Monday, 10 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 10.06.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
मराठवाड्यातील एकात्मिक पाणी पुरवठा योजना - वॉटरग्रीड प्रक्लप सुरू करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यासाठी साडे दहा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. त्यांनी आज औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाड्यातले जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांची पाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर  त्यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. विभागातील अकरा धरणं एक हजार ३३० किलोमीटरच्या मुख्य जल वाहिनीद्वारे जोडण्यात येणार आहेत. यामुळे मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचं पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री लोणीकर यांनी यावेळी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात असणारी विचारधारा सत्तेत आली असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शऱद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधे महिलांना मानाचं स्थान असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं तसंच पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील असून जनतेला आधार देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंच केलं आहे,  असं पक्षाचे नेते अजित पवार यांनी यावेळी म्हटलं. पराभवावर चर्चा करण्यापेक्षा आता विधानसभेच्या तयारीला लागा, असं आवाहन त्यांनी यावेळी पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांना उद्देशून केलं.
****
राज्याचे कामगार आणि कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज नवी दिल्लीत श्रम आणि रोजगार मंत्री संतोश गंगवार यांची भेट घेतली. पाटील यांनी यावेळी राज्यातील कामगारांच्या विषयावर केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली.
****
जालना आणि बदनापूर तालुक्यातल्या काही भागात आज दुपारी तीनच्या सुमारास काही वेळ मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातही काही भागात पाऊस झाला. अहमदनगर जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असून नगर शहर ,अकोले राहाता, आणि नगर तालुक्यातील चिंचोडी, दशमीगव्हान यासह विविध ठिकाणी पाऊस झाल्यानं शेतकरी राजा सुखावला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गोवा राज्य सरकारनं खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णय अंमलात आणण्यासाठी आवश्यक विधायकीय  सुधारणा लवकरच करण्यात येतील असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पोरवोरिम इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. विधिज्ञ देविदास पंगम यांची गोव्याचे महा अभिवक्ता म्हणुन नियुक्ती झाल्याचंही गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं.
****
महाराष्ट्र गृह निर्माण क्षेत्र विकास मंडळ, म्हाडानं अमरावती इथल्या अकोली इथं ६७० सदनिका, अकोल्यातील शिवनी इथं २५५ सदनिका, तसंच बुलढाणा इथं २६८ सदनिकांसाठी अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांकरता जाहिरात काढली आहे. मासिक २५ हजार रुपये कौटुंबिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना याचा फायदा होईल. म्हाडाच्या अकोला तसंच अमरावती इथल्या कार्यालयात अर्ज विक्री सुरु असून त्याची अंतिम मुदत दोन जुलै असून पाच जुलै पर्यंत अर्ज स्विकारले जाणार असल्याच आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अकृषी विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचना लागू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी आज गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी `काळी फित` आंदोलन केलं.  हे आंदोलन बारा जूनपर्यंत चालेल. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेनं दिला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
शेगाव इथून पंढरपुरकडे निघालेली संत श्री गजानन महाराजांची पालखी अकोल्यात दाखल झाली असून ती आज सोमवारी तसंच मंगळवारी अकोल्यातील विविध भागातून मार्गक्रमण करेल. मंगळवारी अकोल्यातून पुढील प्रवासासाठी ही पालखी निघेल, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 
****
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची बिनविरोधी निवड करण्यात आली आहे. सभापती निवडीसाठी आज झालेल्या बैठकीत  सभापती पदासाठी केवळ पालकमंत्री देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची निवड करत आल्याची माहिती दिली आहे.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...