Friday, 7 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 07.06.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्यात यंदा पाऊसमान सर्वसाधारण राहील, पावसाला विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या उशीरानं कराव्यात असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत खरीपाचं नियोजन करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी हवामानाचा आढावा पाहून शेतक-यांना ४० कोटी एसएमएस पाठवण्यात आले होते. यंदा गेल्या तीन दिवसात पाच कोटी एसएमएस पाठवल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सोयाबीन लागवडीखाली असून जलयुक्त शिवार, शेततळी, प्रवाही सिंचन अशा योजनांमुळे कमी पावसातही उत्पादकता वाढवण्याचे शासनाचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत असल्याचं त्यांनी नमुद केलं. गेल्या वर्षी राज्यात ७३ टक्के पाऊस झाला तरीही कापसाची उत्पादकता सतरा टक्क्यांनी वाढली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. कृषीक्षेत्रातील गुंतवणूकीमधे २००९ ते २०१४ या कालावधीशी तुलना केली तर, गुंतवणूक चार पटीनं वाढली असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
****
नव्या आरक्षणामुळे घटणाऱ्या जागा भरून काढण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढवून देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. नवी दिल्लीत काल मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन ही मागणी केली. सामाजिक आणि आर्थिक मागासवर्गीय, तसंच आर्थिक कमकुवत घटकांना दिलेल्या आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी कमी जागा उरत असल्यानं, या जागा वाढवणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी डॉ. हर्षवर्धन यांना सांगितलं.
****
मालेगांव स्फोट प्रकरणी सुनावणी सुरू असलेल्या मुंबईतील विशेष न्यायालयासमोर या आठवड्यात दोन वेळा गैरहजर राहिलेल्या भाजप खासदार प्रज्ज्ञासिंह ठाकूर आज मात्र हजर झाल्या. राष्ट्रीय अन्वेषण संस्था विशेष न्यायाधीश व्ही. एस. पाडळकर यांनी यावेळी त्यांना या स्फोटाबद्दल काही सांगायचं आहे का, असं विचारला असता त्यांनी, याबद्दल आपल्याला माहिती नाही, असं सांगितलं. अकरा वर्षे जुन्या या प्रकरणी सुनावणीदरम्यान आतापर्यंत डॉक्टर आणि पंचांसह ११६ साक्षीदारांची फेरतपासणी झाली आहे.
****
जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी पुढील सुनावणी २७ जून रोजी होणार आहे. आज धुळे येथील विशेष न्यायालयात या प्रकरणाचा निकाल देण्यात येणार होता.  मुख्य न्यायाधिश सृष्टी निळकंठ या आजारी असल्यानं गैरहजर राहिल्यामुळं न्या. एस. आर. उगले यांच्यासमोर कामकाज झालं. माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह ५१ आरोपी आजच्या सुनावणीसाठी न्यायालायत  हजर होते.  दरम्यान, सुनावणीवेळी वार्तांकनासाठी जमलेल्या पत्रकारांना धुळे न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी धक्काबुक्की केल्यामुळं पत्रकारांनी पोलिस अधिक्षकांकडे त्यांच्या निलंबनाची मागणी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी  समाजात "वृक्ष भाव" रुजवावा असे आवाहन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. वनमंत्र्यांनी आज मुंबईत ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या निमित्तानं बैठक घेऊन विविध घटकांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. बैठकीला बुराणी फाउंडेशन, ईशा फाउंडेशन, बाबुलनाथ मंदिर,  महालक्ष्मी मंदिर, अनिरूद्ध अकादमी, पतंजली, ब्राह्मकुमारी आश्रम, आर्ट ऑफ लिविंग आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
****
गेल्या मार्च महिन्यात झालेल्या माध्यमिक शालांत परिक्षा इयत्ता दहावीचा  निकाल उद्या जाहीर केला जाणार असल्याची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सचिवांनी दिली आहे. उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहिर केला जाणार आहे.
****
जालना शहरात अतिरिक्त शंभर खाटांचं महिला आणि बाल रुग्णालय उभारणीला  आरोग्य विभागानं मान्यता दिली असून, त्यासाठी पहिल्या टप्प्यात ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. ते आज जालना इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्हा प्रशासनाकडून जागा निश्चित झाल्यानंतर या रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार असून त्यासाठी आवश्यक ४६ पदं भरण्यास शासनानं मान्यता दिल्याचही राज्यमंत्री खोतकर यांनी यावेळी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यातील जिंतूर इथं आज संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून खांब आणि रोहीत्रावर पडल्यानं जिंतूरमधील विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 30 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...