Monday, 10 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 10.06.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 June  2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० जून २०१९ दुपारी .०० वा.
****

 नामवंत नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचं बंगळुरु इथं आज सकाळी निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. काही दिवसांपासून कर्नाड आजारी होते. पद्मभूषण, पद्श्री, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ ह्या  पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाड यांच्या निधनामुळं भारतीय चित्रपट क्षेत्राची अपरिमित हानी झाल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाड हे त्यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्व आणि उत्कृष्ट अभिनयामुळं सदैव स्मरणात राहतील असं आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. नामवंत अभिनेते-दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्या निधनानं साहित्य, कला आणि वैचारिक क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व आपण गमावल आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली. साहित्य, चित्रपट, रंगभूमी तसंच वैचारिक क्षेत्रातही कर्नाड यांचा वावर होता. एक महान रंगकर्मी म्हणून भारतीय नाट्यक्षेत्रातील त्यांचं योगदान सदैव स्मरणीय असेल. माथेरानमध्ये जन्मलेल्या कर्नाड यांचा महाराष्ट्राशी अनोखा ऋणानुबंध होता. मराठी चित्रपटसृष्टी - रंगभूमी तसच साहित्य क्षेत्राशीही त्यांचा निकटचा संबंध होता. जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठा चित्रपटातील त्यांची भूमिका रसिकांच्या सदैव स्मरणात राहिल, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. नाना पाटेकर यांनी व्रतस्थ रंगकर्मी हरपल्याची भावना व्यक्त केली आहे. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं केंद्र सरकारच्या सचिवांची भेट घेणार आहेत. याबैठकी दरम्यान, सरकारच्या धोरणांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रशासनात सचिवांचा सक्रीय सहभाग याविषयी या बैठकीत चर्चा होणार आहे.
****

 माजी नागरी उड्डयन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल पटेल आज सक्त वसुली संचालनालयासमोर हजर झाले. एअर इंडीयाला झालेल्या तोट्याप्रकरणी चौकशीसाठी त्यांना सक्त वसुली संचालनालयासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. या संदर्भातील त्यांचं निवेदन आर्थिक गैरव्यहार प्रतिबंधक कायद्याखाली नोंदवलं जाणार आहे. 
****

 जम्मू काश्मिरमधल्या कठुआ इथं आठ वर्षाच्या मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सात पैकी सहा आरोपींना पठाणकोट इथल्या विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. तिलक राज, सांझी राम, दिपक खजुरीया, सुरेंद्र वर्मा, परवेश कुमार, आनंद दत्ता अशी या आरोपींची नावं आहे. दुपारी दोन वाजता दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
****

 येत्या पाच र्षांत महामार्गांच्या कामामध्ये पंधरा लाख कोटी रूपयांची कामं करण्याचं नियोजन असल्याचं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. महामार्ग बनवण्यासाठी भूसंपादन करण्याच्या प्रक्रियेतही गती आणण्यासाठी योजना तयार केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
****

 राज्याच्या विविध भागात काल मॉन्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळं तापमानात घट झाल्यानं लोकांची उष्म्याच्या त्रासातून काही अंशी सुटका झाली आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळं विविध भागांतील विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता.
****

 दुष्काळी भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जत तालुक्यातील शेतकऱ्यांची पायीदिंडी ७०० किलोमीटर प्रवास करत मुंबई मंत्रालयाकडे निघाली आहे. दरवर्षीच्या दुष्काळावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी असंख्य शेतकरी या दिंडित सहभागी झाले आहेत. ही दिंडी आज सांगली मिरज परिसरात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. उद्या आणि परवा हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे ३०० किलोमीटर दूर राहील. हे वादळ राज्यात येण्याची शक्यता नसली, तरी त्याच्या प्रभावामुळे किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढलेला असेल. परिणामी कोकणासह मुंबईपाऊस पडू शकतो, असं मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 
****
 कोल्हापूर ते बंगळुरू ही मिरज बेळगांव मार्गे धावणारी राणी चन्नमा एक्सप्रेस  येत्या सात जुलै पर्यंत केवळ मिरजपर्यंत धावणार आहे. दुरुस्तीच्या कारणांमुळं मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गावरुन ही गाडी धावणार नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...