. त्यांनी नुकत्याच सुरु केलेल्या `सेल्फी विथ सॅपलिंग` या उपक्रमाला चालना देत, पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं हे वृक्षारोपण केलं. यानंतर जावडेकर यांनी भारतीय चित्रपट संग्राहलयाला भेट दिली.
****
परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात आज सकाळी सुमारे पंधरा मिनिटं वळवाच्या पावसानं हजेरी लावली. काल रात्री जिंतूरमध्ये झालेल्या पावसामुळे मोठे वृक्ष उन्मळून पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं. सेलू तालुक्यातील आडगाव (दराडे) परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं केळीच्या बागांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना, औरंगाबाद परिसरात आज पावसाच्या हल्यक्या सरी झाल्या.
दक्षिण कोकणात काही ठिकाणी तसंच उत्तर कोकण, मराठवाडा, विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.
****
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातल्या नगर रचना विभागात आज सकाळी आग लागली. यात महत्त्वाचे दस्तावेज तसंच फर्नीचर जळून खाक झालं आहे. अग्निशमन विभागाच्या दोन बबांनी ही आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळं आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी  व्यक्त केला आहे.
****
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं जळगाव जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयं आणि रेल्वे स्टेशन परिसरात अवैध गुटखा, तंबाखू विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश  ढाकणे यांनी दिले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 03 جولائی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 03 July 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...