Tuesday, 11 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 11.06.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
११ जून  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त निश्चित केलेल्या उद्दिष्टांना मूर्तरुप देण्याकरता, सरकारच्या सर्व विभागांनी धडाडीनं प्रयत्न करावेत, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देश  अधिक उत्कृष्ट बनवण्यासाठी यामुळे नागरिकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांनी काल, आपल्या निवासस्थानी, केंद्रसरकारच्या सर्व सचिवांसमवेत चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. नागरिकांचं जीवन अधिक सुखी करणं आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, सर्व मंत्रालयांनी पूर्ण लक्ष देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
****
 भ्रष्टाचार, तसंच व्यावसायिक गैरवर्तनाच्या आरोपावरुन, आयकर विभागातल्या १२ वरीष्ठ अधिकाऱ्यांना सरकारनं सक्तीची निवृत्ती दिली आहे. यामधे एका संयुक्त आयुक्त पदावरच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार आणि खंडणी मागितल्याच्या गंभीर तक्रारी आल्या होत्या. महसूल विभागातील आयुक्त पदावरच्या दोन महिला अधिकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या एका महसूल आयुक्तालाही सक्तीची निवृत्ती देण्यात आली आहे.
****
 शेगाव इथून पंढरपूरकडे निघालेली संत श्री गजानन महाराजांची पालखी अकोल्यात दाखल झाली आहे. ही पालखी आज अकोला शहरातल्या विविध भागातून मार्गक्रमण करणार करेल. त्यानंतर आज अकोल्यातून पुढच्या प्रवासासाठी ही पालखी प्रस्थान करेल, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 
****

 अहमदनगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाट्याजवळ भरधाव जीपनं, उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात जीपमधले तीन जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला. आज पहाटे ही घटना घडली. 
****

लातूरकरांनी सुरू केलेल्या,”जलाग्रही लातूर”, या चळवळीला यश मिळालं असून, आता लातूरकरांना बंद जलवाहिनीद्वारे उजनी धरणाचं पाणी मिळणार असल्याची माहिती नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली आहे. औरंगाबाद इथे आयोजित मराठवाडा पाणीटंचाई आढावा बैठकीत, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी ही घोषणा केल्याचं गोजमगुंडे यांनी सांगितलं.
*****
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 26 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रप...