Thursday, 6 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.06.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 June  2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जून २०१९ दुपारी .०० वा.
****

 देशाच्या आर्थिक विकासात वृद्धी करण्यासह गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन नव्या मंत्रिमंडळ समित्या स्थापन केल्या आहेत. गुंतवणूक आणि आर्थिक विकासासंदर्भात स्थापन केलेल्या पाच सदस्यीय मंत्रिमंडळ समितीत गृह मंत्री अमित शाह , अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचा समावेश आहे . रोजगार आणि कौशल्यविकासाच्या संधी निर्माण करण्याबाबत स्थापन केलेल्या दहा सदस्यीय समितीत कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक,  पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, कौशल्य  आणि  रोजगार मंत्री संतोष गंगवार, नागरी विकास  मंत्री हरदीप पुरी यांच्यासह निर्मला सीतारामन,  पियुष गोयल आणि नितिन गडकरी यांचाही या समितीत समावेश आहे.
****

 केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामुळे भूजल प्रदूषण कमी झाल्याचा निष्कर्ष युनिसेफनं केलेल्या एका अभ्यासातून समोर आला आहे. स्वच्छतेचा आग्रह आणि स्वच्छता विषयक संदेशांची भूमिका यात महत्वाची ठरल्याचं निरीक्षण युनिसेफनं नोंदवलं आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशात संपूर्ण स्वच्छता झाल्यास त्याअभावी होणाऱ्या रोगांचा प्रादूर्भाव कमी होईल असं केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अभ्यास अहवालाचा दाखला देऊन म्हटलं आहे.

दरम्यान, देशातल्या ९९ टक्क्यांहून अधिक ग्रामीण क्षेत्रात स्वच्छतेचे मानदंड पूर्ण झाले असल्याचं स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्रालयानं म्हटलं आहे.
****

 देशाच्या विविध भागात गेल्या काही दिवसात सौम्य झालेली उष्णतेची लाट पुन्हा तीव्र झाली आहे. महाराष्ट्रात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४७ अंश सेल्सीअस तापमानाची काल नोंद झाली. त्या पाठोपाठ नागपूरमध्ये सर्वाधिक तापमान होतं.

दरम्यान, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात विविध भागांमध्ये  आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी झाल्या.
****

 रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने हा सोहळा साजरा करण्यात येत आहे. शिवराज्याभिषेक सोहळयासाठी राज्यभरातून शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत. बुधवार संध्याकाळपासूनच रायगडावर वेगवेगळया कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते गडपूजन झाल्यानंतर शिवकालीन युद्धकलेचा कार्यक्रम झाला. आज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचा भव्य आगमन सोहळा आहे.
****

 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार यंदा जेष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी आणि जेष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांना जाहीर झाला आहे. नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनी १४ जूनला हे पुरस्कार दिले जातात.
****

 केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेतुन सांगली जिल्ह्याला ३२१ कोटी रुपये मिळणार आहे. पाच लाख ३५ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांना पेरणी काळात बियाणं, खतं खरेदीसाठी रोख रकमेच्या स्वरुपात मिळण्यासाठी शेतकरी सन्मान योजना सुरु करण्यात आली आहे. यात अल्प आणि अत्यल्प शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.
****

 कोयना आणि वारणा धरणात जलसंपदा विभागानं पाणीसाठ्यावर उपसाबंदी लागु केल्यानं सांगली, मिरज, वाळवा परिसरातील औद्योगिक क्षेत्रात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा पाटबंधारे विभागानं दिला आहे. या निर्णयामुळं उद्योग क्षेत्रात तीव्र नाराजी पसरली आहे. कोट्यवधी रुपयांचं यामुळं नुकसान होईल, अशी भीती उद्योजक व्यक्त करत आहेत.
****

    अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणात जिलेटीनचा वापर करून स्फोट घडवून मासेमारी करत असल्या प्रकरणी पाटबंधारे विभागानं कारवाई केली आहे. धऱण परिसरात पहाटे स्फोटाचे आवाज झाल्याच्या पार्श्र्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. धरण अभियंत्यांनी या प्रकरणी चौकशी करून अवैध मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे जाळे जप्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या आलमला इथं आडातला गाळ काढताना विषारी वायुमुळे मृत्यू पावलेल्यांच्या मुलाणी कुटुंबीयांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत देण्यात आली आहे.
*****
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 July 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...