आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०९ जून २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
श्रीलंकेची राजधानी कोलंबो
इथं काही दिवसांपूर्वी ईस्टर संडेला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला बळी पडलेल्या नागरिकांबद्दल
सद्भावना व्यक्त करण्यासाठी, तसंच शेजारी देशाशी असलेलं ऐक्य दृढ करण्याच्या धोरणाचा
भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्रीलंकेच्या दौऱ्यावर जात आहेत. तत्पूर्वी
मालदीवलाही ते भेट देणार असल्याचं याबाबातच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
माजी केंद्रीय गृहमंत्री,
तसंच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांची जन्मशताब्दी यंदा संपूर्ण
राज्यभर साजरी करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षानं घेतल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ
नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे. १४ जुलैपासून शंकरराव
चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ होणार आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम, जायकवाडी
धरणाची उभारणी, राजकारण, समाजकारणासह, सिंचन, शिक्षण, सहकार, कृषी अशा विविध क्षेत्रांत
त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. तसंच महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांची भूमिका अतिशय
महत्वपूर्ण राहिली आहे, असं शिंदे म्हणाले.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथून श्री संत गजानन
महाराज संस्थानतर्फे पंढरपूरला दरवर्षी काढण्यात येणाऱ्या, श्री गजानन महाराजांच्या
पालखी वारीला काल सुरुवात झाली. काल सकाळी पूजन झाल्यानंतर विठ्ठल
नामाचा, तसंच संत ज्ञानेश्वर, संत
तुकाराम आणि गजानन महाराजांचा नामघोष करत ही
पालखी पंढरपूरकडे रवाना झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उस्मानाबादसह मराठवाड्यातल्या काही भागात आज पहाटे
जोराच्या वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या
उष्णतेपासून या पावसानं, आणि सर्वदूर तयार झालेल्या ढगाळ वातावरणानं नागरिकांची सुटका
केली आहे. सांगली परिसरातही आज पहाटे पाऊस झाल्याचं वृत्त आहे.
****
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया
यांच्यात सामना होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment