Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 10 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० जून २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शिवसेना
आग्रही - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
v अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज; राज्यात अनेक भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
v हज यात्रेसाठी यावर्षी भारतातून दोन लाख भाविक जाणार
आणि
v विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा ऑस्ट्रेलियावर
३६ धावांनी विजय
****
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शिवसेना
आग्रही असल्याचं, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जालना तालुक्यातल्या साळेगाव इथं काल
चारा छावणीतल्या शेतकऱ्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजनेत अन्न धान्याचं
वाटप करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातला दुष्काळ कायमचा संपण्यासाठी राज्य शासन सातत्यानं काम करत असून,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली धरण जोड योजना त्याचाच
एक भाग असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे,
राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते. राज्यात
पीकविम्यासाठी नियुक्त विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचं सांगत,
विमा भरलेल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याच्या
सूचनाही ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम इथं बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद
सहयोग योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांसाठी छावणीवरच भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या योजनेचा काल भूम इथं युवा सेनेचे
अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या
सर्व शेतकऱ्यांना दररोज रात्रीचं जेवण दिलं जाणार आहे.
****
मुस्लिम धर्मियांच्या पवित्र हज यात्रेसाठी यावर्षी
भारतातून दोन लाख यात्रेकरूंची
नोंद झाल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितलं आहे.
या यात्रेकरूंना कोणतही अनुदान दिलं जाणार नाही, असं
त्यांनी काल मुंबईत खाजगी
प्रवासी वाहतूकदारांसोबत झालेल्या बैठकीत बोलतांना सांगितलं. हज यात्रेसाठी यावर्षी
देशाच्या विविध शहरांतून ५०० विमानं उड्डाण करतील. खाजगी प्रवासी वाहतूकदारांकडून
दिल्या जाणाऱ्या सोयीसाठी haj.nic.in/pto हे संकेतस्थळ सुरु
केल्याचं त्यांनी
यावेळी सांगितलं.
****
ज्या राज्यांमध्ये या वर्षी विधानसभेच्या निवडणुका
होणार आहेत, त्या राज्यातल्या भारतीय जनता पक्षांच्या जेष्ठ नेत्यांची
बैठक काल नवी दिल्ली इथं गृहमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी घेतली.
यात महाराष्ट्रासह, हरियाणा आणि झारखंड या राज्यांच्या
प्रमुख नेत्यांचा समावेश होता.
****
देशात रस्ते आणि महामार्गांच्या कामांमध्ये गती
आणण्यासाठी आणि निधीची पूर्तता करण्यासाठी योजना बनवण्यात आली असल्याचं केंद्रीय रस्ते
आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटल आहे, ते काल पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. महामार्ग बनवण्यासाठी भूसंपादन करण्याच्या प्रक्रियेतही गती आणण्याकरता
योजना तयार केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या ५ वर्षात
महामार्गांच्या कामामध्ये १५ लाख कोटी रूपयांची काम करण्याचं नियोजन असल्याचं गडकरी
यांनी सांगितलं.
****
पुण्याच्या नागरिकांचं, मुळा आणि मुठा नद्यांना प्रदूषण मुक्त
पाहण्याचं स्वप्न मोदी सरकार पूर्ण करेल, अशी ग्वाही माहिती आणि
प्रसारण, तथा पर्यावरण, वने आणि हवामान
बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. पुणे इथं झालेल्या,
नद्यांच्या प्रदूषण आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रीय नदी संरक्षण योजनेत जपान आंतरराष्ट्रीय सहयोग संस्था -
जायका सोबत झालेल्या कर्ज करारानुसार नऊशे नव्वद कोटी रुपयांच्या योजनेपैकी ८५
टक्के भाग केंद्र सरकार, तर उर्वरित १५ टक्के रक्कम पुणे
महानगरपालिका देणार असल्याचं ते म्हणाले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात
आहे.
****
भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात
एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. उद्या आणि परवा हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे ३००
किलोमीटर दूर राहील. हे वादळ राज्यात येण्याची शक्यता नसली, तरी त्याच्या प्रभावामुळे किनारपट्टीवर
वाऱ्याचा वेग वाढलेला असेल. परिणामी कोकणासह मुंबईत पाऊस पडू शकतो, असं मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. मुंबई तसंच कोकणातल्या मच्छिमारांना पुढचे दोन दिवस
समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्या आहेत.
दरम्यान,
कालही राज्यात अनेक भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद शहरात
काल दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून
रस्त्यावर पडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर पडलेली ही झाडं हटवून वाहतूक
सुरळीत केली. तसंच शहरातल्या काही भागांतला वीजपुरवठा दुपारनंतर खंडित झाला होता. शहरातल्या
रेल्वे स्टेशनवर रेल्वेनं आलेली शेकडो खताची पोती भिजली. लातूर
जिल्ह्यात काल दुपारी देवनी तालुक्यातल्या बोरोळ शिवारात मेंढ्या चारत असतांना अंगावर
वीज कोसळल्यानं बाजीराव म्हेत्रे या वृद्ध व्यक्तीचा मृत्यु झाला. जिल्ह्यातल्या ममदापूर, भाडगाव ,भातांगळी परिसरात जोरदार वाऱ्यामुळं अनेक घरांवरची पत्रे उडाली आणि झाडे उन्मळून
पडली तर महावितरणचे सहा खांब उखडले. लातूर
शहर तसंच निलंगा, रेणापूर, औसा शिरूर अनंतपाळ
इथंही हा पाऊस झाला. उस्मानाबाद इथंही भूम, उमरगा परिसरात वादळी वाऱ्यासह
जोरदार पाऊस झाला. चिंचोली इथल्या केरबा काळे यांच्या गोठ्यावर वीज पडली तर बबन वारे आणि भिमा पवार यांच्या घरावरील पत्रे
उडाल्यानं धान्य आणि संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं. जालना जिल्ह्यातल्या राजूर आणि लगतच्या परिसरात तसंच भोकरदन परिसरातही जवळपास
एक तास चांगला पाऊस झाला.
अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर, जामखेड आणि अकोले
तालुक्यात काल वादळी वाऱ्यांसह पाऊस बरसला. वाऱ्याचा जोर इतका होता
की अहमदनगरमध्ये वाळकी येथील एका शाळेचे पत्रे उडून गेले. अकोले तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर
झाडे उन्मळून पडली, राजूर, भंडारदरा परिसरातल्या अनेक घरांवरची पत्रे उडून गेले. पुणे शहर तसंच बारामती, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातही काल अनेक
ठिकाणी पाऊस झाला.
****
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं
सलामीचा फलंदाज शिखर धवन याच्या ११७ आणि कर्णधार विराट कोहलीच्या ८२ धावांच्या जोरावर
ऑस्ट्रेलियापुढं विजयासाठी ३५३ धावांचं आवाहन ठेवलं
होतं. ऑस्ट्रेलियाचा संघ निर्धारीत ५० षटकांत
३१६ धावाच करू शकला. शिखर धवनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेत आज दक्षिण अफ्रिका
आणि वेस्ट इंडिजमध्ये दुपारी ३ वाजता सामना होणार आहे.
****
महाराष्ट्रातल्या पहिल्या भव्य ‘महाराष्ट्र चित्र शिल्पा’चं अनावरण शिरुरचे
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं. ठाणे इथल्या मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर पारसिक डोंगराच्या पायथ्याला हे चित्र शिल्प साकारण्यात आलं आहे. संत तुकाराम, राजमाता जिजाऊ, छत्रपती
शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई
फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या चित्रांनी सजलेला महाराष्ट्र या शिल्पामध्ये दाखविण्यात आला आहे.
****
राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी
आंतरराष्ट्रीय किर्तीचे भाषा शास्त्रज्ञ आणि विचारवंत पदमश्री डॉक्टर गणेश देवी
यांची सर्वानुमते निवड झाली आहे. राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय मंडळ आणि राज्य
मंडळाची काल पुण्यात बैठक झाली. या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली.
****
औरंगाबाद शहरातल्या इतिहास प्रेमींसाठी काल सकाळी
भडकल गेट, जुनं निजामकालीन
फोकानिया हायस्कूल आणि टाऊन हॉल भागात हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं. निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यानं सुमारे चारशे
वर्षांपूर्वी शहरात उभारलेल्या या वास्तू आणि इथल्या ऐतिहासिक घडामोडींची माहिती इतिहासतज्ज्ञ
डॉ. दुलारी कुरेशी आणि रफत
कुरेशी यांनी उपस्थितांना दिली. औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी या
संस्थेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
****
बीड जिल्ह्यातल्या वडवणी इथं काल मराठी पत्रकार
परिषदेच्या तालुक्याध्यक्षांचा मेळावा,
आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ पुरस्कांराचं वितरण करण्यात आलं.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचा रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा मराठी पत्रकार संघ पुरस्कार नांदेड जिल्हा
पत्रकार संघाला, वसंत काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार
करमाळा, वाडा, तळोदा, कळमनुरी, आष्टी, मालेगाव आदी तालुका
संघांना देण्यात आला.
****
नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातल्या ओझे
इथं कादवा नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन जणांचा काल बुडून मृत्यु झाला. त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून
एकाचा शोध सुरू आहे.
*****
***
No comments:
Post a Comment