Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 11 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ जून २०१९ सकाळी ७.१० मि.
v वॉटर ग्रीड प्रकल्पांतर्गत पहिला टप्प्यात मराठवाड्यातली अकरा लहान - मोठी धरणं एकमेकांना जोडणार-
पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर
v मराठवाड्यात यंदा नऊ कोटी २८ लाख वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट
v प्रख्यात नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक डॉक्टर गिरीश कर्नाड यांचं निधन
आणि
v युवराजसिंहची आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून निवृत्त होण्याची घोषणा;
तर विश्र्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज बांगला देश
आणि श्रीलंका संघात सामना
****
मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त
करण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं काम लवकरच सुरू
करण्यात येणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून पहिला टप्प्यात मराठवाड्यातली अकरा लहान मोठी धरणं एकमेकांना
जोडण्यात येणार असल्याचं राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर
यांनी सांगितलं. औरंगाबाद इथं काल त्यांनी मराठवाड्यातले
जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांची पाणी पुरवठा
योजनांसंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यानंतर
ते वार्ताहरांशी बोलत होते. या पहिल्या टप्प्यासाठी मंत्रीमंडळानं
दहा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या वॉटर ग्रीडद्वारे
विभागातली अकरा धरणं एक हजार ३३० किलोमीटर जल वाहिनी
टाकून जोडण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.
या वॉटर
ग्रीडला क्याबिनजर्रची मान्यता मिळाली आहे.
मराठवाड्यातील पुढची पिढी दुष्काळ कधी पाहणार नाही, अशा प्रकारचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बणवलेला आहे. क्याबिनेट ने १० हजार रूपये
मंजूर केलेले आहेत. आणि पहिला टप्पा आहे हा. मराठवाड्यातले ११ धरणं आपण ग्रीडणं जोडतो आहे. आणि
मराठवाड्याच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी, शेती साठी आणि उद्योगासाठी कसा होईल, अशा
प्रकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प या ठिकाणी आपण करतोय.
लातूर शहराला उजनी धरणाचं पाणी देण्यात येणार असल्याचंही लोणीकर यांनी
आढावा बैठकीत सांगितलं. लातूरसाठी उजनीचं पाणी बंद पाईप लाईन
द्वारे मांजरा धनेगाव धरणात सोडण्यात येणार आहे.
****
मराठवाडा विभागात यंदा नऊ कोटी २८ लाख वृक्ष लागवड
करण्याचं उद्दीष्ट असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीनार यांनी दिली आहे. त्यांनी काल औरंगाबाद मधल्या वाल्मी इथं राज्यातल्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमा अंतर्गत औरंगाबाद विभागस्तरीय आढावा घेतला. त्यानंतर
त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. हरित सेनेच्या एक कोटी उद्दीष्टांपैकी ६६ टक्के उद्दीष्ट
पूर्ण झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
राज्य सरकार वन शेतीला प्रोत्साहन देत असल्याचं सांगतांना मुनगंटीवार म्हणाले….
वन हे तो जल हे, जल हे तो इन्सान का कल हे | आणि या दृष्टिनी आम्ही मराठवाड्याची
वृक्षाच्या संदर्भातली योजना करतो आहे. यासाठी आम्ही वनशेतीला प्रोत्साहन देण्याचा
निर्णय केला. वृक्ष लावणीच्या संदर्भात स्वर्गीय भाऊसाहेब फुंकर यांच्या फलोत्पादन
योजने मध्ये मागेल त्याला हि योजना अशा पद्धतीचं काम विशेष करून मराठवाड्यासाठी करणं
हे जास्त गरजेचं आहे. कन्या वनसमृद्धी योजना या मधे पाच टिकूट आणि पाच फ्रूट फ्रिज
आम्ही देतो. हे काही अंशू तिच्या विवाहामध्ये, खर्चा मध्ये काही योगदान देऊ शकेल.
****
भारतीय साहित्य आणि कला क्षेत्रावर स्वत:चा अमीट
ठसा उमटवणारे प्रख्यात नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक डॉक्टर गिरीश कर्नाड यांचं काल
सकाळी बंगळूरू इथं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी
होते.
बहुभाषिक आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या कर्नाड
यांनी जवळपास ४० वर्ष नाट्यलेखन, दिग्दर्शन आणि अभिनयानं रंगभूमी गाजवली. कन्नड, मराठी,
हिंदी आणि इंग्रजीसह विविध भाषांमध्ये त्यांची नाटकं भाषांतरीत झाली. १९६४मध्ये रंगभूमीवर
आलेल्या त्यांच्या 'तुघलक' या नाटकानं त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. ययाती,
हयवदन आणि नागमंडल ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली. साहित्यातल्या योगदानाबद्दल १९९८मध्ये
त्यांना 'ज्ञानपीठ' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. कर्नाड यांनी 'संस्कार' चित्रपटातून
अभिनयाची सुरुवात केली. पुकार, इक्बाल, टायगर जिंदा है, उंबरठा यासह अनेक चित्रपटात
त्यांनी काम केलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
****
खुल्या संवर्गासाठी जाहीर झालेल्या दहा टक्के
आरक्षणासाठी लागू असलेली आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा बारा लाख रूपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
कोल्हापूर इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते.
राज्य मंत्रीमंडळाच्या संभाव्य विस्तारात विविध महामंडळांमध्ये आरपीआय
आठवले गटाला योग्य स्थान मिळावं, अशी अपेक्षा आठवले यांनी यावेळी व्यक्त केली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राज्यात कालही अनेक भागात वादळ वाऱ्यासह पाऊस झाला.
औरंगाबाद शहरात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आणि
अनेक वाहनांचं नुकसान झालं. शहरात जटवाडा रस्त्यावरच्या राधास्वामी
कॉलनीत तसंच आलमगीर कॉलनीत घराच्या भिंती कोसळल्यानं एक महिला आणि एका बालकाचा मृत्यू
झाला. या पावसामुळे शहरातला अनेक भागातला वीज पुरवठा खंडीत झाला होता. औरंगाबाद तालुक्यातल्या खामखेडा इथं वीज कोसळून शेतात
काम करणारी एक महिला मृत्युमुखी पडली. जालना आणि बदनापूर तालुका,
बीड जिल्ह्यात केज, धारूर आणि गेवराई तालुक्यांत, लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात
काल जोरदार पाऊस झाला. अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर
शहर, अकोले, राहता, आणि
चिंचोडी, दशमीगव्हान यासह विविध ठिकाणी
पाऊस पडला.
****
परभणी विधानसभा मतदार संघातल्या धारपाटी ते दुर्डी
मुरंबा आणि समसापूर फाटा ते समसापूर या रस्त्यांचं भूमिपूजन तसंच प्रत्यक्ष कामाची
सुरुवात शिवसेना आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते काल झाली. या रस्त्यांच्या कामासाठी शासनानं साडेतीन
कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
****
लातूर तालुक्यातल्या नांदगाव इथं अनधिकृत खत विक्री करणाऱ्या
शिवकुमार कसनुरे याच्या विरोधात कृषी विभागाच्या भरारी पथकानं गुन्हा
दाखल केला आहे. परवाना नसताना शेतकऱ्यांना कच्च्या पावतीद्वारे
खत विक्री केल्याचं आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली.
****
अखेरपर्यंत कसे लढायचे हे क्रिकेटने शिकवले, अशा शब्दात भावना व्यक्त करत षटकारांचा
बादशहा असलेला भारतीय क्रिकेटपटू युवराजसिंह यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून
निवृत्त होण्याची घोषणा काल मुंबईत केली. १७ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय
कारकिर्दीत युवराजसिंह यांनी भारतासाठी ४० कसोटी मालिका, ३०४
एकदिवसीय सामने, ५८ ट्वेंटी -ट्वेंटी क्रिकेट
सामने खेळले आहेत. २००४ मध्ये लाहोर इथं पाकिस्तान विरूद्धच्या
सामन्यात त्यांनी आपलं पहिलं कसोटी शतक झळकावलं होतं. कर्करोगासारख्या
असाध्य रोगावर मात करून पुन्हा तेवढ्याच जोमानं आणि जिद्दीनं खेळणाऱ्या युवराजसिंहनं पुढील काही वर्षात प्रशिक्षण क्षेत्रात येवून क्रिकेटची सेवा कायम
ठेवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
****
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्र्वचषक
क्रिकेट स्पर्धेत आज बांगला देश आणि श्रीलंका संघात सामना होणार आहे. दरम्यान, काल
वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यानचा सामना पावसामुळं रद्द करण्यात आला.
या दोन्ही संघांना प्रत्येकी एक- एक गुण देण्यात
आला आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातल्या डासाळा इथं
जलसंधारणाच्या कामाला काल सुरुवात करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या युवा नेत्या मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या
या कार्यक्रमात, विविध ठिकाणी झालेल्या जलसंधारणाच्या कामांची
चित्रफितीद्वारे माहिती देण्यात आली आणि जलसंधारणाचं महत्त्व सांगण्यात आलं.
****
कृष्णा खोऱ्यातलं मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे
पाठपुरावा करण्याचं आश्वासन, खासदार छत्रपती संभाजी
महाराज यांनी दिलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या दुष्काळी भागाची
काल त्यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीला
धैर्यानं सामोरं जावं, असं आवाहनही
त्यानी यावेळी केलं.
****
सिंचन, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातल्या मराठवाड्याच्या
अनुशेषावर विचार विनिमय करण्यासाठी येत्या १५ जून रोजी लातूर
इथं मराठवाडा विकास परिषदेच आयोजन करण्यात आलं आहे. काल लातूर
इथं परिषदेच्यावतीनं ही माहिती देण्यात आली. या परिषदेच उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते होईल.
पशु संवर्धन मंत्री अर्जुन खोतकर या परीषदेस उपस्थीत
राहणार आहेत.
****
‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत राज्य राज्य महिला आयोग, आज
औरंगाबाद जिल्ह्यातल्या तक्रारींची जनसुनावणी करणार आहे. औरंगाबादच्या सुभेदारी शासकीय विश्रामगृहात सकाळी १०
वाजता ही जनसुनावणी होईल. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय
मिळावा, यासाठी आयोग हा उपक्रम आयोग
राबवत आहे.
*****
***
No comments:
Post a Comment